मी खरोखरच नशीबवान आहे. माझ्या आयुष्यात खूप चांगले कलाकार मला ऐकायला, जवळून पहायला आणि ओळख करून घ्यायला मिळाले.
१९६७ साली शिवाजी मंदिर सभागृहात एका मंतरलेल्या सायंकाळी बाबांनी मला, आईला, आणि माझ्या धाकट्या बहिणीला या अवलियाच्या बैठकीला नेले. त्याकाळी खरेच बैठकीत व्हायचे गाणे. खरे तर अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मैफल खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून येतच नाही. माझ्या आत्याच्या हातची दोन्ही पापुद्रे सुटलेली व मऊसूत अशी घडीची पोळी खाताना तिच्या हातची चिंच गूळ घालून केलेली (अगदी पेटंट घेतलेली) आमटीचा भुरका डायनिंग टेबलावर कसा घेता येईल? त्यासाठी पाटावर बसून खाल्ल्याने जास्त आनंद मिळतो. बैठक किंवा मैफिल खुलायला जमिनीवर जाजम किंवा जाड सतरंजी घालून बसले पाहिजे. जेव्हढा मोठा गायक/वादक तेव्हढी जास्त गर्दी. अगदी दाद देऊन हात खाली ठेवला की शेजारच्या माणसाच्या मांडीवर ठेवला नाही की पुरे! पण त्या गर्दीत खरे संगीताचे दर्दी लोक भेटले. माझे कानसेन म्हणून शिक्षण तेव्हा सुरू झाले. बाबांबरोबर रात्री १० वाजता मंगळवारी संगीतसभेचे शास्त्रीय संगीत ऐकण्याची खूप वेळा संधी मिळाली मला. पण पुण्यात खरी वाटचाल सुरू झाली. आम्ही शिवाजी मंदिरात थोडे आधी जेवून खाऊन पोचलो. त्याकाळी आम्ही नातू बागेत रहायचो. वि.ग.कानिटकर, श्री.ग.माजगावकर आणि आम्ही एकाच ठिकाणी फाटक वाड्यात राहायचो. उषा कानिटकर तेव्हा बी.जे.मेडिकल ला गेली होती. कानिटकर वहिनी रेणुका स्वरूप मध्ये (तेव्हा ती शाळा मुलींची भावे हायस्कूल याच नावाने ओळखली जात असे) शिक्षिका होत्या. नंदू कानिटकर याचा हात आणि कानिटकर काका यांचा एक आदर्श असल्याने वाड्यातील इतर काही टवाळ मुलांपासून मी लांबच राहिलो.
त्या काळी सभागृहात लवकर पोचण्याचा एक मोठा फायदा म्हणजे पुढे बसायला जागा मिळायची. गायकाच्या किंवा वादकाच्या जवळ. सभागृह लवकर भरले. भीमसेनजी गाणार होते, ते आले. त्यांना पाहून शाखेत जाणारा मी ताडकन उठून त्यांना साष्टांग दंडवत घातले. पुढील ४-५ तास कसे गेले ते कळलेच नाही. मी आणि माझी बहिण दोघेही पूर्णपणे जागेच राहिलो. शेवटी चक्क माझ्या बहिणीने भैरवीची फर्माईश केली तेव्हा रात्रीचे २ वाजून गेले होते. भीमसेनजी कौतुकाने हसले, आणि भैरवीच्या काळजाला हात घातला. त्यांच्या गाण्याबद्दल मज पामराने काय बोलावे/लिहावे? आजही आठवण झाली की डोळे भरून येतात. कानात त्यांनी एकदा गायलेल्या जोगीयाचे सूर अजूनही एकांतात ऐकू येतात, अश्रू आपोआपच वाहू लागतात. सुरुवातीला अरुणा “काय झाले?” असे विचारत असे. ३८ वर्षांनंतर तिलाही माहीत झाले आहे, मी दुःख झाल्यावरच मी अश्रूपात करतो असे नाही. आज या महात्म्याची जन्मशताब्दी! आपल्या सफल आयुष्यात या लोकांनी किती अगणित लोकांना गरीब-श्रीमंत, धर्म, जात, स्त्री-पुरुष असा कसलाही भेदभाव न करता निव्वळ आणि निखळ आनंदच दिला. फक्त निर्व्याज प्रेम दिले. परमात्म्याची इतकी आराधना इतकी वर्षे भीमसेनजी आणि जसराजजी यांनी केली आहे की सध्या इंद्राच्या दरबारात दोघांची जुगलबंदी चालू असेल. तिथेही बैठक असली तर बाबा नक्की असतील आमच्या आत्या आणि काकांबरोबर. https://youtu.be/EqlYN2hHYtY
त्यांच्या गायनाबद्दल थोरा मोठ्यांनी खूप लिहून, बोलून ठेवलेच आहे. मला वाटते की हे भैरवी भजन त्यांच्या सद्यस्थिती बद्दल पूर्ण खात्री करून देते आहे.
जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा
देह के माला, तिलक और भस्म, नहिं कुछ काम के
प्रेम भक्ति के बिना नहिं नाथ के मन भायेगा
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा
जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा
दिल के दर्पण को, सफ़ा कर, दूर कर अभिमान को
खाक हो, गुरु के चरण की, तो प्रभु मिल जायेगा
सोहि परम पद पायेगा , सोहि परम पद पायेगा
जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा
छोड़ दुनिया के, मज़े और बैठ, कर एकांत में ध्यान धर,
हरि के चरण का, फिर जनम नहीं पायेगा
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा
जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा
दृढ़ भरोसा, मन में रख कर, जो भजे हरि नाम को
कहत ब्रह्मानंद, ब्रह्मानंद में ही समायेगा
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा
जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा,
सोहि परम पद पायेगा, सोहि परम पद पायेगा
मला नक्की खात्री आहे आज “तो” स्वरभास्करांच्या गायनाने प्रसन्न झाला असेलच. पृथ्वीतलावर इतकी दशके ऐकून आम्ही स्वर्गसुख काय आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाच आहे, आज देवेंद्रही स्वतः घेतोय….
लोकहो, एका तेजस्वी गायकाला खूप ऐकायला मिळाले, पहायला मिळाले, त्यांची थोडीफार सेवा करता आली, आणखी स्वर्गसुख फार वेगळे काय असू शकते? संगीतक्षेत्रातील हे महर्षी, देवर्षीच आहेत की. आज दिवसभर त्यांचेच सूर कानात घुमताहेत. म्हणूनच ही भैरवी…
काळजी घ्या, सुरक्षित रहा…
16 replies on “स्वरांचा तेजोमय भास्करराज”
Your Natu Baug memories and that also with your Father and sister really mesmerizing
LikeLiked by 1 person
Thanks Vivek
LikeLike
पंडितजी च्या गायनाचा कुटुंबा बरोबर घेतलेला चिरस्मरणीय आनंददायी अनुभव अद्भुत आहे. विवेचन पण फारच छान केले आहे डोळ्या समोर चित्र उभे राहते. अप्रतिम.
LikeLiked by 1 person
Thanks Uday
LikeLike
खरंच नशीबवान तू.
LikeLiked by 1 person
अगदी खरे आहे, त्या काळात पुण्यात राहिल्याचा मोठा फायदा झाला
LikeLike
सुंदर भजन
LikeLiked by 1 person
Thanks Shrinivas ji. Extremely meaningful words
LikeLike
सुंदर विवेचन, सुंदर भजन. मला माहित नव्हतें तुम्ही नातु बागेत रहायला होता.
LikeLiked by 1 person
Yes. We did, between 1967-69
LikeLike
👌👌
LikeLiked by 1 person
Thanks Ajit
LikeLike
वाह!! पंडित भीमसेन जोशी जी हे खरंच स्वरभास्कर होते..
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या त्या काळातील पुण्यातील आठवणी खरंच खूप रमणीय होत्या ….
अश्या थोरामोठ्यांच्या सहवासाचे सुगंधी आणि अविस्मरणीय क्षण तुम्हाला वेचता आले आणि मनाच्या कुपीत साठवता आले हे खरंच तुमचे भाग्य…..
LikeLiked by 1 person
True. I think there are always opportunities for everyone. We don’t realize their value till later
LikeLike
सुंदर विवेचन
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ डांगे
LikeLike