Categories
Uncategorized

आठवणींच्या बेटावर….

१९६६-६७ साली आम्ही पुण्यात आल्यावर मला आईबाबा एरंडवण्यात राजचंद्र नावाच्या बिल्डिंगमध्ये घेऊन गेले. माझी धाकटी बहीण खूपच लहान होती. कशासाठी जातोय हे काही तेव्हा मला सांगितले नव्हते. त्या काळी खरेतर मुलांना सांगायची पध्दतच नव्हती. “चल” म्हटल्यावर आम्ही गपचूप जायचो. आयुष्य किती साधे सरळ होते, शाळेचे कपडे सोडून ३-४ जोडच असायचे, घरचे २ आणि बाहेरचे २ म्हणजे बख्खळ!! सबंध वर्ष जायचे एव्हढ्या भांडवलावर. दिवाळीला एक नवा जोड मिळे. कोणाचे लग्न दिवाळीच्या आसपास आले तर ते कपडे तेव्हा शिवले जायचे. मुलींची त्यामानाने जास्त चैन असे, म्हणजे माझ्या बहिणीला शाळेत जाण्यापूर्वीच १५-२० फ्रॉक होते. तेव्हढ्या मॅचिंग रिबीनी पण होत्या. माझ्या बरोबरच्या सर्व मुलांना मात्र माझ्यासारखीच स्थिती असे. असो, ते दिवसही गेले आणि एकेकाळी चैन असणारी गोष्ट गरज होऊन बसली…

राजचंद्र मध्ये आम्ही पोचलो तेव्हा रिक्षा थांबल्यावर पहिल्या मजल्यावरील खिडकीतून कोणीतरी डोकावल्या सारखे वाटले. मी आईला काही बोलण्यापूर्वी एक गोरा हसतमुख देखणा तरुण लाकडी जिन्यावरून उतरून आला. स्वतः ची ओळख “मी अरविंद उरवणे” अशी करून दिली. त्याच्याबरोबर आम्ही वर गेलो, मी नेहमीच्या सवयीने दोन मिनिटात एक मराठी पुस्तक हेरून एका कोपऱ्यात वाचत बसलो. त्यावेळी त्या तरुणाने त्याच्या रेकॉर्ड प्लेयर वर एक ४५ rpm ची तबकडी लावली, आणि त्या खोली भर एक आवाज भरून राहिला- “ये रे घना, ये रे घना…” . गाणे चालू झाल्याबरोबर अरविंदकाका आत जाऊन काका हलवाईचा बटाटा चिवडा (गोड असतो, त्यात भरपूर काजू आणि बेदाणे असतात) आणि आंबा बर्फी घातलेल्या स्टेनलेस स्टीलच्या थाळ्या घेऊन आला. नन्तर गरम गरम  कॉफी.  खूप वर्षांनंतर मला कळले की हा झालेला कार्यक्रम म्हणजे आईबाबांनी त्याला “बघितले”.

https://youtu.be/h0E-PsR1-9I

त्यांना तो आवडला आणि त्यांनी बाबांचे अंबाल्यातील मित्र (ते सैन्यात पायदळात होते) बापूसाहेब गाढवे यांना पत्र लिहून “मुलगा चांगला आहे” असे कळवून टाकले. थोड्या महिन्यांनी शोभाताईचे लग्न अरविंदकाकाबरोबर पुण्यात झाले. मला आठवते की कार्यालयाचे नाव भिकुबाई मेनकुदळे पंचम लिंगायत ट्रस्ट असे असावे. त्याकाळी त्या भागाला गंज पेठ म्हणत.

पुढे अरविंदकाकाने (त्याला सख्खे कोणीच नव्हते) आईला बहीण मानले, आणि त्यामुळे राखीला शोभाताई मला आणि आई त्याला राखी बांधू लागली. बाहेरच्या जगात हे असे का होऊ शकते याचे उत्तर कोणी मागितलेच नाही आणि आम्हीही दिले नाही. ते गाणे मात्र माझ्या कानात आणि मनात बसले ते कायमचेच.

