Categories
Uncategorized

भक्तिरसात न्हाऊन निघूया…

मी हे अमर भजन एका रविवारी सायंकाळी ऐकले. आम्ही सर्व गप्पा मारत बसलो होतो आणि जेवायला खूप वेळ होता. आमचे लग्न झाले होते आणि मुले व्हायची होती. बाबांनी का कोणास ठाऊक, दिवाणाचा कप्पा उघडून त्यातील HMV ग्रामोफोन बाहेर काढला. माझ्या आजोबांनी १९२५-३० मध्ये विकत घेतला होता हा. ग्रामोफोन आणि त्यांच्या गोळा केलेल्या २५-३० रेकॉर्ड याच त्यांची आठवण म्हणून आमच्याकडे उरल्या आहेत. आजी सांगायची की त्यांना संगीताचा खूप शौक होता. त्यावेळी त्यांच्याकडे म्हणे सुमारे २५०० रेकॉर्ड होत्या. खूप हौशीने गोळा केलेल्या अशा. त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वच कुटुंबाची वाताहत झाली. अगदी जवळच्या म्हणून समजलेल्या लोकांनी येऊन तिला काही समजायच्या आत त्यातल्या बहुतांशी रेकॉर्ड पळवल्या. नशिबाने त्यातला ग्रामोफोन आणि काही रेकॉर्ड उरल्या. त्यातील काही रेकॉर्ड वर आजोबांची सही आणि तारीख लिहिलेली आहे.

बाबांनी एकदम लावली ती ही रेकॉर्ड. गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर (यांचे मूळ आडनाव गाडगीळ होते, पण पलूस या गावातले म्हणून ते पलुस्कर झाले , व पंडितजी यांच्या महान कार्यामुळे हीच उपाधी घराण्यातील पुढच्या सर्व पिढ्यांना चिकटली) यांचे अत्यंत कर्तबगार व प्रसिध्द गायक पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांनी गायलेले हे संत मीराबाईंचे अप्रतिम व अविस्मरणीय भजन. पंडितजींचा गळा खूपच गोड होता. एकदा त्यांचा आवाज कानावर पडला तर मोहून टाकणारा. आवाजाचा पोत वेगळा असूनही नैसर्गिक माधुर्य आणि पंडितजींची सुरेल गायकी ऐकणाऱ्याला जिंकून घेणारच.

त्यात मीराबाई यांची मनमोहक शब्दरचना. माझी तहानभूकच हरपली. ओळीने ७ वेळा ऐकूनही समाधान झाले नाही. सारे घर त्या दैवी गायकीने भरून गेले आणि सर्व भारून गेले. एकदम मंतरलेल्या दैवी, पारलौकिक अनुभवातून आम्ही सगळे गेलो. https://youtu.be/b488zxbpvtc

माझे नशीब बलवत्तर की पंडितजींच्या वंशातील काही लोकांना मी  आजही भेटू शकतो.

खूप वर्षांनी सवाई गंधर्व महोत्सवात स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या तेजस्वी आणि घनगंभीर आवाजात हीच रचना परत ऐकली. तेच शब्द, पण गायकीतल्या फरकाने लगेच वेगळेपण उठून दिसते. पलूस्करांचे गाणे म्हणजे शांतपणे वाहणारी जीवनदायी नदी, काठावर बसून तिच्या शीतल पाण्याच्या प्रवाहाचा आनंद घ्यावा. तिच्यावरून वाहणाऱ्या मंद सुगंधी वाऱ्याची एखादी झुळूक आपल्याला सुखावून जावी असे त्यांचे नाजूक अत्यंत मृदू गाणे. भीमसेनजी यांचे गाणे म्हणजे स्वरांच्या प्रपातात चिंब व्हायचे. पहिल्या आलापापासूनच श्रोत्यांच्या मनावर घट्ट पकड घेणारे आणि धुंद करणारे! त्यांच्या इतक्या बैठकीतले विविध राग, भजने, चीजा, अगदी भक्तिगीते आणि अभंगही ऐकले. प्रत्यक्ष देवाला स्वर्गातून खेचून आपल्या मैफलीत बसवून ऐकवण्याचे सामर्थ्य त्यांच्या खणखणीत आवाजात नक्कीच होते. क्षणार्धात आर्जवी होण्याची त्यांची लकब म्हणजे श्रोत्यांच्या अंगावर काटा उभा राहिलाच पाहिजे!

