Categories
Uncategorized

गाणारे व्हायोलिन आज कायमचे शांत झाले

मी आज पुण्यात परत आलो आणि एक दुःखद बातमी कानावर पडली. मनात चर्रर्र झाले.. आपल्या आयुष्यभरच्या तपश्चर्येने व्हायोलिन वर प्रभुत्व मिळवून मराठी माणसाच्या भावविश्वात स्वतः चे एक वेगळे स्थान मिळवणारे प्रभाकर जोग निवर्तले. माझ्या मनातल्या पडद्यावर फ्लॅशबॅक व्हावा तसा मी काळात ४५ -४६ वर्षे मागे गेलो. आनंद नाडकर्णी, मराठी वाङ्मय मंडळ, सेठ जी एस मेडिकल कॉलेज अशी नावे मनाच्या अंतरपटलावर एकामागून एक उमटून गेली. होस्टेलवर पोस्टर पेपरवर कुंचल्याने जोगांच्या कार्यक्रमाबद्दल बनवलेली भित्तीपत्रके समोर आली, आणि पुनश्च एकदा ते मंतरलेले दिवस, ती अविस्मरणीय शनिवार दुपारी रंगलेली एम एल टी मधली मैफिल, जोगांच्या बरोबरच्या गप्पा आणि त्यांचा व्हायोलिन वरचा जादुई हात…

जोगांच्या मोठ्या बंधूंकडून बाळकडू व सुरुवातीला मिळालेले धडे, त्यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांचे झालेले निधन आणि खूप लहानपणी “कमवा आणि खा” असे स्वावलंबी होण्यासाठी बिकट परिस्थितीने केलेला आग्रह हे ही त्यांच्याकडून ऐकायला मिळाले. ते कॉलेजमध्ये असताना त्यांची एक व्हायोलिन ची बैठक खूप गाजली, त्याच्याबद्दल बाबूजींनी ऐकले (सुधीर फडके) आणि त्यांनी जोगांच्या गुणांना ओळखून त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दिली. जोगांसारखा मराठी सुगम संगीतक्षेत्रात दुसरा कलाकार कोणीच नाही.

जोगांच्या हुकमी व्हायोलिन वादनामुळे त्यांच्या कलेला “गाणारे व्हायोलिन” असे अगदी अचूक संबोधले जाई, जाते व रसिक आहेत तोवर जाईलही!

ऐंशी वर्षांचे झाले तरी जोगांच्या कलेत आणि वाद्यावरच्या हुकमतीत बिलकुल फरक पडला नाही. कमी आणि मोजकेच बोलणारे जोग, शब्दांपेक्षा जादुई सुरावटीतून जास्त भावना व्यक्त करायचे. बाबूजींनी त्यांना सहाय्यक संगीत दिग्दर्शक बनवले ते त्यांच्या रत्नपारखी स्वभावामुळे. संगीताचे अचूक नोटेशन करण्यात जोगांच्या सारखे कोणीच नव्हते. त्यांनी त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीच्या सर्व आघाडीच्या संगीतकरांसाठी व्हायोलिन वाजवले. स्वतः संगीतरचना ही केल्या.

आकाशवाणी पुणेवर प्रसृत झालेली त्यांची पहिली वहिली रचना त्यांच्या भावी पत्नी – नीला ताईंनी गायली. ही खूपच गाजलेली आणि आजही मला खूप आवडणारी कृती आहे. मला मूळ रचना (त्यांच्या पत्नीच्या आवाजात) मिळू शकली नाही, पण त्यानंतर हेच गाणे मालती पांडे यांच्या आवाजात गायले गेले, त्याची रेकॉर्ड खूप गाजली व खूपच लोकप्रिय झाली. माझी मोठी मावशी (माझ्या आजीच्या अकाली मृत्यूनंतर आई व तिच्या सर्व भावंडांना आईच्या मायेने संगोपन करणारी) व आई यांना खूप आवडणारी ही रचना. मी प्रभामावशीला कित्येक वेळा हे गाणे गुणगुणताना ऐकले आहे. https://youtu.be/JURSQh4Avw4

जोगांच्या अनेक अमर रचनांपैकी सर्वात प्रसिध्द अशी ही अतिशय लोकप्रिय व खऱ्या अर्थाने अमर, कालातीत अशी ही. गदिमांच्या दैवी प्रतिभेचा हा एक अप्रतिम आविष्कार! सुंदर शब्दरचना, सोपी सुरेल बांधणी आणि अतिशय सुंदर गायकी!

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे,
नयन लाजरे, चेहरे हसरे,
लपविलेस तू जाणून सारे,
रंग गालिचा छपेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे,
उन्हात पाउस, पुढे चांदणे,
हे प्रणयाचे देणे-घेणे,
घडल्यावाचुन चुकेल का ?

पुरे बहाणे गंभीर होणे
चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छपेल का ?

सांगा खरीच अमर रचना आहे की नाही? साठ वर्षे झाली तरी अजून ताजी आहे, नाहीतर किती पोपट आले आणि गेले, त्यांची काहीही खूण न ठेवता.

काळाचा महिमा पहा- गदिमा, मालती बाई आणि आज जोग ही काळाच्या पडद्याआड गेले, एक युग संपले. पण या थोर लोकांचे थोरपण यातच आहे, प्रत्येकाने मरावे परी किर्तीरूपे उरावे या उक्तीचे शब्दशः पालन केले आणि आपल्या सर्वांच्या मनावर न पुसता येईल असा ठसा उमटवून गेले.

असो, कालाय तस्मै नमः! हेच खरे.

जोग यापुढे शारीरिक रूपात आपल्यात नसले तरी त्यांच्या अफाट प्रतिभेच्या खुणा आपल्याला वारसारूपाने मिळालेल्या आहेतच. त्या अमूल्य रचनांनी परत एकदा व्हायोलिनला बोलते करूयात.

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

6 replies on “गाणारे व्हायोलिन आज कायमचे शांत झाले”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s