दोन दिवसांपूर्वी एका फार मोठ्या कलाकाराचा ८५ वा वाढदिवस होता. २८ जानेवारी १९३७ रोजी ढाका येथे जन्मलेल्या सुमन हेमाडी (सुमनताई कल्याणपूर) या गेले ६० पेक्षा जास्त वर्षे गात आहेत. त्यांचे वडील सेंट्रल बँकेत मोठ्या पदावर अधिकारी होते. १९४३ साली त्यांच्या वडीलांची बदली मुंबईत झाली, त्यामुळे सुमनताई मुंबईत आल्या. सर्व भावंडात त्या सगळ्यात मोठ्या आहेत. मुंबईत शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्याच वेळी त्यांचे गायनाचे शिक्षण पंडित केशवराव भोळे यांच्याकडे सुरू केले. केशवराव भोळे यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध होते. सुमनताई म्हणतात की सुरुवातीला त्या हौस म्हणून गाणे शिकत होत्या, पण पुढे त्यात स्वारस्य वाढल्याने त्यांनी गांभीर्याने शिक्षण घेतले – उस्ताद खान, अब्दुल रहमान खान, व गुरुजी मा. नवरंग यांनी त्यांना संगीताचे शिक्षण दिले. त्यांच्या धाकट्या भगिनीनेही -श्यामा हेमाडी (चित्तार) संगीताचे शिक्षण घेतले. त्यांचे दुर्दैव की त्यांच्या गायनाचा कालखंड मंगेशकर भगिनींच्या राज्याच्या वेळी होता. इतर कोणत्याही वेळी सुमनताई खूप जास्त यशस्वी झाल्या असत्या. दुर्दैवाने त्यांना त्यांच्या कारकिर्दीत खूप संघर्षाचा सामना करावा लागला. यावेळी त्यांना बऱ्याच वेळा अत्यंत हीन पद्धतीने संधी नाकारली गेली. अगदी रेकॉर्डिंग स्टुडिओ उपलब्ध होऊ न देण्याची व्यवस्था केली गेली. अशा वेळी आपल्या स्वभावात किंचितही कटूपणा न येऊ देता, ज्या मिळाल्या त्या संधीचे सोने करत त्या आपल्या अप्रतिम आवाजाची जादू पसरत राहिल्या. त्यांची बरीचशी गाणी लोकांना त्यांची न वाटता लताबाईंची वाटतात, इतका उच्च प्रतीच्या आवाजात त्या गेल्या ६५-७० वर्षे गात आहेत. “टाकाऊ दर्जाची सुमनताई यांची गाणी सांगा” असे मला कोणी सांगितल्यास मला खूप विचार करून सुद्धा उत्तर देता येईलच असे नाही.
त्यांचे हे गाणे मला खूप खूप आवडते: https://youtu.be/-rQ9OUQzm0k
मानिनी चित्रपटातील हे गाणे. गेले ६० वर्षे मराठी संगीतप्रेमी रसिकांच्या हृदयात सामावलेले. खरे तर ही बहिणाबाई चौधरी या ग्रामीण भागातील रूढ अर्थाने अशिक्षित गृहिणीने व्यक्त केलेल्या भावना आणि विचार असलेली, आणि त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी लिहून ठेवलेली अमर रचना. आपल्या आईच्या अहिराणी या बोलीतील रचना लिहून ठेवून सोपानदेवांनी आपणा सर्वांवर अनंत उपकार करून ठेवले आहेत. ही वही घेऊन ते आचार्य अत्रे यांना भेटले, अत्र्यांनी त्यातील अमूल्य आणि स्वयंभू काव्य पाहून ते प्रसिद्ध केले- बहिणाबाई हे आपले विचारधन प्रकाशित होताना पाहायला आपल्यात नव्हत्या. इतक्या थोर कवयित्रीचे बोल आपल्या पर्यंत पोचवल्या बद्दल सोपानदेव आणि आचार्य अत्रे यांचे ऋण आपण सर्व कधीच विसरू शकत नाही.
