Categories
Marathi Poetry Romantic songs

मराठी भावविश्वातील त्रिवेणी संगम….

आज १६ मे, मराठी जनमानसातील एका मौल्यवान रत्नाचा- माणिक वर्मांचा– जन्मदिवस. आज आपल्यात असत्या तर माणिकताई आज ९६ वर्षांच्या झाल्या असत्या. पण हे विधान चुकीचे लिहीलं आहे मी, कारण खऱ्या अर्थाने माणिकताई आजही आपल्यातच आहेत, देहाने नसल्या तरी त्यांच्या अद्वितीय संगीताच्या माध्यमातून आपल्यातच होत्या, आहेत, आणि राहतील. १६ मे १९२६ रोजी दादरकर कुटुंबात जन्मलेल्या (नावाला साजेश्या अशा अमूल्य) माणिकताई यांनी किराणा आणि आग्रा घराण्यातील शास्त्रीय गायन शिकले, माझ्या वडिलांनी त्यांच्या मैफिलीतले शास्त्रीय गाणे ऐकले आहे, पण मी त्यांचे सर्व प्रत्यक्ष ऐकलेले गाणे म्हणजे भावगीते, नाट्यसंगीत, भक्तिगीते, चित्रपटगीते, ठुमरी वगैरे प्रकारात मोडणारे पण अत्यंत सुरेल, अविस्मरणीय भावाविष्कार असलेले श्रोत्यांचे कान व मन तृप्त करणारे गाणे!

गाण्याचे कितीतरी प्रकार त्यांच्या एकमेवाद्वितीय गाण्याने सजलेले, त्यांचं गाणे म्हणजे देवघरातून आरतीच्या वेळी येणारा घंटेचा सोज्वळ व मोहक आवाज, मला त्यांच्या एकही गाण्यात एकही सूर बेढब, गोंगाट करणारा, किंवा उगाचच सप्तक सोडण्याची (व तोंडघशी पाडणारी) कसरत करताना ऐकल्याचे स्मरत नाही. पु लं नी त्यांच्या दैवी आवाजाचे वर्णन “सोज्वळ मोहकतेने सुंदर” इतके अचूक केले आहे. माणिकताई गाताना त्यांनी आपली शालीनता ,घरंदाज वागणे व लोभस वागणे सोडले नाही. देवाच्या देव्हाऱ्यात सांजवेळी लावलेल्या दिव्याच्या शीतल तेजाप्रमाणे त्यांचा आवाजही तेवायचा, मनातले विचारांचे मळभ दूर करून मनात शांतरस व भक्तिरस ओतप्रोत होऊन वाहू लागे. बुद्धपौर्णिमेच्या लख्ख पण शीतल चांदण्या सारखा मुलायम स्पर्श करण्याचे त्यात कसब होते.

आज त्यांच्या वाढदिवशी चांदण्याच्या सोबत माझ्या मनातले विचार मांडताना हे गाणे आठवले तर आश्चर्य कसले? माझ्या मोठ्या प्रभामावशीला, तसेच मधल्या सुमनमावशीला ही हे गाणे खूप आवडे! कामाचा न संपणारा पसारा आवरून प्रभामावशी हे गाणे स्वतः शी गुणगुणताना मी कित्येक वेळा एकले आहे.

राजा बढे यांचे काव्य अगदी सहजसुंदर आणि लहान मुलांनाही कळेल अशा भाषेतील शब्दरचना आहे. त्यावर स्वरसाज चढवला आहे तो महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू दैवत,  पु.ल. देशपांडे यांनी! पु.लं. इतके प्रतिभावंत होते की त्यांचा संबंध आपण साहित्य व नाट्य यांच्याशी स्वाभाविकपणे जोडतो. पण संगीताची जाण त्यांना खूपच चांगली होती. अगदी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून “गुळाचा गणपती” मधले “इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी, ज्ञानेशाची…” हे अमर गाणे गाऊन घेण्याइतपत त्यांचा वकूब होता. पु.लं. नी स्वतः राजा बढे यांची ही कविता चाल लावून गायली आणि ती ऐकल्याचे गीतकार गंगाधर महाम्बरे यांनी मुलाखतीत सांगितले आहे. पु.लंनी मग हेच गाणे (त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर) “सोज्वळ मोहकतेने सुंदर” असा आवाज असलेल्या माणिकताई यांच्याकडून चंद्रकंस रागात गाऊन घेतले तर आश्चर्य ते काय? पु.लंनी माणिकताई यांच्याबद्दल बोलताना म्हटले आहे की गदिमा आणि बाबूजी या असामान्य प्रतिभेच्या जोडगोळीची ती सुरेल, अप्रतिम गीते घरोघरी पोचवण्यासाठी एकच सोज्वळ, सात्विक मोहकतेने सुंदर असा आवाज होता तो माणिकताई यांचा.

