आज चैत्र शुद्ध प्रतिपदा! शालिवाहन शकाप्रमाणे नववर्षाच्या सुरुवातीचा दिवस. महाराष्ट्रात आज वेगळाच आनंद आणि उल्हास असतो. सगळीकडे गुढी उभारून नव्या वर्षाची खूण बांधली जाते, ब्रह्मध्वजेला गुढीवर बांधले जाते. बरोबर ६६ वर्षांपूर्वी रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रीय जनमानसाशी एक अतूट नाते जोडले गेले ते एका अद्वितीय प्रतिभेच्या जोडगोळीच्या अफाट क्रियाशीलतेने! आकाशवाणी पुणे वरून १ एप्रिल १९५५ ला सुरू झालेल्या या प्रयोगाने संबंध महाराष्ट्रात एक सांस्कृतिक क्रांतीच घडवली!
“आधुनिक वाल्मिकी” म्हणजे कविवर्य ग.दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून एक कविता व त्याच्यावर बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी सुमधुर , अविस्मरणीय चाल लावावी, ती प्रत्येक शुक्रवारी सकाळी ८:४५- ९ मध्ये प्रक्षेपण व्हावे (लगेच शनिवारी आणि रविवारी पुनः प्रक्षेपण त्याच वेळी व्हायचे). संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच श्रोते शक्यतो शुक्रवारी रेडिओला अक्षरशः चिकटून असायचे. माझ्या आत्याकडे माझा धाकटा आतेभाऊ (तेव्हा तो ५ वर्षांचा असेल) चक्क हार आणून रेडिओ ला घाले, शेजारी उदबत्ती लावे आणि घरातील सर्वांना आंघोळ करायला लावून तिथे बसवून ऐकण्यासाठी भाग पाडे. असेच काहीसे थोड्या फार फरकाने लाखो घरात होई. १९५५ साली रामनवमी म्हणजे १ एप्रिल ला सुरू झालेले गीतरामायण अव्याहत १९ एप्रिल १९५६ पर्यंत चालले, एकंदरीत ५६ गीतपुष्पे सादर केली गेली, सर्व लोक त्याने इतके भारावले गेले की आजही या मालिकेला ६६ वर्षे होऊनही मराठी माणूस सहज यातील कोणतेही गाणे ओळखतो.
भारतातील दूरचित्रवाणी ची सुरुवात होण्याआधी ४ वर्षे , १९५५ साली आकाशवाणी पुणे चे केंद्रसंचालक सीताकांत लाड यांना उद्बोधक आणि मनोरंजक असा कार्यक्रम सादर करावासा वाटला, ते करताना त्यांना लोकांसमोर आपला सांस्कृतिक वारसा ठेवायचा होता. आपल्या मनातील कल्पना त्यांनी गदिमा यांच्याकडे मांडली. गदिमा यांनी गेय काव्याचे स्वरूप द्यायचे ठरविले आणि आपले परममित्र बाबूजी (सुधीर फडके) यांना या उपक्रमात गुंतवून घेतले!
पहिले वहिले गीतपुष्प म्हणजे “स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती” त्याला मिळालेला प्रतिसाद एव्हढा स्फूर्तिदायक होता ही पुढे वर्षभर गदिमा आणि बाबूजी आठवड्यात एकदा भेटायचे आणि एक एक गाणे तयार व्हायचे. एक वर्षाची ही मालिका ठरली होती, पण त्यावर्षी अधिक मास आल्यामुळे ५६ आठवडे चालली.
विद्याताई माडगूळकर यांनी पहिल्याच कार्यक्रमात झालेली एक हृद्य आठवण आहे: गदिमांनी आदल्या दिवशी बाबूजींना काव्य लिहून दिले. बाबूजींनी नेमके ते हस्तलिखित गहाळ केले. आली का पंचाईत! रेडिओ प्रक्षेपण ठरल्या वेळी होणार म्हणून सीताकांत लाड यांनी गदिमांना परत काव्य लिहिण्याची विनंती केली. गदिमा रागावले आणि त्यांनी सरळ नकार दिला. या धर्मसंकटावर उपाय काय शोधला असेल?
चक्क लाड यांनी एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये लेखन साहित्य ठेवून दिले व गदिमांना त्यात कुलूपबंद करून ठेवले, वर सांगितले की कविता लिहिल्याशिवाय तुमची सुटका होणार नाही! गदिमा थोर!! त्यांनी पंधरा मिनिटात हे काव्य सुरुवातीपासून लिहून काढले आणि बाबूजी ही तितकेच थोर! त्यांनी वाद्यवृंदातील कलाकारांना राग आणि ताल सांगून सरळ रेडिओ वर गायन केले!
अशी ही सुरुवात! ही मालिका एव्हढी लोकप्रिय झाली की शनिवारी पुण्यातील सर्व वृत्तपत्रे काव्य छापून लोकांपर्यंत पोचवायची. या सर्व ५६ कवितांचा संग्रह १९५७ मध्ये विजयादशमी च्या दिवशी प्रसिद्ध केला.
