Categories
Uncategorized

अवघा रंग एक झाला

आज देवशयनी एकादशी! आषाढी एकादशी असेही म्हणतात हिला! महाराष्ट्रातील लाडके दैवत पंढरीनाथ महाराज श्रीविठ्ठल याचे दर्शन घेण्यासाठी संबंध राज्यभरातील लाखो भाविक दरवर्षी पायी चालत पंढरपूर येथे जातात आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात.

आज सकाळपासूनच सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. अगदी टाळमृदुंगाच्या गजराने घर पावन झालेले. त्यात हे गाणे लागले

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या दैवी आवाजातील एक अवीट रचना. ऐकून धुंद झालेच पाहिजे आणि डोळे पाणावलेच पाहिजेत, त्या रसात मन रंगून गेलेच पाहिजे.

संत सोयराबाई यांची रचना, किशोरीताई यांनी स्वरबद्ध केली आहे… मराठी जनमानसात अमरच केली आहे

अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।१।।
मी तूपण गेले वाया । पाहतां  पंढरीच्या राया ।।२।।
नाही भेदांचे तें काम । पळोनि गेले क्रोध काम ।।३।।
देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ।।४।।
पाहता पाहणे गेले दूरी। म्हणे चोखियाची महारी ।।५।।
 । गीतकार : संत सोयराबाई ।  

सोयराबाई म्हणजे संतश्रेष्ठ चोखामेळा यांची पत्नी व शिष्या! पंढरपूरच्या जवळचे एक गाव मंगळवेढा, तेथे संत चोखामेळ्यान्चे वास्तव्य होते. हा अभंग दिसतो तेव्हढा साधा नाही. चोखामेळा व सोयराबाई हे दलित समाजातील होते. तत्कालीन सामाजिक स्थितीत त्यांना काय भोगावे लागले असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. त्यातून चोखामेळ्याचे आयुष्य पंढरीनाथांची भक्ती करण्यात व अभंग लिहिण्यात गेले- म्हणजे त्यांची विठ्ठलभक्ती न समजणाऱ्या/जाणणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीने निरर्थक कामात वाया गेलेले. सुंदर शब्द,उत्तम कर्म आणि निरलस भक्ती यांची अत्युच्च पातळी गाठणाऱ्या संत सोयराबाई, एक श्रेष्ठ संत, पांडुरंग भक्त आणि संत चोखामेळ्यान्च्या पत्नी व शिष्या होत्या. महार समाजात जन्माला आलेल्या संत सोयराबाई आणि त्यांचे यजमान म्हणजेच संत चोखामेळा यांना अनेक यातना, उपेक्षा आणि प्रसंगी प्रतारणा देखील भोगाव्या लागल्या. हाल सोसून विठ्ठलाच्या भक्तीत एकनिष्ठ राहणे किती अवघड झाले असेल!

“अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥

संत सोयराबाईंनी त्यांचे अंतर्मनातले विचार प्रकट केलेले आहेत. अवघा म्हणजे मजजवळ असलेले सर्व काही. माझा सर्व रंग, म्हणजे माझे अस्तित्वच परमेश्वराशी एकरूप झाले म्हणजे या रंगांत श्रीरंग म्हणजेच परमेश्वराचा निवास झालेला आहे!

संत सोयराबाई जणू स्वतःला आणि जमलेल्या/ऐकणाऱ्या सगळ्यांना उद्देशून म्हणत आहेत की हा संबंध विठ्ठलभक्तीचा परिसर! चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व भेदाभेद विसरून, सर्व वारकरी एक होऊन त्याच्यामध्ये आता फक्त एकच तत्त्व उरलेले आहे ते म्हणजे श्रीरंग म्हणजे विष्णू किंवा विठ्ठल याची निरपेक्ष भक्ती! 

