
मुरलीधर नारायण गुप्ते – म्हणजेच कवी बी यांची ही कविता, गेल्या पन्नास -पंचावन्न वर्षांपासून ऐकतो आहे. लताबाईंचा त्याकाळचा मधाळलेला आवाज आणि वसंत प्रभूंची सर्वांगसुंदर यमन रागात बांधलेली अतिशय सुंदर चाल. मुळातच मराठी भावगीतांच्या विश्वात एकापेक्षा एक सुंदर श्रवणीय रत्ने आहेत. सुंदर अर्थपूर्ण शब्द, अप्रतिम संगीत, व सुरेख गायन यांचा त्रिवेणी संगम झाल्याचे परत परत पहायला मिळते. पूर्वी रेडिओ वर उच्च प्रतीचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. रेडिओ केंद्रांवर सुजाण कार्यक्रम निर्देशक असत. आजच्या सारखा बाजारू प्रकार नव्हताच. विचार करा असे नसते तर सर्व मराठी मनांवर ७ दशकांपासून राज्य केलेल्या गीत रामायणा सारख्या अजरामर कृतीची निर्मिती होऊ शकली असती का? सुधीर फडके उर्फ बाबूजी, गदिमा यांना श्रेय देताना, या शृंखले ची निर्मिती करण्याची मूळ कल्पना होती आकाशवाणी पुणे केंद्राचे केंद्र निर्देशक श्री सीताकांत लाड यांची!! लाड साहेबांनी बाबूजींना आपल्या मनातली कल्पना बोलून दाखवली आणि बाबूजींनी ती स्वीकारून लगेच गदिमांच्या बरोबर एका सर्वार्थाने थोर कलाकृती साकारली.
चाफा बोलेना हे लताबाईंचे गाणे शेकडो वेळा ऐकले असेल, पण त्यातला मतितार्थ कळायला आजचा दिवस उजाडला. माझ्या आईबरोबर श्री ज्ञानेश्वरीचे रोज वाचन चालू आहे, अठराव्या अध्यायात पोचल्यावर डोक्यात लख्ख प्रकाश पडला. या गाण्याबद्दल असलेली मूढावस्था बऱ्याच अंशी संपली.
बींची चाफा तशी मराठी भावविश्वातली एक अत्यंत सुपरिचित कृती. या कवितेला वाचल्यावर लताबाई या कवितेवर गाणे व्हावे म्हणून खूप उत्सुक होत्या. त्या प्रथम श्रीनिवास खळे यांच्याकडे गेल्या. पण अक्षर, गणवृत्त, व मात्रावृत्ताने कोठेच बंदिस्त नसलेल्या या कवितेचे गाणे करण्यास त्यांनी नकार दिला असे म्हणतात. पुढे इतरांबरोबर त्यांना हाच अनुभव आला. पण लताबाईंची चिकाटी मानलीच पाहिजे! त्या वसंत प्रभूंच्या कडे गेल्या. प्रभूंनी मूळ कविता बऱ्याचवेळा वाचली आणि त्यातली निम्मी म्हणजे फक्त ६ कडवी घेऊन एक निर्विवादपणे अजरामर निर्मिती केली.
मूळ कविता
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या फुलेना ।। धृ ।। गेले आंब्याच्या वनी, म्हटली मैनांसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून रे ।। १ ।। गेले केतकीच्या वनी, गंध दरवळला मनी
नागासवे गळाले देहभान रे ।। २ ।। आले माळ सारा हिंडून, हूंबर पशूंसवे घालून
कोलाहलाने गलबले रान रे ।। ३ ।। कडा धिप्पाड वेढी, घाली उड्यावर उडी
नदी गर्जून करी विहरण रे ।। ४ ।। मेSघ धरू धावे, वीज चटकन लवे
गडगडाट करी दारुण रे ।। ५ ।। लागून कलिकेच्या अंगा, वायू घाली धांगड धिंगा
विसरुनी जगाचे जगपण रे ।। ६ ।।। सृष्टी सांगे SS खुणा, आम्हा मुखस्तंभ राणा
मुळी आवडेना ! रे आवडेना ।। ७ ।। चल ये रे ये रे गड्या, नाचू उडू घालू फुगड्या
खेळू झिम्मा झिम् पोरी-झिम्-पोरी-झिम् ।। ८ ।। हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे ।। ९ ।। जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुध्द रसपान रे ।। १० ।। दिठी दीठ जाता मिळून, गात्रे गेली पांगळून
अंगी रोमांच आले थरथरुन रे ।। ११ ।। चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून, कोण-मी-चाफा ? कोठे दोघे जण रे ।। १२ ।।
अशी ही १२ कडव्यांची कविता, प्रभूंनी ३,४,५,६,७ आणि ११ वी कडवी गळून एक अविस्मरणीय रचना केली, ती गाण्यात बांधताना त्यात गायनाच्या दृष्टीने काही त्यांना वाटले तसे यथायोग्य बदलही केले. ती आता काहीशी अशी झाली (याच स्वरूपात आपण सर्व मराठी संगीतप्रेमी बांधव गेले सुमारे ६० वर्षे ऐकतोय!)