पु.लंनी माणिकताई यांच्याकडून हे गाणे इतक्या हळूवारपणे गाऊन घेतले आहे की बोलता सोय नाही. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आतूर झालेल्या रतिला शब्द आणि स्वरांनी रेखाटले आहे ते मस्तच! मैत्रिणी थट्टा करताना लागलेली सल पण अगदी मस्त दाखवली आहे. शृंगाररसात न्हाऊन निघालेली ती ओढ पण किती सात्विकतेने दाखवली आहे. कुठेही निलाजरेपणा नाही की बीभत्स शब्द किंवा स्वरही नाही.

रवी वर्म्याच्या दैवी कुंचल्यातून साकार झालेली एक कालातीत कलाकृती वाटावी अशी ही शब्द-संगीत-स्वर यांच्या लोभस संगमातून अवतरलेली स्वर्गीय स्वररचनाच आहे. कोणाला श्रेयाचे माप झुकते द्यावे हे कळत नाही. बढे, पु लं, माणिकताई सगळेच लोकोत्तर प्रतिभेचे धनी.

या तिघांच्या एकत्र येण्याची सुवर्णसंधी साधून त्यातून ही साकारलेली अप्रतिम व खरोखरच कालातीत रचना, मराठी माणूस भुलला नाही तरच आश्चर्य!https://youtu.be/c6Vwqx5R2xA

हसले मनी चांदणे

हसले मनी चांदणे
जपुनि टाक पाउल साजणी, नादतील पैंजणे

बोचतील ग, फुलं जाईची तुझी कोमला काय
चांदण्यातही सौंदर्याने पोळतील ना पाय ?

पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे
सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे

कुजबुजुनी कानात सांगतो मधुप, नको ग रुसू
लाजलाजऱ्या कळ्याफुलांना खुद्‌कन्‌ आलं हसू

हो जरा, बघा की वरी, कळू द्या तरी, उमटु द्या वाणी
का आढेवेढे उगाच, सांगा, काय लाभले राणी ?

का ग अशा पाठीस लागता मिळुनी साऱ्या जणी ?
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी

किति, किति ग भाग्याची
भलतीच ओढ ही कामसुंदराची
नव्हे ग श्यामसुंदराची

सर्वांगसुंदर आणि अगदी कुठेही त्रुटी नसलेली ही रचना. आज माणिकताई यांचा ९६वा वाढदिवस आणि बुद्ध पौर्णिमा यांचा योग जुळून आला आणि त्यातून मला हे गाणे आठवले! तुम्हांला ही जुन्या आठवणींना उजाळा देऊन आनंदच मिळेल. मित्रहो! उन्हाळा संपत येऊन पावसाळ्याची चाहूल लागते आहे. शुष्क व तहानलेल्या धरित्रीला थोडासा दिलासा मिळेल अशी आशा करतो. आज एव्हढेच पुरे! शुभरात्री!

Advertisement

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

8 replies on “मराठी भावविश्वातील त्रिवेणी संगम….”

सर मनापासून कृतज्ञता..पुनः:एकवार अप्रतिम सुवर्णकाळातील सफर घडवल्याबद्दल…ही खरीखुरी श्रध्दांजली माणिकताईंना🙏🙏

Like

माझ्या लहानपणी मी त्यांची भावगीते ऐकली आहेत

त्याची पुन्हा उजळणी

गाणं एकदम अप्रतिम!

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s