Categories
Uncategorized

ओजस्वी राष्ट्रगान

आज बरोबर आठवडा झाला, गेल्या रविवारी सकाळी बातमी मिळाली तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया “ही बातमी खोटी आहे” अशीच होती. गेला महिनाभर लतादीदी आजारी होत्या पण त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना वाटत होते तसेच मलाही त्या बऱ्या होतील असेच मनोमन वाटले. नाही म्हणावयास परत व्हेंटिलेटरवर घेतले म्हटल्यावर मनात शंकेची पाल चुकचुकली. हॉस्पिटलमधले डॉक्टर रोज त्यांच्या प्रकृतीबद्दल वृत्तवाहिन्यांना थोडक्यात सांगत होतेच. त्यातही लतादीदी सुधारत आहेत असेच सांगितले जात होते. रविवारी सकाळी आशाताई हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्या व “परिस्थिती हळूहळू सुधारत आहे” असे त्यांचे निवेदन वृत्तवाहिन्यांवर दिसले. असो, नियतीपुढे कोणाचाच इलाज नाही, हेच खरे.

त्यांच्याविषयी गेल्या आठवड्यात अक्षरशः हजारोंच्या संख्येने लेख वेगवेगळ्या भाषेत आले आहेत. कोट्यवधी भारतीयांना आपल्या घरातील कोणीतरी गेल्यासारखे दुःख झाले. मला खात्री आहे की माझ्यासारख्या कित्येक लोकांना त्या दिवशी जेवण गेले नसेल.

दिदींच्या सर्वच भाषांत एकाहून एक सरस हजारो गाणी, आपण सर्वच आयुष्यभर रोज प्रत्येक माध्यमातून शेकडो वेळा ऐकत आलो आहोत. मला वाटते एकही भारतीय “मी लतादीदींचे गाणे कित्येक दिवस ऎकलं नाही” असे म्हणू शकणारच नाही.

त्यांनी आपल्या सर्वांच्या हृदयावर राज्यच केले- आपल्या भावविश्वात एक अनभिषिक्त राज्ञी म्हणूनच. त्यांच्या सर्व अगणित कृतींपैकी सर्वात लाडकी म्हणजे माझे (महाराष्ट्राच्या दोन दैवतांपैकी एक) आद्यदैवत, शिवकल्याण राजा हा गाण्यांचा संच. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या एकमेवाद्वितीय प्रतिभेचा हा एक अप्रतिम अविष्कार आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निवेदन, विविध थोरामोठ्या कवींच्या सिद्धहस्त लेखणीतून महाराजांवर केलेल्या अप्रतिम कवितांना अविस्मरणीय चाली देऊन मराठी संगीताच्या क्षेत्रात एक बहुमूल्य भर टाकण्यात बाळासाहेब मंगेशकर यांना निश्चितच यश मिळाले आहे. हा संच प्रसृत झाला आणि आजपर्यंत एकही आठवडा असा गेला नाही की मी यातले एखादे गाणे ऐकले नसेल. यातील माझे सर्वात आवडते गाणे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धारदार लेखणीतून उतरलेली संस्कृतप्रचुर भाषेतील एक अत्युच्च काव्य.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणात इतके संस्कृत शब्द वापरले जातात की मराठी की संस्कृत भाषेत आहे, हे ओळखण्यासाठी कधीकधी क्रियापद पाहावे लागते. त्यांच्या काव्याबद्दल माझी बोलायची पात्रता नाही. मी मुग्ध होऊन त्यांचे लिखाण वाचतो आणि पूजतो. कोत्या मनोवृत्तीच्या भ्रष्ट राजकारण्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले, अगदी नेताजींच्या बाबतीत घडले तसेच केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्व श्रेय फक्त दोन नावांना द्यायचे आणि इतर खऱ्या हालअपेष्टा भोगलेल्या आणि स्वतःचे रक्त सांडून, प्रसंगी प्राणांची आहुती स्वातंत्र्य देवतेला अभिषेक करणाऱ्या/अर्घ्य देणाऱ्या सर्वांना पूर्णपणे हेतुपुरस्सर दुर्लक्षित करायचे हा एकमेव उद्देशाने काम झाले आहे. पण कितीही झाकले तरी सत्य लपून राहत नाही, शेवटी उघडकीस येतेच. हे गाणे ऐका, आपल्या लहानपणापासूनच महाराजांनी केलेल्या पराक्रमाचा उद्घोषच सावरकरांनी केला, त्यांच्या शालेय जीवनापासूनच त्यांच्याबद्दल खूप उदाहरणे आहेत. त्यांवर कळस शोभेल अशी ही तेजस्वी रचना आहे. इतकी सुंदर आहे, शेकडो वेळा ऐकून ही प्रत्येक वेळी रोमांच उभे राहतात. https://youtu.be/aAsIi5FXB14