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना।। धृ।। चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना।। चाफा बोलेना…
गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी,
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी,
नागासवे गळाले देहभान रे,
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगड्या,
खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम झिम पोरी झिम
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना चाफा बोलेना…..
हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण रे,
उणे करु आपण दोघे जण रे,
उणे करु आपण दोघे जण रे,
जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे,
आपण करु शुद्ध रसपान रे,
चाफा फुले आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून,
कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे…
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना, चाफा बोलेना
आचार्य अत्रे यांनी या कवितेच्या बद्दल “प्रेमाचे नितांत सुंदर सूक्त आहे” असे म्हटले आहे.
पूर्ण कविता नेटवरून मिळवून वाचली, मनातला गुंता अजूनच वाढला.
मग गाणं ऐकताना आज असे वाटले:
‘चाफा’ हे कवीच्या कवितेचं आणि काव्यप्रतिभेचंच प्रतीक आहे असे वाटले.
ही कविता म्हणजे त्यांच्या स्वतः च्या मनाशी केलेलं आत्मपरीक्षणच आहे.
कवितेमागची प्रेरणा, निर्मिती आणि विचार या रचनेतून समजते. बी यातून आपल्या प्रवासाचीच कथाच मांडताहेत.
“चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना”, इथं न बोलणारा, न चालणारा, खंत करणारा ‘चाफा’ म्हणजे कवीवर रुसलेली काव्यप्रतिभाच! नवनिर्मिती होत नाही, काही सुचत नाही असा काहीसा सरळ साधा अर्थ. पण सध्या श्री ज्ञानेश्वरी वाचत असल्याने मला असे वाटले की सांसारिक गुंत्यात गुंतलेल्या मानवी मनाला आपली वैचारिक आणि आध्यात्मिक प्रगती होत नाही याची खंत वाटते आहे. कितीही प्रयत्न केले तरी प्रपंचात अडकून पडण्याचे दुःख आणि विषाद दिसतोय यात.
पहिल्या कडव्यात:
गेले आंब्याच्या वनी, म्हटली मैनासवे गाणी, आम्ही गळ्यात गळे मिळवून रे, यात वरवरचा अर्थ काढायचा तर “आंब्याच्या बागेत गेलो, पक्ष्यांच्या मधुर कूजनात सुरात सूर मिळवून गाणी गायली आणि खूप मजा केली” असा काहीसा निघू शकतो…. पण वेगळ्या दृष्टीने पाहिल्यास अशा प्रापंचिक गोष्टी उथळ व क्षणभंगुर सुख देणाऱ्याच असतात, त्यांतून शाश्वत आणि चिरंतन काही मिळणार नाही असेच समजावेसे वाटले मला.
दुसऱ्या कडव्यात: “गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी, नागासवे गळाले देहभान रे” म्हणजे एका ठिकाणी मन पुरेसे रमले नाही म्हणून चंचल वृत्तीचे आपण सुखाच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी पटकन निघून जातो. ऐहिक सुखाच्या कल्पनांचा आपल्या मनावर खूप पगडा बसला आहे ते दिसते. केतकीच्या म्हणजे केवड्याच्या बनात सुवासाने धुंद होऊन नागोबा येऊन बसतात म्हणे. खरेतर सर्पांचे घ्राणेंद्रिय इतके विकसित नसते, पण यावेळी कवीच्याच दृष्टीने विचार करूया. आध्यात्मिक विचार केल्यास सुखाच्या शोधास आणि उपभोगास चटावलेले मानवी मन सांसारिक गुंत्यात कुठेच तृप्त होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण पूर्ण स्वच्छ मनाने आणि दृष्टीने पाहत नाही आणि विचार करत नाही, तोपर्यंत आपण वास्तव पाहू-जाणू शकत नाही.
