Categories
Uncategorized

निरोप घेताना….

लता मंगेशकर यांनी हजारोंनी अप्रतिम गाणी आपल्या ७-८ दशकांच्या उज्ज्वल कारकिर्दीत कित्येक भारतीय (आणि इतरही) भाषांत गायली. कित्येक शे कोटी रसिकांच्या कानांत वर्षानुवर्षे आपल्या कंठातून अगदी अमृताचा वर्षाव केला. त्याबद्दल सर्व संगीतप्रेमी त्यांचे आयुष्यभर ऋणीच राहतील यात दुमत नाही.

पण माझी त्यांच्याबद्दल एक प्रामाणिक तक्रार आहे. त्यांनी स्वतःची गायिका म्हणून प्रतिमा जेव्हढी सर्वांच्या भावविश्वात मोठी केली, तेव्हढेच एका व्यक्तीला दुर्लक्षून त्या व्यक्तीच्या प्रतिभेवर अन्यायच केला. आणि मला हीही खात्री आहे की ही तक्रार त्यांच्यापर्यंत जरी गेली, तरी त्या रागावणार नाहीत माझ्यावर.

मी बोलतोय लता मंगेशकर या गायिकेकडून आनंदघन या अतिशय गुणी व्यक्तीवर झालेल्या अन्यायाबद्दल. आनंदघन या संगीतकारांनी अतिशय सुमधुर, श्रवणीय व खऱ्या अर्थाने चिरंतन असे संगीत दिले. मला आनंदघन यांची एकही रचना टाकाऊ कधीच वाटली नाही. हृदयनाथ मंगेशकर, बाबूजी म्हणजे सुधीरजी फडके यांच्या सुवर्णकाळात तोडीस तोड असे संगीत देणे हे येरागबाळ्याचे काम नोहे, पण आनंदघन यांनी ते शिवधनुष्य लीलया पेलले.

ही एक रचना पहा. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी चीन युद्धानंतर बनवलेली एक हृद्य कलाकृती: मराठा तितुका मेळवावा. आल्हाद, काशिनाथ घाणेकर व जयश्री गडकर यांच्या अप्रतिम भूमिका, दत्ताराम भाटवडेकर यांचे अविस्मरणीय नेत्रांचे पारणे फेडणारे सुंदर छायाचित्रण, आणि सर्व मराठी भाषिक लोकांच्या दोन दैवतांपैकी एक – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बेतलेला हा अतिशय सुंदर चित्रपट. याचे हे खऱ्या अर्थाने सर्वांगसुंदर असे गाणे.

सुरवातीच्या एका छोटयाश्या आलापानंतर, काहीश्या उदास सुरुवातीनंतर , संतूरचे स्वर आणि लताबाईंच्या एकमेवाद्वितीय आवाजात “अकेरचा तुला …” अशी एकदम श्रोत्यांच्या काळजाला हात घालणारी सुरुवात. (लताबाईंनी मुद्दाम अखेरचा असे न म्हणता अकेरचा असा उच्चार केला आहे आणि एक वेगळाच स्वाद आणला आहे) ६० च्या दशकात प्रतिध्वनी निर्माण करण्यासाठी संगीतकारांनी चातुर्याने लताबाईंच्या आवाजाला प्रतिसाद म्हणून त्यांच्या दोन धाकट्या बहिणींच्या आवाजाची (उषाताई व मीनाताई) व्यवस्था केली आहे. पडद्यावर मुसलमानांनी पळवून नेलेल्या बायका बैलगाडीत असहाय्यपणे उरलेले आयुष्य त्यांची बटीक (म्हणजे आजच्या भाषेत ‘सेक्स स्लेव’) होऊन रहायचे अशा खिन्न करणाऱ्या भावनेत बसलेल्या! भालजी मोठे शिवभक्त आणि राष्ट्रभक्त! त्यांनी नेमके मर्म ओळखून ते सुंदर दाखवले आहे, कुठेही विकृत किंवा बीभत्स न करता!

लहानपणी असे चित्रपट पाहताना आमच्या मनात भावनांचा कल्लोळ होत असे. भालजींनी या बाबतीत शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांच्या इतकेच , किंबहुना काकणभर उजवेच कार्य केले आहे. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावरचे सर्वच चित्रपट अप्रतिम आहेत. सर्वांनी खरेच परत परत बघावेत असेच.

गीतकार आहेत योगेश म्हणजे भालजी पेंढारकर स्वतः!

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव

दरीदरींतून मावळ देवा ,देऊळ सोडून धाव


तुझ्या शिवारी जगले, हसले, कडीकपारी अमृत प्याले

आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव


हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता

कुणी न उरला वाली आता,धरती दे ग ठाव

इतके सुश्रवणीय गीत रचले आहे स्वतः लता मंगेशकर यांनी. त्या संगीतकार म्हणून क्रियाशील असताना आनंदघन असे नाव वापरायच्या. त्यांनी भालजींच्या बऱ्याच चित्रपटात संगीत दिले. भालजींनी त्यांना मुलींसारखेच प्रेम दिले.

आता सांगा एव्हढ्या प्रतिभावंत संगीतकाराला पुरेसा वाव न देऊन लताबाईंनी एका परीने अन्यायच केला नाही का?