“मी तूंपण गेले वायां । पाहतां पंढरीचा राया ॥”

  मी तूंपण म्हणजे भेदाभेद, द्वैत. खरे तर सर्व वारकरी हे विष्णुभक्त आणि अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते होते. महाराष्ट्रात एव्हढे प्रगत आणि इतके प्रगल्भ विचार इतक्या शतकांपासून चालत असून सुद्धा आपल्या मनातून अजून जातीव्यवस्था नाहीशी होत नाही, हे आपले दुर्दैवच! अद्वैत सिद्धांतानुसार संपूर्ण चराचर सृष्टीचा गाभा, तो दिव्यात्मा एकच आहे आणि तोच ईश्वर आहे. त्याचाच जर अंश आपल्या सर्वांत आहे, तर यात मी आणि तू या भेदाचे अस्तित्व कसे असू शकेल? हा भेदाभेदविचार संपला, वाया गेला असे संत सोयराबाई ठामपणे म्हणतात. आणि हे सर्व कधी होते? विठ्ठलाच्या सान्निध्यात, त्याचे शांत रूप “पाहतां पंढरीचा राया” सर्व द्वैत संपून अद्वैतात आपण सर्व शिरतो!

पांडुरंगाला पाहिल्यावर ही अशी मनाची अवस्था होणं हे स्वाभाविकच आहे. पण मला वाटते कि संत सोयराबाईंचे शब्दांना वेदनेची झालर आहे. त्या अपार भक्तीच्या भावनेमागे अनेक दुःख आणि यातना दडलेल्या आहेत. जातीने महार असल्यामुळे त्या काळी संत सोयराबाई आणि संत चोखामेळा यांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेशच निषिद्ध होता! कल्पना करा, ज्याचे तुम्ही भक्त आहात, ज्याला बघण्याची आस दिवसरात्र लावून ठेवलेली आहे त्याचे दर्शन घ्यायची परवानगी तुम्हाला नाही! वारकरी संप्रदायात एव्हढे मोठे स्थान असूनही हे दोघे बहिष्कृतच!!

आता “पाहतां पंढरीचा राया” या शब्दांमागील आर्तता व करुणा तुमच्या लक्षात येईल. हे दुःख , हीच कैफियत संत चोखामेळा यांनी देखील “उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन” या शब्दांत मांडलेले आहे! आता तुमच्या लक्षात येईल की फक्त दर्शनाने संत सोयराबाईंच्या मनाची ही अवस्था कशी झाली असेल. असीम वेदनेने ओतप्रोत भरलेले हे शब्द!

“नाही भेदाचें तें काम । पळोनि गेले क्रोध काम ॥”

 वारकरी संप्रदाय आणि आपली संत मंडळी अद्वैतात विश्वास ठेवणारे असल्याने, सगळ्यात एकाच दिव्य आत्मा अंशरूपात असला तर यात भेदाभेद कसा आला? हे संत सोयराबाई सांगतात.

त्यामुळे भेदाभेदाची ही भावना संपुष्टात आली व क्रोध आणि काम पळून गेले, नाहीसे झाले. क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे वासना, हव्यास, आसक्ती, इच्छा, आकांक्षा. एखादी गोष्ट आपल्याला हवी(च) ही भावना.

“देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥”

ही ओळ म्हणजे परमेश्वराचे मोठेपणच. देही असोनि विदेही म्हणजे देहात असूनही देहाच्या अस्तित्वाची जाणीवच नसणे. थोडक्यात देहात राहूनही देहातून मुक्ती होऊन निर्विकार-निर्गुण अशी अवस्था प्राप्त होणे. हे म्हणजे निःशंक परमेश्वराच्याच भक्तीचेच वर्णन. संत सोयराबाई त्या ईश्वराला सदा समाधिस्त बघत आहेत. म्हणजे भक्त ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होऊन देहात (चर सृष्टीत) असूनही विदेही अवस्था प्राप्त करतो आणि जिवंतपणी समाधीस्थ होऊन मुमुक्षु होऊन जातो!

“पाहता पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥

आपल्या ईष्टदेवतेचे, पांडुरंगाचे दर्शन न घडल्यामुळे झालेली संत सोयराबाईंच्या मनाची अवस्था आहे. एकदा परमेश्वराचे रूप पाहिले की जगात आणखीन बघण्यासारखे काय उरते? संत चोखामेळा आणि संत सोयराबाई अनेकदा पंढरपूरला गेले असतील. दोघांवर संत नामदेव यांचा खूप स्नेह होता. पंढरपूरला जाऊन केवळ जन्माच्या परिस्थितीमुळे पांडुरंगाचे दर्शन नाही! असे कैक वेळा घडले असणार आहे. 