बहुतेक सर्व गीते बाबूजींनी शास्त्रीय संगीताचा वापर करून रागांमध्ये बांधली आहेत. त्यात मधुवंती, भोपाली, भीमपलासी या रागांचा जास्त वापर आहे. पण गाण्याचा प्रसंग आणि त्यातील भावनांची जाण ठेवून ही निवड केली आहे. चला राघवा चला हे गाणे चंद्रकांत गोखले यांनी बिभास या रागात म्हटले आहे, कारण तो सकाळचा राग आहे आणि ती घटना सकाळी घडते.
त्यावेळचे सर्व प्रसिद्ध गायक- गायिका या मालिकेत गाऊन सहभागी झाले आहेत. वसंतराव देशपांडे, सुरेश हळदणकर, राम फाटक, स्वतः सुधीर फडके, बबनराव नावडीकर, गजानन वाटवे, इनामदार, आणि बायकांमध्ये माणिक वर्मा, मालती पांडे, ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदींनी देसाई, सुमन माटे, जानकी अय्यर, कालिंदी केसकर, (या तिघींच्या आवाजात राम जन्मला ग सखी हे अप्रतिम मिश्र मांड मधील गाणे आहे) उषा अत्रे, योगिनी जोगळेकर, कुमुदिनी पेडणेकर (यांच्या नावाने एक रस्ता आमच्या घराशेजारी आहे), प्रमोदीनी जोशी, एव्हढेच नव्हे तर दस्तुरखुद्द लता मंगेशकर यांनीही मज सांग लक्ष्मणा ही जोगीया रागातील रचना शेवटी शेवटी गायली! अर्थातच बाबूजींनी गीतरामायण सुरू केले, त्यांनीच शेवटची रचना भैरवी मध्ये “गा बाळांनो श्रीरामायण” १९ एप्रिल १९५६ ला म्हणून या अद्वितीय मालिकेची सांगता केली!
गदिमा आणि बाबूजी या गीतमाले ने खरोखर अमर झाले. प्रत्येक मराठी भाषिक माणसाच्या हृदयात कायमचे कोरले गेले!
आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या दोन महापुरुषांना साष्टांग दंडवत, असे काव्य आणि अशा संगीत रचना पूर्वी झाल्या नाहीत की यापुढेही होणार नाहीत!!
10 replies on “अमर सांस्कृतिक ठेवा”
गीतरामायण अजरामर आहे , सर्वच गीते एकापेक्षा एक चांगली आहेत , पण गाण्याचे शब्द आणि अचूक शब्दफेकीने आणि ताकदीने गायिलेले योगिनी जोगळेकरांचे सूड घे त्याचा लंकापती मला सर्वात जास्त आवडते.
LikeLiked by 1 person
उडदामाजी काळे गोरे, सर्वच मंतरलेल्या रचना आहेत, सर्वच अप्रतिम आणि अविस्मरणीय आहेत
LikeLike
Geet Ramayan ek sundar kalakruti GA. DI. MA. V Babuji yanchya kadun nirmit jhali. Ati uttam shabdankan aani sundar chali mule Geet Ramayan ajaramar jhale.
Yache atyant chhan padhtine prastutikaran kel aahe. Khup mahiti milali. Apratim .
LikeLiked by 1 person
धन्यवाद उदय
LikeLike
खरेच मंतरलेले दिवस होते ते !
LikeLiked by 1 person
अगदी, इतक्या वर्षांनी सुद्धा ऐकाविशी वाटतात
LikeLike
गदिमा आणि सुधीर फडके जी हे दोघेही महापुरुष होते…. गीतरामायणातील प्रत्येक काव्य हे गदिमांच्या प्रतिभेचा उत्तम नजराणा आहे…..त्याला दिलेले सुधीर फडके जी चे संगीत तसेच स्वतः सुधीर फडके जींचे प्रत्येक गाण्याचे प्रास्ताविक आणि विवेचन कितीही वेळा ऐकले तरी दर वेळी तितकेच उत्कट भाव मनात तरळतात आणि तितकेच गोड वाटते ऐकायला…..
तसेच सर्व गायकांचे गायनही तितकेच अप्रतिम…..
आमच्याकडे गीतरामायणाच्या कॅसेट्स होत्या त्या बऱ्याच वेळा घरी लावल्या जायच्या…
त्याच्या खूप सुंदर आठवणी आहेत…..दिवाळीच्या पहिल्या दिवशी रेडिओ वर पहाटे गीतरामायणातील गाणी नंतर मी लहान असताना बऱ्याच वेळा लागायची…..
गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी गदिमा आणि बाबूजींनी उभारलेली शब्दं काव्य संगीत रुपी गुढी हा सगळ्यांसाठीच एक सुवर्णमय कायमस्वरूपी ठेवा आहे..
त्यांना मनापासून दंडवत…..
आजच्या दिवशी खूप सुंदर आठवणीतला ठेवा पुन्हा उलगडल्याबद्दल तुमचे मनः पूर्वक आभार अनिरुद्ध सर आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आमच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…..आणि नमस्कार…..🙏🙏💐💐
LikeLiked by 1 person
खरे आहे, दोघेही मातब्बर
LikeLike
Geet Ramayan ek advitiya kalakruti. Thanks for sharing many unknown facts.
LikeLiked by 1 person
Thanks Devaki
LikeLike