Categories
Uncategorized

माऊली, माऊली

आज खूप दिवसांनी का कोणास ठाऊक ही रचना सकाळी सकाळी डोक्यात घुमू लागली, अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि त्यातील प्रत्येक स्वर आणि शब्द पाठच झाला आहे. अगदी नकळत , स्वाभाविक मन:पटलावर कायमची कोरले गेले आहेत.

नामदेव महाराज यांची ही अर्थपूर्ण रचना, माझ्या लहानपणी करमणुकीची रेडिओ सोडून इतर काहीच साधने उपलब्ध नव्हती, रोज सकाळी शाळेला जाण्यासाठी ५३०-५४५ ला उठावे लागे. सकाळी ७ ची शाळा! मधल्या वेळेत आई रेडिओवर मराठी भक्तिगीते लावे. त्यावेळेस खूप गाणी ऐकली, त्यातील हे एक. गोविंदराव पोवळे हे आकाशवाणी मुंबई वर गेले ६०-६५ वर्षे गात असतात. त्यांचे आणखी एक अतिशय लोकप्रिय झालेले गाणे म्हणजे “रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी हो माय…” गोविंदराव पोवळ्यांनी आकाशवाणीवर पहिल्यांदा वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी गायन केले. त्यांची पहिलीवहिली रेकॉर्ड वयाच्या १७ व्या वर्षी बनली व प्रकाशित केली. ” ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे, गातो अजुन मी म्हणुनी मीही जिवंत आहे…” या ओळी त्यांना चपखल बसतात. सतत ६५ पेक्षा जास्त वर्षे आकाशवाणीवर “ए” ग्रेड आर्टिस्ट म्हणून गात आहेत, त्यांचा अतिशय हृद्य कार्यक्रम नव्या पेठेतील एस एम जोशी सभागृहात २०१३ साली झाला होता, तो पहायची संधी मला मिळाली होती, त्याची आठवण झाली, त्यावेळी पोवळे ८१ वर्षांचे होते. त्यावेळी सुद्धा त्यांच्या आवाजात फारसा फरक पडला नव्हता.

https://youtu.be/AOidlF1zRJM गोविंद पोवळे व प्रभाकर नागवेकर आणि त्यांचे साथी यांच्या आवाजात ऐकलेले हे गाणे. दोघांच्या गाण्यात एक सरळ, तरल, प्रामाणिक, लीन भाव दिसून येतो. सोबत अगदी मोजकीच वाद्ये,साधी, सोपी चाल, व पूर्णपणे भक्तिरसात ओथंबलेली ही रचना.

काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती। वेद महिषामुखी बोलविलें ॥१॥
कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती। चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा। ऐसें जगदोद्धारें बोलविलें ॥३॥
नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥


संत नामदेवांचा हा अभंग. त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल त्यांच्या भावना किती सुंदर व्यक्त केल्या आहेत ते पहा. ज्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, ज्या योग्याने स्वतः च्या योगसामर्थ्याचा परिचय निर्जीव भिंत चालवून दिला त्यांची स्तुती मज पामराने काय करावी? अविद्येच्या प्रभावापासून जगाला दूर नेऊन खऱ्या ज्ञानाचा प्रकाश देऊन त्याचा उद्धार केला, अज्ञानाच्या मायावी जाळ्यातून पतितांचे तारण केले व खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवला, अशी आमची गुरुमाऊलीची थोरवी.

पोवळे आणि नागवेकर यांनी अतिशय साधेपणाने सादर केलेले हे गाणे त्यांच्यानंतर कित्येक गायकांनी आपापल्या पद्धतीने सादर केलं आहे. या ध्वनिफिती व चित्रफिती सहज उपलब्ध आहेत. पण हा भाव व सरळ साधेपणा कशातच आढळून आला नाही. पोवळ्यांच्या गाण्यात मला गजाननराव वाटव्यांचा ठसा नेहमीच दिसतो. एक पेटी व तबला घेऊन ही मंडळी तासनतास गात राहायची, आणि सर्व श्रोत्यांना गुंगवून ठेवायची. एस एम जोशी सभागृहात तेच झाले, अडीच-पावणे तीन तास चाललेला हा कार्यक्रम मध्यंतराशिवाय असूनही बहुतेक सर्व लोक जागेवर न चुळबुळ करता बसून होते.

सुरेश वाडकर यांनी सादर केलेला हाच अभंग पहा, त्यांच्यासारख्या पट्टीच्या गायकाच्या आवाजात तो सरळ साधेपणा , निरलस भाव उमटत नाही. पोवळे आणि नागवेकर द्वयींच्या आवाजातील “तो” मोहक गोडवा कुठेतरी लोपला आहे. . https://youtu.be/4al0tAZTeyM

असे हे मंतरलेले सरळ साधे दिवस! तरल भावना, मोठ्या वाद्यवृंदाशिवाय सोपेपणाने मांडलेल्या, कोठेही अनावश्यक अवडंबर नाही पण खरेच सुंदर व्यक्त केल्या आहेत. भक्ती मधला लीनतेची आणि समर्पणाची भावना अचूक आणली आहे त्यांनी आपल्या गाण्यात. आणि साठ वर्षे झाली तरी त्यातील माधुर्य अजिबात कमी झालेले नाही. आजच्या संगीतात असा टिकाऊपणा अपवादात्मकच का राहिला आहे? एखाद्या वावटळी सारखी गाणी येतात आणि जातात, काही महिन्यांनंतर त्यातील बरीचशी आठवत सुद्धा नाहीत. जी जादू या लोकांना सापडली, ती कुठेतरी मधल्या काळात हरवली वाटते. आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेल्या या दोन गायकांनी सादर केलेला एक अभंग आजही ६०-६५ वर्षांनंतर मन:पटलावर सुस्पष्ट राहतो, हीच त्या संगीताची खासियत.