असो. हे माझे अतिशय आवडते गाणे तुम्हां सर्वांनाच आवडेल अशी खात्री आहे. आज जवळजवळ पन्नास वर्षांनंतरही हे तितकेच सुश्राव्य आहे. सर्वांगसुंदर अशी ही निश्चितच खऱ्या अर्थाने अमर कलाकृती आहे.

काळजी घ्या, चिनी विषाणूने थैमान घातले आहे, त्याला बळी पडू नका. वेळीच लस घ्या, आपल्या देशात जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.. आपण सर्वांनी वेळीच घ्या! शुभरात्री

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

48 replies on “निरोप घेताना….”

सुंदर काव्य….मन हेलावून टाकणारे…. हे भालजी पेंढारकर यांनी लिहिले आहे ही महत्त्वाची माहिती कळली ….
अप्रतिम संगीत आणि गायन…. लता मंगेशकर जी यांचे….
सगळे फारच सुंदर….Haunting melody…. कोणाच्याही मनाला रुखरुख लावणारे…..
वेळ मिळाल्यास हा चित्रपट जरूर पाहू.

बरीच नवीन माहिती या लेखाद्वारे समजली त्याबद्दल तुमचे मनः पूर्वक आभार अनिरुध्द सर…..🙏🙏

Liked by 1 person

जरूर पहा, योगेश हे नाव त्यांनी कवी म्हणून घेतले. त्यांच्या पणतू ला आम्ही याच नावाने हाक मारतो

Like

छान माहिती माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याबद्दलची..धन्यवाद

Liked by 1 person

माझें अत्यन्त आवडते गाणे। त्याच्याबद्दल बरीच माहिती आजच मिळाली।

Liked by 1 person

वाह वा सर. खूपच सुंदर गाण निवडलत🙏🏽अगदी खरय लताजींनी आनंदघन वर अन्याय केलाय अगदी खर✅👍
अकेरचा… आहे व योगेश म्हणजे भालजी .. आज कळल🤭
हल्का इको वापरून एक वेगळच गुढ रूप दिलय लताजींनी मला वाटत कुठलाच मराठी रसिक नसेल ज्याला हे गाण आवडत नसेल! अजरामर गाण🙏🏽👍👌

Liked by 1 person

तुम्ही मनातलं बोलला डॉक्टर. मला सुद्धा आनंदघन हया नावाने इतकी अप्रतिम चाल गाण्याला देणाऱ्या लताबाई ह्यानी ते करणं थांबवुन स्वतः वर, रसिकजणांवर खरच अंन्याय केल्या सारखच वाटत. आइरणीच्या देवा तुला हे सुध्दा आनंदघन ह्यांच एक माझ्या आवडीच अप्रतिम गाणं.
तुम्ही खूपच छान लिहिता…

Liked by 1 person

खूपच सुंदर लेखन आणि आपण व्यक्त केलेल्या विषयाला पूर्ण सहमत आहे, आज तुमच्यामुळे गाणे पुन्हा ऐकतोय आणि ऐकताना नवीन संदर्भ असल्याने अर्थ वेगळा लाभला

Liked by 1 person

अनेकानेक आवडलेल्या गाण्यांतून अधिक आवडलेलं हे गाणं
आणखीन एक ” निळ्या आभाळी कातर वेळी….
किती किती आठवतात

आईवडील गेल्या नंतर तेवढाच उद्वेग आणि खिन्नपणा आज वाटतोय

Liked by 1 person

Very true and rightly expressed !

आनंदघन was not mentioned anywhere on the channels even today .

एअरणीच्या देवा तुला….
माळ्याच्या मळ्यामंदी पाटा च पाणी जातं…
Few other melodies from आनंदघन

Liked by 1 person

या गाण्याची चित्रपटातील जागा अशा पार्श्वभुमीवर असेल असे वाटत नव्हते(चित्रपट पाहिलेला नाही). कदाचीत लताजींच्या सुरात(व संगीतात) घोळसलो जात असतांना या गाण्यांच्या मागे जी वेदना आहे ही इतिहासातील असली तरी आत्ताही मन पोखरणारी, उदास करणारी, आपल्या हताशेची जाणीव करुन देणारी आत्तापर्यंत भासली नव्हती. आता मात्र मनाला वेदना देतात. लतांजींच्या स्मरणानिमीत्तांने या वेगळ्याच भावना मनात आल्यात. तुमचे लिखाण नेहमीप्रमाणेच जबरदस्त व माहितीपूर्ण.

Liked by 1 person

धन्यवाद डॉ कुलकर्णी. दिदींच्या तेजस्वी आणि एकमेवाद्वितीय कार्याचे प्रतिबिंब माझ्या छोट्याशा आरशात दिसते आहे

Like

नेहमप्रमाणेच यातूनही माहिती नसलेल्या गोष्टी समोर आल्या….
अप्रतिम काव्य, संगीत आणि गायन….,👌👌🙏🙏

लतादीदींच्या अजरामर कलाकृती सहजपणे आपल्या आजूबाजूला वावरतात.. आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत… 🙏🙏

Liked by 1 person

Leave a comment