पंडितजी ईश्वरी शक्ती आणि वरदान घेऊनच आमच्यात उतरले. त्यांच्या गाण्याचा प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला ४०-४५ वर्षे मिळाली, तरीही अतृप्तीची भावना, अधाशी माणसासारखं अजून हवे अशी भावना त्यांच्या सर्वच चाहत्यांच्या मनात नक्कीच आहे, आणि असावयास ही हवी. दोन दिग्गजांनी गायलेले एकच भजन किती वेगळे वाटते! https://youtu.be/tcToT-yAOXM

त्यांनंतर आज जवळजवळ तीस-पस्तीस वर्षांनंतर हेच भजन एका गुणी उदयोन्मुख गायिकेच्या आवाजात ऐकायला मिळाले. मैथिली ठाकूर ही अत्यंत सामान्य परिस्थितीतून नावारूपाला आलेली खऱ्या अर्थाने स्वयंभू गायिका. फक्त पेटी, तिच्या ऋषभ (तबला) व अयाची (टाळ) या दोन भावांच्या साथीने किती सुंदर सादर करते पहा! तिच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. गायकीतली तिची तयारी मला नेहमीच अचंबित करते. आवाजातला ठेहराव अप्रतिम! किती सुंदर सादरीकरण आहे, ऐकणाऱ्याला – अगदी संगीतद्वेष्टा औरंग्या किंवा अभिजात संगीताबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्याला सुद्धा- हमखास डोलायला लावणारच. एक वेगळी दैवी देणगी घेऊनच सारे विश्व मोहून टाकणारी अगदी नैसर्गिक प्रतिभा!! या वयात तिने एव्हढी उंची गाठली आहे अगदी एकलव्यासारखी भरारी घेतली आहे. चांगला गुरू मिळाला तर ही पोरगी कुठल्या कुठे पोचेल… https://youtu.be/g3DnHnxCTCQ

चलो मन गंगा जमुना तीर,
गंगा जमुना निर्मल पानी,
शीतल होत शरीर,
चलो मन गंगा जमुना तीर,
.
.
.

बंसी बजावत नाचत कान्हा,
संग लिये बलबीर,
चलो मन गंगा जमुना तीर,
.
.
मोर मुकुट पीताम्बर सोहे,
कुण्डल झलकत हीर,
चलो मन गंगा जमुना तीर,
.
.
.
मीरा के प्रभु गिरिधर नागर,
चरण कमल पर शीश,
चलो मन गंगा जमुना तीर,
.
.
.
चलो मन गंगा-जमुना तीर,
गंगा जमना निरमल पाणी
शीतल होत शरीर,
.
.
.
बंसी बजावत गावत कान्हो,
संग लिये बलवीर,
चलो मन गंगा-जमुना तीर,
.
.
मोर मुगुट पीतांबर सोहे
कुंडल झळकत हीर,
चलो मन गंगा-जमुना तीर,
.
.
.
मीरां के प्रभु गिरिधर नागर
चरणकमल पर शीर,
चलो मन गंगा-जमुना तीर
.
.
संत मीराबाई….

आज सायंकाळी बाबांचा (आणि आजोबांनी गोळा करून मला मिळालेल्या) अमूल्य सांगीतिक ठेवा आठवला, तो तुमच्या बरोबर वाटताना बरे वाटले. अभिजात, शास्त्रीय संगीताची गम्मत पहा, आजोबांनी सुमारे ९० वर्षांपूर्वी घेतलेली रेकॉर्ड आणि त्यावरचे गाणे अजूनही सुखद वाटते. ४-५ पिढ्यांना स्वरसुख आणि खऱ्या अर्थाने स्वर्गसुख देऊन जाते आहे. या उलट आज संगीताच्या नावावर चाललेला गोंगाट काही महिन्यात अस्तंगत होतो, आणखी परत येताना बीभत्स शब्द आणि कानठळ्या बसवणारा स्वराक्रोश घेऊन! पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला कुजणाऱ्या पाचोळ्यात उगवणाऱ्या कुत्र्यांच्या छत्रीसारखी सीमित आयुर्मर्यादा -आणि त्याच्यासारखेच विषारी गुण असणारा हा क्लेशदायक प्रकार.

मित्रहो काळजी घ्या, आजही चिनी विकृत आणि पापी मनातून निघालेला विषाणू यूरोपीय देशात आणि अमेरिकेत धुमाकूळ घालतोय! अजून काही महिने तरी सावध रहा.

शुभरात्री……

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

12 replies on “भक्तिरसात न्हाऊन निघूया…”

सुंदर भजन। लहानपणी बरेच वेळा ऐकलेले पण आता जवळ जवळ विस्मरणात गेलेले। मैथिली चा आवाजही अप्रतीम।

Liked by 1 person

अप्रतिम…..👌👌
पंडित पलुस्करांचा कोमल स्वरसाज, पंडित भीमसेन जोशींचा खडा उत्तुंग पण संयत स्वरसाज आणि मैथिली ठाकूर चा खणखणीत पण गोड स्वरसाज….
तिघांच्या तीन उत्तम सुंदर तऱ्हा….👌👌
पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटले…. हे भजन पहिल्यांदाच ऐकले…..
तसेच तुमच्या आजोबांच्या आठवणी आणि सांगीतिक ठेवा पण सुंदर 👌👌
हे सर्व आम्हा सगळ्यांबरोबर वाटून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार🙏🙏

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s