Categories
Marathi Poetry Suresh Bhat

एका अवलीयाची आठवण

आज १५ एप्रिल! मराठी काव्याची नवी दालने उघडून सजवणाऱ्या अवलीयाचा जन्मदिवस! आपल्यात असते तर ते आज ९० वर्षांचे झाले असते!

१५ एप्रिल १९३२ रोजी अमरावतीच्या एका डॉक्टरांच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले, ते म्हणजे मराठी कवितेत गझला लोकप्रिय करणारे व स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर शारीरिक व्यंगावर मात करणारे सुरेश भट! त्यांच्या खूप आधी मराठी भाषेत गझला झाल्या, पण भटांच्या इतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्यांना मिळाली नाही, त्यामुळे कित्येक लोकांनी माझ्याशी भटांनीच मराठीत गझला लिहिण्यास सुरुवात केली असा वाद घातला आहे. भट लहान असताना त्यांना पोलिओ  झाला, त्यामुळे त्यांचा उजवा पाय आयुष्यभर कमजोरच राहिला. त्यांना लहानपणी संगीताची गोडी लागली, ते बासरी वाजवत, अगदी शाळेच्या बँड साठी सुध्दा ते बासरी वाजवत. त्यांना हार्मोनियम ची गोडी लागली आणि स्वतः चांगले गायचे सुद्धा!!

बी ए झाल्यावर  ते अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून काम करत होते. याच काळात त्यांचे लेखन चालू होतेच. मला नेहमी एक प्रश्न पडतो की या माणसाने लिहिलेल्या कवितांची चोपडी फूटपाथवर दस्तुरखुद्द पंडित हृदयनाथजींना मिळाली नसती, आणि त्यांनी ती वाचली नसती, किंवा त्यांना ती आवडली नसती, आणि ते कवितेच्या लेखकाला शोधत भेटायला गेले नसते, आणि स्वतः चाली लावल्या नसत्या तर आपण सगळे या अप्रतिम कविराजांच्या कवितेला  मुकलो असतो का?

त्यांच्या दैवी प्रतिभेचे दोन आविष्कार पाहूयात:

पहिली गज़ल थेट काळजालाच हात घालते:

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!

इतकी हृदयस्पर्शी गझल लिहिणाऱ्या कवीची एक रचना पहा, शृंगार रसात भिजली आहे ती पहा:

चांदण्यात फिरताना …..

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात

सखया रे, आवर ही सावर ही चांदरात

निजलेल्या गावातुन आले मी एकटीच

दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच

ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात

सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर

तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर

श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून

पण माझी तुळस तिथे गेली हिरमुसून

तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात

एव्हढी मनभवन शब्दरचना अगदी कार्तिकेयाला सुद्धा भुरळ घालेल (आपल्याकडे कार्तिकेय ब्रह्मचारी असतो, दक्षिणेकडे त्याला दोन बायका असूनदेखील त्याचं नामकरण कुमारस्वामी असे झाले आहे).

या गाण्याला चाल बांधली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी. बाळासाहेबांच्या चालींचे शिवधनुष्य सामान्य गायकांनी उगाच पेलण्याचा प्रयत्न करू नये. लंकाधिपती रावणाची सीतास्वयंवरात जशी फजिती झाली होती, तशी होईल, व आपले नसलेले गायनाचे पितळ उघडे पडेल याची जाणीव नक्की ठेवावी. मला वाटते की बाळासाहेब गाण्यासाठी अत्यंत क्लिष्ट असलेल्या पण माझ्यासारख्या कानसेनांना ऐकण्यासाठी अत्यंत प्रिय अशा कर्णमधुर चाली फक्त त्यांच्या दोन भगिनींना डोळ्यासमोर ठेवून बांधत असावेत. ही गाणी समर्थपणे गाणे हे येरागबाळ्याचे काम नोहे. हे सदाबहार आणि खऱ्या अर्थाने अमर गाणे गायले आहे आशाताईंनी. https://youtu.be/NRunsvIKWUU

आशाताईंनी श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात, म्हटले आणि अंगावर रोमांच उभे राहिले नाहीत, तर तुम्ही नक्की औरंगजेब वगैरे गटातील आहात किंवा ठार बहिरे आहात असे समजावे.

अशा या खऱ्या अर्थाने चतुरस्त्र कवीच्या गगनचुंबी प्रतिभेला साष्टांग दंडवत.

संतश्रेष्ठ चोखामेळा म्हणतात तसे म्हणावेसे वाटते:

जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला झालो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

बहु केली आस। तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥

भट दुर्दैवाने अकाली हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले. केव्हढा त्यांचा व्यासंग! त्यांनी गायलेल्या गझला ऐकणे म्हणजे सुद्धा दुग्ध शर्करा, मानिकांचन वगैरे योगच!

या अवलीयाची आज आठवण आली, त्यांच्या रचनांवर केलेली गाणी मनसोक्त ऐकली! अगदी ब्रह्मानंदी लागली टाळी!

लोकहो, काळजी घ्या! उन्हाळ्यात पाणी पुष्कळ पिणेच उत्तम! प्रमाणात साखर व मीठ घालून पिणे किंवा नुसतेच पाणी प्यावे. यंदा लवकरच आणि खूप तीव्र उन्हाळा आपल्याला त्रस्त करतोय. शुभरात्री.

Advertisement

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

16 replies on “एका अवलीयाची आठवण”

छान. आपला आवाका फार मोठा आहे..भट साहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ते कऱ्हाडे ब्राह्मण होते. हृदयनाथ मंगेशकर नी चाली लावल्या म्हणून ते फेमस झाले हेही खरे

Liked by 1 person

ते डॉ आंबेडकर यांचे खूपच मोठे चाहते होते, तसेच निरीश्वरवादी ही होते. या दोन्ही कारणांनी त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली

Like

डॉक्टर, खरंच खूप सुंदर लिहिले आहे .. तुम्ही लिहिलेलं वाचायच्या आधीच “मालकंस” मध्ये अडकलो …विलक्षण काव्य आणि आशाताई जबरदस्त

Liked by 1 person

कलंदर आणि औरंगजेब यांच्या मधे जे जे आहेत त्यांच्या मनाला भुरळ घालणारे सर्व लिखाण. पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर व लतादीदी आशाताई यांनी त्याचे सोने केले.

छोटासा पण मस्त आलेख.

Liked by 1 person

अतिशय सुंदर मराठी गझलकार…. दादा, एका अवलिया ने दुसऱ्या अवलियांचे केलेले वर्णन अप्रतिम….

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s