Categories
Uncategorized

एक जुनी आठवण

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बाबा एअरफोर्स सोडून एअर इंडिया मध्ये लागण्याच्या आधी काही महिने पुण्यात होतो. मी त्याच्या आधी एक वर्ष मावशीकडे राहात होतो. सदाशिव पेठेतील तिच्या वाड्यातून मी कॅम्प मध्ये शाळेत जात होतो. बाबा पुण्याला आल्यावर आम्ही सर्व एकत्र राहू लागलो.

१९६७ अखेर किंवा १९६८ ची सुरुवात असेल. आम्ही राहात होतो त्याच्या जवळ शिवाजी मंदिर मध्ये शास्त्रीय संगीताची मैफिल होती. गाणार होते प्रत्यक्ष पंडित भीमसेन जोशी. त्याकाळी अशा मैफिली होत असत आणि त्यात हजेरी लावायला मोठे मोठे प्रसिद्ध कलाकार येत असत. बहुतेक शनिवारची रात्रीची मैफिल होती. आम्ही सर्व लवकर जेवण करून शिवाजी मंदिरात जाऊन बसलो. पंडित भीमसेन जोशी त्यांच्या संचाबरोबर येऊन पोचले, मैफिलीला सुरुवात झाली. ३-३०-४ तास भीमसेनजींनी सर्व श्रोत्यांना एकदम तृप्त केले. शेवटी त्यांनी सहजच श्रोत्यांना विचारले, “आता रात्रीचे दोन वाजले आहेत, शेवटी काय गाऊ ते सांगा!” अचानक अंगात संचारल्या सारखी माझी धाकटी बहीण (त्यावेळी जेमतेम साडेचार-पाच वर्षांची असेल) – इतक्या रात्री गाणे ऐकत टक्क जागी होती- ती ताडकन उठून म्हणाली ‘ “जो भजे हरी को” म्हणा ना!’ रात्रीच्या शांततेत तिचा आवाज पंडितजींच्या कानापर्यंत पोचला. माझी आई ओशाळल्यागत झाली, बाबा ही अचंबीत झाले! मला काय घडले आहे ते कळण्या आधीच पंडितजींनी हसत तिला जवळ बोलावले. तेव्हा ती बाजीराव रस्त्यावर पाटणकर खाऊवाल्यान्च्या शेजारी शिशु निकेतन नावाच्या बालवाडीत जात असे. ती बोलावल्यावर बाबांबरोबर पुढे मंचावर पंडितजींकडे गेली आणि आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. पंडितजींनी तिला विचारले, “हे भजन का हवे?” शेवटी भैरवी गातात ना, म्हणून!” तिचे उत्तर…

पंडितजींनी दिलखुलास हास्य केले, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आमची बाई तोऱ्यात परत मूळ जागेवर स्थानापन्न! मग पंडितजींनी एक पेलाभर पाणी पिऊन हे भैरवीतले भजन गायले ते सूर आजही माझ्या कानात घुमताहेत: पंडितजींच्या आवाजात भैरवीचे गांभीर्य आणि आर्तता आणखीनच उठाव घेते. त्यांच्या ख्याल गायकी इतकेच त्यांनी गायलेली भक्तिगीते, अभंग, भजने कित्येक कोटी श्रोत्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहेत. https://youtu.be/EqlYN2hHYtY

जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा

देह के माला, तिलक और भस्म, नहिं कुछ काम के
प्रेम भक्ति के बिना नहिं नाथ के मन भायेगा

सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा

जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,

सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा

दिल के दर्पण को, सफ़ा कर, दूर कर अभिमान को
खाक हो, गुरु के चरण की, तो प्रभु मिल जायेगा

सोहि परम पद पायेगा , सोहि परम पद पायेगा

जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा

छोड़ दुनिया के, मज़े और बैठ, कर एकांत में ध्यान धर,
हरि के चरण का, फिर जनम नहीं पायेगा

सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा

जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा

दृढ़ भरोसा, मन में रख कर, जो भजे हरि नाम को
कहत ब्रह्मानंद, ब्रह्मानंद में ही समायेगा

सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा

जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा

पंडितजींनी त्यादिवशी गायलेल्या भजनाने खूप लोकांना रडवले. मला लोक का रडताहेत हे नीटसे कळले नाही, पण काहीतरी वेगळे घडतंय एव्हढेच मला नक्की कळले.