जे रूप बघण्याची आस होती, ते न पाहिल्यामुळे इतर जगात काय बघायचे? उरलेले नाही म्हणजेच “पाहता पाहणें गेले दूरी” ते जे काही पाहणे राहिलेले होते ते आता आणखी दूरच राहिले: म्हणे चोखियाची  महारी. पतिव्रता संत सोयराबाई स्वतःला संत चोखामेळा यांची महारी (महार वरून महारी) म्हणत असत. एवढा सुंदर भाव व्यक्त केला आहे, एका अशिक्षित, समाजाच्या उपेक्षित घटकामधल्या एका साध्यासुध्या गृहिणीने!

ईश्वरी भक्तीत तल्लीन होऊन केलेली रचना किती सुंदर आहे ते पहा. शब्दांचं बोजा नाही, अलंकारिक आणि प्रासादिक भाषेचं अवडंबर नाही, उगाच लांबलचक फापटपसारा नाही. थोडक्या पण अचूक शब्दांत अप्रतिम अभिव्यक्ती!

सर्व विठ्ठलभक्तांना आजच्या पावन दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! पुढील दिवसांत दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात… अशी अवस्था होऊ द्यात म्हणजे पंढरीच्या रायाचे डोळे भरून दर्शन तरी घेता येईल!

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

31 replies on “अवघा रंग एक झाला”

Simple words but oceanic depth & means.. one needs equally pure perspective to understand creations of these great saints 🙏🏻🙏🏻🙌

Liked by 1 person

खूपच सुंदर.. सकाळी अभंगवाणी, बोलवा विठ्ठल, पहावा विठ्ठल अन् हे गाणं पण ऐकलं..आणि खरं सांगायचं तर मी तुमच्या ब्लॉग ची वाट पण बघत होतो🙂.. ह्या रचनेची एवढी छान फोड करून सांगितल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏

Liked by 1 person

आत्ता रात्री १२.३० वाजता ऐकलं. सुंदर विश्लेशन. सोयराबाईंंबद्दल माहिती नव्हती. धन्यवाद.

Liked by 1 person

पुरुषोत्तम,
खरंच…..
विश्लेषण माहित नव्हते.
आभारी आहे.
🙏🙏🙏🙏

Liked by 1 person

फक्त ऐकून माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत, संत सोयराबाई यांच्या अभंगावर विश्लेषण करण्या इतकी माझी लायकी नाही आणि माझा अभ्यासही नाही, आपल्या टिप्पणी बद्दल धन्यवाद!

Like

अभंगाचे विश्लेषण फारच सुंदर त्यात किशोरीताईंच्या आवाज म्हणजे दुग्ध केसर योग झाला निव्वळ अप्रतिम

Liked by 1 person

अप्रतिम रचना आणि स्वर…..या सुंदर अभांगाचे तितकेच छान विश्लेषण केले आहे सर तुम्ही…..
संत सोयराबाई बद्दल माहिती नव्हती ती कळली…..
अजरामर अभंग…..
सर तुमचे आभार🙏🙏

Liked by 1 person

क्षमा, अभंग काल तळरात्री ऐकून फक्त माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत, संत सोयराबाई यांच्या अभंगावर विश्लेषण करण्या इतकी माझी लायकी नाही आणि माझा अभ्यासही नाही, तुझ्या टिप्पणी बद्दल धन्यवाद!

Like

अतिशय सुंदर विवेचन. फक्त पाहता पाहणे गेले दुरी इथे थोडे सुचवावे वाटते. द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे ती एकदा अद्वैत साधले की संपते त्यामुळे पाहता पाहणे गेले दूरी असे सोयराबाई म्हणतात

Liked by 1 person

काल रात्री अभंग ऐकून माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत, संत सोयराबाई यांच्या अभंगाचे विवेचन करण्या इतकी माझी लायकी नाही आणि माझा अभ्यासही नाही, आपल्या टिप्पणी बद्दल धन्यवाद! पण कोणत्याही साहित्यकृती चा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावला जाऊ शकतो की नाही? वाचणाऱ्याची मनस्थिती, त्यावेळचे विचार आणि भावनिक बैठक यावर ते अवलंबून राहील, या वाक्याचे मला तीन वेगवेगळे अर्थ सुचले, मी एकच लिहिला आहे! संत सोयराबाई यांची भेट झाली की त्यांना नेमका कोणता अभिप्रेत आहे ते विचारीनच

Like

ऐकून कान त्रुप्त झाले.
तुला सहज जे सुचतं ते आम्हाला प्रयत्न करूनही सुचत नाही.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s