किती सुंदर, लोभस काव्य, अगदी सरळ साध्या उपमा, उगाच अलंकारिक भाषेचं अवडंबर नाही, पण अर्थ अगदी थेट काळजास भिडण्याची खात्री. ग्रामीण भाषेचे सौंदर्य मनाला मोहून टाकणारे.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही
राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।
अरे संसार संसार, नाही रडन कुढन
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।
अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।
अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,
अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।
एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।
देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार ।
अरे संसार संसार, असा मोठा जादुगर
माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।
असा संसार संसार, आधी देवाचा इसर
माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।
माझ्या आयुष्यात वाचलेल्या सर्वच अर्थाने अविस्मरणीय कवितांपैकी एक! अनंतराव माने यांनी दिग्दर्शित केलेल्या मानिनी चित्रपटात किती वास्तव चित्रित केले आहे ते पाहून आजच्या चित्रपटातील चार मजली घरात राहणाऱ्या गरीब लोकांच्या बद्दल हसू येते. अनंतरावांनी चंद्रमौळी झोपडीत चुलीवर भाकऱ्या बनवताना आणि अगदी जयश्री गडकरांना जात्यावर दळायला लावले आहे. वसंतराव पवार अतिशय कर्णमधुर संगीत देण्यात वाकबगार. त्यांच्या प्रतिभेला सलाम. त्यांच्या दर्जाची ओळख पटविण्यासाठी या गाण्यापेक्षा आणखी काय चांगले उदाहरण मिळेल? सुमनताई यांचा मधाळ आवाज काळजास भिडतो- पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत आपल्याला घट्ट धरून ठेवतो. त्यांच्या आवाजात बहिणाबाईंचे काव्य, वसंतरावांचे संगीत, अहाहा, माझ्या आत्म्याला मेजवानीच!
अर्थातच चित्रपटात संपूर्ण कविता घेतली नाही कारण तीन- साडेतीन मिनिटात ती बसवणे शक्य नव्हते.
खरेच मंतरलेले दिवस आणि दिव्य प्रतिभा. आता कर्णकर्कश गोंगाट आणि भाषेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणीला लावणारे हिडीस काव्य, त्यावर बीभत्स नाच आणि गणेशोत्सवात वीट नव्हे, शिसारी आणणारे पोपट! १९६०-६१ च्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या मानिनी ची सर त्याला कुठून यावी? लोकांना चांगले जेवण मिळाले तर कोण उकिरडे फुंकत बसेल? असो, काळाचा महिमा, आणखी काय?
माझ्या भावविश्वात अमोल भर घटल्याबद्दल सुमनताईंना दंडवत, माझ्या पिढीवर चांगले संस्कार घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना दंडवत!
लोकहो काळजी घ्या, अजून कोरोना आपल्यातून हद्दपार झालेला नाही! काळजी घेणे काळजी करायला लावण्यापेक्षा कधीही जास्त चांगले! विचारपूर्वक वागा! शुभ संध्या!!
12 replies on “चिरंतन सत्य…..”
सुमनताईं ना सुंदर मानवंदना दिलीत सर🙏🏾🙏🏾🙏🏾
अगदी खर बोललात एकही गाण टाकाऊ म्हणता येणार नाही!!
आणी संभ्रम म्हणाल तर… हेच गाण लता च म्हणून उदो उदो केला जातो. केवढ दुर्दैव …
सुमनताई व्हाटसअप वर छान बोलतात रसीकांशी… परवा माझ्या पोस्ट ला चांगली पोस्ट म्हणून शेरा दिला त्यांनी…🙏🏾
LikeLiked by 1 person
क्या बात है
LikeLike
Mast!!
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ डांगे
LikeLike
फारच सुंदर गीत सर जी
LikeLiked by 1 person
खरे आहे, श्रीनिवास जी
LikeLike
A very fine tribute to Sumanji! Indeed almost all her songs are very memorable!
LikeLiked by 1 person
Very true. A victim of injustice
LikeLike
डाॅ.अगदी योग्य आणि सुंदर शब्दांकन.धन्यवाद.
LikeLiked by 1 person
धन्यवाद कुलकर्णी सर
LikeLike
खूप छान भावना अभिव्यक्ती केलीत सर
बहिणाबाई आणि सुमनताई दोघींनाही सलाम
LikeLiked by 1 person
धन्यवाद रेखाजी, आपल्या तब्येतीची काळजी घ्या
LikeLike