आयुष्यात पुढे खूप स्थित्यंतरे घडली, मी डॉक्टर म्हणून पंडितजींना खूप उशिरा भेटलो. तेव्हां त्यांच्या बलदंड देहाची आजाराने केलेली जर्जर अवस्था पाहून मला शरपंजरी भीष्माचार्य आठवले. पंडितजी त्यानंतर काही महिन्यांत गेले, मीही त्या रुग्णालयात जाणे बंद केले, पण ती भैरवी ऐकली की अजूनही काळजात गलबलून येतं. भूतकाळ मनाच्या पडद्यावर झपकन फ्लॅशबॅक सारखा दिसून जातो.

गेले ते दिवस.

पुण्यातील त्या जुन्या काळच्या मैफिली खरंच मंतरलेल्या होत्या. सर्वसामान्य लोकांना परवडतील असे दर , अंगावर येईल अशी गर्दी नाही! पण ती मोठमोठ्या कलाकारांना जवळून पाहण्याची संधी मात्र नक्की नाही!

कितीही म्हटले तरी ते दिवस, तो काळ परतून येणार नाही! उरल्या फक्त आठवणी

मित्रहो शुभरात्री! दीपोत्सवाची भैरवीनेच सांगता करूयात! काळजी घ्या, लस टोचली नसल्यास जरूर घ्या.

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

17 replies on “एक जुनी आठवण”

काही गोष्टी काल घडल्या सारख्या आठवतात. एक सुंदर आठवण. पंडितजी चा मोठेपणा पण दिसतो. 🙏

Liked by 1 person

पंडितजी मला वेगळ्या स्थितीत भेटले. पण मला भेटलेले सर्व मोठे कलाकार, अगदी जसराज जी, हरीजी, शिवजी, रघुनंदनजी, झाकीर जी सगळेच निगर्वी वाटतात.

Like

लहान वयात गाण्यातील समज व पंडितजी नि फर्माईश पूर्ण केल्याचा आनंद एक गोड आठवण.

Liked by 1 person

किती छान लिहिलय तुम्ही.. बहिणीची पण कमाल आहे.. योग्य फर्माईश केलेयाबद्दल

Liked by 1 person

ते दिवसच मंतरलेले होते. तेव्हा संगीत मैफलींना काळ, वेळेचे बंधन नव्हते. रात्री २ वाजता प्रभाताई अत्रे यांच्या स्वर्गीय आवाजातला जोगकंस, ” जगत सपना..” प्रत्यक्ष ऐकल्याने , ते सूर ते शब्द माझ्या मनात कायम कोरले गेले आहेत.

Liked by 1 person

एकदम खरे, सवाई चा शेवट भीमसेनजींच्या आवाजात व्हायला पहाट उजाडायची. सूर्योदय होत असताना त्यांचे गाणे रंगात यायचे. त्यामुळेच उत्तर रात्रीचे राग आणि पहाटेचे राग ऐकायला मिळत. दुर्दैवाने आता हे शक्यच होत नाही, एक अत्यंत चुकीच्या निर्णयामुळे उत्तर रात्रीचे राग ऐकायला मिळत नाहीत.

Like

पंडित भीमसेन जोशींचे खूप सुंदर आणि प्रसिद्ध भजन…..अतिशय सुंदर आणि तल्लीन होऊन ऐकल्यावर कोणाचेही डोळे पाणावतीलच…..

मुक्तीचा सुंदर मार्ग….. परमेश्वराशी एकरूप होणे…. मी पण सोडून……

तुमची आणि तुमच्या बहिणीची बालपणीची आठण पण खूप गोड आणि गंमतशीर आहे…. तुमच्या बहिणीचे त्या लहान वयात संगीताची जाण असणं आणि योग्य फर्माईश करणे म्हणजे खरंच वाखाणण्याजोगे…..
पंडितजींनी सुद्धा त्यांचा हट्ट पुरविणे म्हणजे किती ग्रेट!!!! एका उत्तम आणि विनयशील कलाकाराचे प्रतीक…..🙏🙏

Liked by 1 person

ते सगळे लोकच थोर होते, तो काळ वेगळा होता, कलाकार आणि श्रोते यांच्यात अंतर कमी होते. माझे शिक्षक आणि पंडितजी एका कोलोनीमध्ये शेजारी राहायचे. आज कोण प्रसिद्ध कलाकार साध्या माणसासारखं राहातो??

Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s