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरण तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

वाईट वाटते की महाराजांचे नांव वापरणाऱ्या लोकांना त्यांचा विसर पडलेला दिसतो आहे. त्यांचे वागणे-बोलणे अगदी महाराजांच्या विचारांच्या उलट चालले आहे. लवकरच ही अमावस्येची रात्र सरेल अशी प्रार्थना करतो.

लोकहो, काळजी घ्या, वेळीच लस घ्या, चिनी धोका अजून टळला नाही. शुभरात्री!!

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

12 replies on “ओजस्वी राष्ट्रगान”

Apratim!!
Just sharing my tribute to her written last Sunday 06/02/2022
1929 to infinity
आत्ताच शिवाजी पार्कवरील लतादीदींच्या अंतिम संस्काराची दृश्य बघितले अन् मन सुन्न झाले
सकाळपासून सर्व सोशल मीडिया platforms हृदय स्पर्शी श्रद्धांजलीच्या बातम्यांनी ओसंडून वाहत आहेत
मी एक सामान्य नागरिक पण त्यांची चाहती!! *Always loved her from distance!!*
मी गायिका तर नाहीच पण कानसेन मात्र जरूर!! आणि हे कान तयार होण्यासाठी त्यांच्या गाण्यांचा मोठाच हातभार!!
अगणित श्रवणीय गाणी माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याचा निगडीत भाग
(कदाचित ज्ञानेश्वरांनी सुद्धा पसायदान गायल्या बद्दल संजीवन समाधी तून त्यांचे आभार व्यक्त केले असतील😉!)
किती किती वेचू मोती या समृद्ध भांडारातून!! अशी आपल्यासारख्या याचं कांची स्थिती!
त्यामुळे कोणते गाणे श्रेष्ठ हा वादच नाही !!
पण त्याच बरोबर मी त्यांची चाहती आहे
त्यांच्या सावरकर भक्तीसाठी
मराठी अस्मितेचा आणि शिवरायांचा सार्थ अभिमान बाळगण्यासाठी
सर्व अडचणीतून मार्ग काढत प्रसंगी अवमान झेलून यशाच्या शिखरावर पोहोचण्याच्या विजिगीषु वृत्ती साठी!!
मला खात्री आहे की तृप्तीचा मोगरा हुंगू नच त्या पंचतत्वात विलीन झाल्या असतील!
*आ दि मी अनंत मी हेच त्यांच्या संदर्भातील कालातीत सत्य!!*
आणि म्हणूनच वरील शीर्षक👆
प्रत्येक वृक्षाला पानगळ असतेच
पान जीर्ण झाले ती गळून पडणार हा तर निसर्ग नियमच!!
पण जेव्हा sonvarkhi पिंपळ पान गळून पडते तेव्हा दुःख अंमळ जास्तच होते नाही का??

आणि कदाचित

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव

दरीदरींतून मावळ देवा देऊळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडीकपारी अमृत प्याले

आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव!
हेच त्यांच्या शेवटच्या श्वासातील गाणं असेल!!
🙏🙏🙏
©️ Padmaja Dange!!

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s