लोकहो काळजी घ्या, कोरोना पासून सावध रहा, तिसरी लाट नकोच नको. तुम्ही अजून घेतली नसल्यास लस नक्की घ्या

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

29 replies on “माऊली, माऊली”

अप्रतिम वर्णन, अभंग आईकतो सर। शेयर केल्याबद्दल धन्यवाद।

Liked by 1 person

पुन:एकवार सुंदर सहज विवेचन..किती सहजतेने व्यक्त केलंय..रात्र काळी घागर काळी हे लहानपणीच मनात घर करून बसलेल गाणं..आज हे वाचल्यावर केवळ मनी अब्द अब्द दाटून आले..सर असेच लिहित रहा..आमच्या आनंदाचं झाड सदैव या चांदण्यांनी शिंपीत राहो…हे साधेपण सध्या जपणं खूप कठीण झालंय.पण हाच खरा अक्षय आनंद आहे.. मनापासून धन्यवाद…

Liked by 1 person

काळजाला स्पर्श करून जाणारा हा अभंग आहे 👌
रामकृष्ण हरी 🙏🌺

Liked by 1 person

लहानपणीचे दिवस जिवंत झाले. “रात्र काळी” आणि “काय सांगू देवा” हे दोन्ही अभंग पहाटे आकाशवाणीवर लागत असत. आईची कॉलेजवर सकाळी लवकरची लेक्चर्स असत, त्याआधी उठून स्वयंपाक करताना ती रेडिओ ऐकत असे आणि आम्ही जागे होताना हे (आणि असे )अभंग ऐकत जागे होत असू. पुढे शाळेत अभंगगीत स्पर्धांच्या मी सामील झाले, तेव्हा पहिलं ट्रेनिंग मिळालं ते टाळ वाजवण्याचं ! आणि त्या ट्रेनिंगसाठी “काय सांगू देवा..” ( ओरिजिनल चालीत) वापरलं गेलं , ते कानात घर करून आहे. टाळांवर सम आणि तोड तबल्यापेक्षा किंचित निराळी घ्यायची असते, हे या गाण्याच्या साहाय्यानी आम्हाला शिकवलं होतं …

दोन्ही आठवणी जाग्या झाल्या.. धन्यवाद, त्या मधुर आणि सरळ काळाची आठवण दिल्याबद्दल. ( आणि हो, नवीन चाल आणि प्रेझेंटेशन त्या तूलनेत फारसं भावत नाही. खरं आहे )

Liked by 1 person

किती सुंदर अभंग आहे संत नामदेवांचा👌👌प्रत्येक शब्दातून संत ज्ञानेश्वर यांच्या बद्दलची भक्ती आणि प्रेम प्रतीत होते…
गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर आणि त्यांचे साथी यांनी गायलेला अभंग, त्यांचे साधे, मृदू पण अत्यंत खरे सुर मनाला जास्त भावले…..
पु. ल. नी म्हंटल्याप्रमाणे खरा गायक हा फक्त तबला आणि तंबोऱ्याच्या साथीने सुरांचा स्वर्ग उभा करतो…. ते तुम्ही एस. एम. जोशी सभागृहातील कार्यक्रमाच्या वर्णनावरून आठवले….
तसेच तुमच्या लहानपणीच्या हृद्य आठवणी वाचून
छान वाटले…..आमच्या लहानपणी आम्ही सुद्धा सकाळी उठल्यावर शाळेची तयारी करताना रेडिओ वरची जुनी गाणी ऐकत असू….त्याची आठवण झाली…..😀

Liked by 1 person

लहानपणी ऐकलेली आणि अनुभवलेली गाणी आयुष्यभर साथ देत राहिली, नव्हे आयुष्याचा अविभाज्य घटकच बनून गेली

Like

क्षमा मला आताच कळले की त्या संपूर्ण कार्यक्रमाचे विडिओ चित्रण करून यू ट्यूब वर उपलब्ध करून दिले आहे

Like

जुन्या स्मृती उजळल्या
मला वाटायचं मीच जुन्या गाण्यांच्या आणि गायकांच्या आठवणी काढत बसतो आणि नव्यांमध्ये दोष बघतो
पण आज ह्या दोन्ही गायकांना ऐकून पटतं की नाही की जे भाव जुन्यामध्ये होते ते आतां नाहीं जाणवत

हा दोष गायकामध्ये नसावा कदाचित आपल्यामधला हळुवार निष्पाप भाव आतां राठ होत गेला असावा

कदाचित

Liked by 1 person

खरे आहे सर, सुरेशजीं सारख्या गायकाला मी कधीच कमी लेखणार नाही, पण शेवटी संगीत दिग्दर्शकाच्या मनात आलेली संकल्पना गायकाला व्यक्त करावी लागते. माझ्या पिढीतल्या लोकांना मराठी बोलताना इंग्रजी शब्दांची कुबडी घ्यावी लागत नाही, आता तसे राहिले नाही.

Like

गुरुमुखातून निघालेले हे शब्द नसून तो एक अमृताने भरलेला प्याला आहे. सर आपण खूप सुंदर प्रकारे प्रत्येक अभंगाचे विवेचन करता. असच अमृतपान करण्याची आम्हाला वेळोवेळी संधी प्राप्त होवो.
।।जय जय रामकृष्ण हरी।।

Liked by 1 person

धन्यवाद कागणे साहेब, हाच आपला अमूल्य वारसा आहे, तो आपण जपलाच पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे हे तर आपले कर्तव्यच आहे

Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s