चल येरे येरे गड्या, नाचू उडू घालू फुगड्या, खेळू झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम् … वरवरचा विचार हे लहानपणीचे खेळांची आठवण करून देतात. मन रमविण्यासाठी आपण तऱ्हेतऱ्हेचे खेळ लहानपणी खेळत असू, त्यावेळेपुरता का होईना खूप आनंद देऊन जायचे हे खेळ. खोलात शिरून बोलायचे झाल्यास मुमुक्षु जीव असल्या पोरखेळांमधून आपल्याला काहीच साध्य होणार नाही हे जाणून असतो, त्यामुळे तो असल्या ऐहिक गोष्टीत कधीच रममाण होत नाही, नेहमी सर्वच गोष्टींकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन हा पारमार्थिक, शाश्वत तत्वांच्या, ज्ञानाच्या आणि आत्मानुभवानंद मिळवण्यासाठीच असतो. त्याच्या सर्व कृती, विचार आणि आचारा तून हेच दिसून येते. प्रत्येक ठिकाणी त्याला तीव्रतेने आंतरिक ओढ दिसून येते. मुमुक्षु नेहमीच उच्च भावानुभूतीच्या शोधात ईश्वरी भक्तीच्या सागरात डुंबत राहतो.
बी म्हणतात ‘हे विश्वाचे आंगण, आम्हां दिले आहे आंदण, उणे करूं आपण दोघेजण रे’…
म्हणजे सर्व विश्वची माझे घर, आम्ही कुठेही जाऊन आपला आनंद मिळवण्याचा कार्यभाग साधू शकतो. सर्वच गोष्टी आम्हाला प्रेरणादायी आणि आनंददायी भासतात. आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर सर्व विश्व आम्हाला तुझीच भक्ती करण्याची प्रेरणा देते, मोक्षाचीच वाट दाखविते. हा मार्ग पार पाडण्यासाठी एक आयुष्य कदाचित उणेच पडेल.
पुढच्याच कडव्यात बी आपल्या मनातील विचार उघड करतात:
‘जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे, आपण करु शुद्ध रसपान रे‘.
बी म्हणतात की मानवी मन विश्वाच्या बाह्यरुपाकडं, भौतिकतेकडं, वैषयिकतेकडं सहज आकर्षिले जाते. लगेच आपले ध्येय विसरून वाकड्या वाटेवर लागते. पण मुमुक्षुला माहीत असते की ‘शुद्ध रसपान’ उपभोगायचे असेल तर भौतिकतेला सोडून , ऐहिक सुखांना हेतुपुरस्सर त्यागून परमात्म्याचा शोध घेण्याचा अविरत ध्यास आपल्या चंचल मनाने घ्यायला हवा. त्यासाठी काया-वाचे-मने परमात्म्याचाच ध्यास कायम घ्यावा. हे ध्येय जितकं कठीण तितकंच शाश्वत समाधान देणारे आहे.
यापुढचं कडवं प्रभूंनी गाण्यातून गाळले आहे, त्यात खूप महत्त्वाची कल्पना मांडली आहे: ती समजून घेण्यासाठी मी मुद्दाम या ओळी मूळ कवितेतून उद्धृत केल्या आहेत.
बी म्हणतात: – “दिठी दीठ जातां मिळून, गात्रे गेली पांगळून, अंगी रोमांच आले थरथरून’
यातला दिठी म्हणजे दृष्टी हा अर्थ माऊलींच्या अमृताचे सेवन केल्याने कळू लागला आहे.
बी म्हणतात माझी दृष्टी, माझं मन जेंव्हा परमात्म्यात एकरूप होईल तेंव्हा ही ऐहिक जगातील वस्त्रे गळून पडतील आणि माझ्या आयुष्यातील खरे ध्येय साध्य होईल. ते होईल या कल्पनेनेच माझ्या सर्वांगावर रोमांच फुलले आहेत.
बींनी शेवटच्या ओळीत कमालच केली आहे!! “चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी – चाफा! कोठे दोघेजण रे?”
ते म्हणतात “माझी प्रतिभा अशी फुलावी की तिच्या जोरावर अंतिम मुक्तीचे ज्ञान मिळावं. त्या ज्ञानाच्या असीम तेजानं सगळ्या दिशा अशा काही उजळून निघतील की मी-माझं काव्य असे द्वैत राहणारंच नाही, हा ‘मी’ आणि ‘माझे’पणाचा हव्यास कायमचा विरून जाईल आणि माझं काव्यच नाही, माझे संपूर्ण अस्तित्वच परमात्म्यात विलिन होईल, आणि त्याचाच अंश बनून राहील! मी आणि माझी प्रतिभा खऱ्या अर्थाने एक होऊन जाऊ. आध्यात्मिक दृष्ट्या मी आणि माझा परमेश्वर यांच्यातील दुजाभाव संपून मी त्याच्यात विलीन, एकरूप होऊन जाईन..”