आरती प्रभू यांची रचना आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत.. आणि आजच्या बर्थडे गर्ल, चिरतरुण आशाताईंचा आवाज… कितीही वेळा ऐकली तरी गाण्याची गोडी अवीटच राहीली. आशाताई आज ८८ वर्षे पूर्ण करून पुढे गेल्या, त्यांची ऊर्जा आणि दुर्दम्य , विजिगीषु इच्छाशक्ती पाहून तरुण पिढीने सुद्धा त्यांच्या कडून प्रेरणा घ्यावी अशीच स्थिती अजून ही आहे.

या गाण्याच्या निर्मितीची कहाणी पण मस्त आहे. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे सरस्वती भक्त कुडाळ मध्ये खानावळ चालवीत असत, ते सोडून बायकोला आणि मुलांना मामाकडे सोडून मुंबईत आले आणि चरितार्थ शोधू लागले, त्यांची ही कविता खरे तर आधी खूप संक्षिप्त होती, अगदी “दिवेलागण” मध्ये प्रसिद्ध झाली तीही अशीच:

ये रे घना,
ये रे घना,
न्हाऊ घाल
माझ्या मना…

फुले माझी,
अळुमाळू,
वारा बघे,
चुरगळू…

नको नको
म्हणताना
गंध गेला,
रानावना..

सुरुवातीला एव्हढीच कविता प्रसिद्ध झाली होती. खानोलकर मुंबईत आले खरे आणि मंगेश पाडगावकर यांच्यामुळे त्यांना नभोवाणी केंद्रात नोकरी ही मिळाली पण त्यांचे मन काही मुंबईत रमेना. पण गावी परत जाणे सुद्धा मुश्कील होते. मंगेश पाडगावकर तेव्हा नभोवाणी वर कार्यक्रम अधिकारी होते. एकदा बिस्मिल्ला खान यांच्या सनई वादनाचे ध्वनिमुद्रण व्हायचे होते. त्यावेळी पाडगावकरांच्या आग्रहाने खानोलकर तिथे थांबले. खानसाहेबांच्या सनई वादनाने त्यांना गावची आठवण झाली आणि त्यांना याच कवितेत भर घालाविशी वाटली, आणि सहजच आणखी काही ओळींची निर्मिती झाली.

टाकुनीया घरदार,
नाचणार नाचणार,
नको नको म्हणताना,
मनमोर भर राना…

नको नको किती म्हणू,
वाजणार दूर वेणू,
बोलावितो सोसाट्याचा,
वारा मला रसपाना

ये रे घना….

एके दिवशी हृदयनाथ मंगेशकर यांनी उत्स्फूर्तपणे या कवितेला खास त्यांच्या शैलीत चाल लावून कवितेचे गाणे केले.

त्यात आशाताईंचा एकमेवाद्वितीय स्वर मिसळला आणि एक अमर गाण्याची मराठी माणसाच्या भावविश्वात भर पडली.

आज अरविंदकाका आजोबा झाला, काही वर्षांत पणजोबाही होईल, पण त्याच्यामुळे मला सर्वात पहिल्यांदा हे गाणे ऐकायला मिळाले हे मी (आणि तोही) कधीच विसरू शकणार नाही.

धन्यवाद अरविंदकाका, आशाताई, आरती प्रभू, हृदयनाथजी, आपण सर्वांनी मला खूप अनमोल ठेवा दिलात, तो मी आज ५५ वर्षे माझ्या इवल्याश्या हृदयात एका कप्प्यात जपून ठेवला आहे. उरलेल्या वाटचालीत सुद्धा बरोबर राहीलच.. आशाताई तुम्हांला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! १२ वर्षांनी तुमच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात मी नक्की येईन.

शुभरात्री मित्रांनो.. चिनी विषाणू पासून दूर रहा, संधी मिळताच (अजून घेतली नसल्यास) लस नक्की घ्याच! आज ७१ कोटी डोस आपल्या देशात दिले गेले आहेत, त्याचा अभिमान आपल्या प्रत्येकाला वाटलाच पाहिजे. इतर सर्व देशांपेक्षा आपण मुसंडी मारली आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे पण सध्या रोज एक कोटींपेक्षा जास्त लोकांना लस दिली जाते आहे, त्यामुळे खूप आशा वाटते आहे की हे संकट लवकरच टळेल.

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

20 replies on “आठवणींच्या बेटावर….”

खूपच ह्रद्य आठवण. , खरच गाणी नुसती गाणी नसतात तर आपल्या ओळखींच्या व्यक्तीं सारखीच असतात.. हाडा मासा ची म्हणून तर एवढी जवळची👌👌👌👌👌👍

Liked by 1 person

One of my favorite…. pratyek song sobat kahi na kahi memories astat…
Me abhyas songs aikat karaychi😄 ani exam madhe answers nahi aathwali ki songs mhanaychi manatlya manat ani tyasobat mala answer aathwaycha😛

Liked by 1 person

प्रत्येक गाणे आपल्या मनात घर करून बसते आणि आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग होऊन राहते

Like

किती सुंदर आठवणीं असतात काही काही….. गाण्याबरोबर जोडलेल्या…. ती गाणी ऐकली की अलगद उलगडतात…..या लेखाच्या निमित्ताने तुमच्या लहानपणीच्या खूप छान आठवणी समजल्या…..
ये रे घना…..खूप सुंदर गाणं…. आशाताईंचा स्वर अप्रतिम….एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो…..या गाण्यासोबत जोडलेली चित्रफीत ही फारच समर्पक…. अशीच सुंदर गाणी ऐकत केलेला प्रवास सुद्धा किती मनोहर…..कधीच संपू नये असा…..

सुंदर आठवणींचे सुंदर गाणे …..खूप छान …..त्याबद्दल तुमचे खूप आभार अनिरुध्द सर😊🙏

Liked by 1 person

निव्वळ अप्रतिम अत्यंत सुंदर हृदयाचा ठाव घेणारं गाणं आर्तता आणि स्वर आशा फर्स्ट एन्काऊंटर इस द बेस्ट एन्काऊंटर असेच या गाण्याच्या बाबतीत झालं त्याबरोबर असलेली चित्रफित पण उत्तमच याच बरोबर आणखीन दोन गाणी समईच्या शुभ्र कळ्या आणि गेले द्यायचे राहुनी हे पण आशा आणि आरती प्रभू यांची साथ संगत असलेली दोन अप्रतिम गाणी

Liked by 1 person

नेहमीप्रमाणेच अप्रतिम

त्या “छोट्याशा हृदयात ” एक “मोठ्ठ ” मन भरून राहिलंय
ते आणखीआणखी मोठ्ठ होतं जाऊंदे

Liked by 1 person

ये रे घना, ये रे घना,
न्हाऊ घाल माझ्या मना …

गाणं ऐकताना हे गाणं पावसाचं आहे, असं वाटतं. पण पु.लं देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाईंनी या मागची हकीकत सांगितली, ती थोडक्यात अशी –

खूप प्रसिद्धी मिळू लागल्यावर आपल्याला अहंकार होऊन प्रतिभा तर कोमेजून जाणार नाही ना, अशी भीती खानोलकरांना वाटली. त्या वेळेस परमेश्वराची भाकलेली ही करुणा आहे…!

ये रे घना, ये रे घना (परमेश्वरा धाव),
न्हाऊ घाल माझ्या मना (माझ्या मनाला शांतव).

फुले माझी अळुमाळू (माझ्या काव्य प्रतिभेची सुकुमार फुले),
वारा बघे चुरगळू (अहंकाराचा वारा चुरगळू पहात आहे).

नको नको म्हणताना गंध गेला रानावना (कितीही नाही म्हणताना या फुलांचा सुगंध दूरवर पसरला आहे, पसरत आहे).

टाकूनिया घरदार नाचणार नाचणार,
नको नको म्हणताना मनमोर भर राना
(मी कितीही नको म्हंटलं, तरी माझा मनमोरही त्या प्रसिद्धीवर नाचतोच).

नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू (कितीही नको म्हंटले तरी या कवितांची गाणी होणार, कोणीतरी गुणगुणणार).

बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपाना (त्या अहंकाराचा सोसाट्याचा वारा मला त्या प्रसिद्धीचा रसास्वाद घ्यायला बोलावतोच आहे)…..!

म्हणून तू

येरे घना, येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना..

Liked by 2 people

Leave a comment