ता.क. आध्यात्मिक क्षेत्रात नव्याने प्रवेश केलेल्या माझ्यासारख्या पामराच्या दृष्टिदोषामुळे आणि बुद्धीदोषामुळे काही चूक झाली असल्यास जरूर ज्ञानी व्यक्तींनी मार्गदर्शन करावे, जेणेकरून माझ्या विचारांची प्रगल्भता वाढेल आणि माझा या वाटेवरचा प्रवास जास्त अर्थपूर्ण होईल.
श्रीकृष्णार्पणमस्तु।
मकरंद बापटजी आपले शतशः धन्यवाद. आज या सर्वांगसुंदर गाण्याची आठवण करून दिलीत आणि माझ्या विचारांना चालना दिलीत.
19 replies on “चाफा बोलला, आणि चालला ही…”
Beautiful, informative…
LikeLiked by 1 person
Thanks Anjali
LikeLike
Very nice write-up sir.
LikeLiked by 1 person
Thanks dear. Stay safe
LikeLike
अप्रतिम.. मी पण हे गाणं रेडिओ वर च जास्त ऐकले आहे..आपण फक्त गाणं म्हणून अन् वर वरचा अर्थ लक्षात घेऊन पण तुम्ही ज्ञानेश्वरी ची सांगड घालून जो खरा गाभार्थ उलगडून मांडला आहे खरंच खूप व्यापक आहे.. 🙏
LikeLiked by 1 person
साध्या अर्थात आणि शेवटच्या दोन कडव्यांची सांगड बसतच नाही, कारण त्यांचा रोख वेगळाच आहे.
LikeLike
Old is gold..
LikeLiked by 1 person
Yes indeed
LikeLike
द्वैताकडून अद्वैताकडे जाणारा प्रवास ह्या अतिशय प्रिय गाण्यात वर्णिला आहे. तो डॉक्टर साहेबांनी नीट ओळखलाय ! अप्रतिम लेख 👍🏼🙏
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
उत्तम लेखन…. आणि छान माहिती Thank you Sir….
कवीचे काव्य गाण्यात बसवण्यासाठी मोडल्यामुळे अर्थ विस्कळीत झाला…. त्यामुळे ही सुंदर कविता सगळ्यांसाठी कायम एक गूढार्थ बनून राहिली…. हे दुःख आहे…. बाकी गाणे छानच आहे….
कुठल्याही कलाकाराच्या कलात्मक अभिव्यक्तीमध्ये आपल्या सोयीसाठी बदल करू नये असे मला वाटते.. त्यासाठी वेगळे काव्य त्याच्याकडून लिहून घ्यावे…..
LikeLiked by 1 person
नाही, मी मूळ गाण्यातील गाळलेल्या ६ कडव्यांपैकी एकच वापरले, पण गाण्यातील ६ कडव्यातून संपूर्ण अर्थबोध नक्कीच होतो. वरवर वाचून किंवा ऐकून गोंधळ उडल्यास आपला दृष्टिदोष समजावा. कवी किंवा संगीतकारांनी अर्थ समजण्यास अवघड केला नाही
LikeLike
गाण्याचं विश्लेषण एकदम मस्त!
खूप वर्षांनी मी हे गाणं परत ऐकलं!
LikeLiked by 1 person
धन्यवाद शेखर दादा
LikeLike
गाण्याचं अत्यंत सुंदर विश्लेषण व प्रस्तुती. एक वेगळाच दृष्टिकोन लक्षात आला. तुमची अभ्यासू वृत्ती व ज्ञानेश्वरी चा अभ्यास कौतुकास्पद आहे. अप्रतिम.
LikeLike
खरच गाने तर सुरेख आहेच पण त्याचा गर्भित अर्थ तुम्ही उलगडून दाखवला ते खूप अप्रतीम आहे नाहितर फक्त गाण माहित होते.
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
हे गाणं शाळेत पहिल्यांदा भेटलं ते कविता म्हणून! तेव्हाही द्वैत-अद्वैत हा अर्थ शिक्षकांनी समजावला होता. पण यात तू मांडलेला अर्थ आणि ज्ञानेश्वरीशी घातलेली सांगड हे नवीन होतं. मस्स्त लिहिलं आहेस. बाकी ज्ञानेश्वरी तुझ्या किती हृदयाजवळची झाली आहे, हे कळतंच आहे.
LikeLiked by 1 person
धन्यवाद नीतू, हो आता पुढच्या आठवड्यात दासबोध सुरु करतो आहे
LikeLike