Categories
Asha Bhosale Hridaynath Mangeshkar Lata Marathi Poetry

जाज्ज्वल्य देशभक्ताला कोटी कोटी नमन….

१९६७ साली आम्ही तिघे, आई, माझी बहिण व मी, पुण्यात आलो. बाबा हवाई दळातून निवृत्त होणार होते, ती तारीख निश्चित नव्हती म्हणून त्यांनी आम्हाला पुढे पाठवून दिले. मी ६६ पासून एक वर्ष माझ्या सर्वात मोठ्या मावशीकडे राहिलो होतो, त्या वर्षात मी वयाने लहान असूनही खूप काही शिकायला मिळाले. माझे मावसोबा शिस्तप्रिय पण प्रेमळ होते. उगाच शिक्षा कधीच करत नसत. त्यांची आदरयुक्त भीती होती पण त्यांच्या वागण्यातून मला खूप शिकायला मिळाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आईने दिलेले “माझी जन्मठेप” वाचून काढले, खूप क्लेश आणि दुःख झाले आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी असलेल्या माहितीत खूप भर पडली, आदर शेकडो पटीने वाढला. माझी मोठी आत्या पण पुण्यातच राहात होती. माझे आतोबा म्हणजे हिंदुमहासभेची विचारसरणी मानणारे व कट्टर सावरकरवादी. त्यामुळे त्या वर्षात बाळकडू अगदी मस्त मिळाले.

विनायक दामोदर सावरकर या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल खुलासेवार लिहायचे म्हटले तर उरलेले आयुष्यभर मी तेच करत राहीन. एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि खऱ्या अर्थाने देशभक्तीत समर्पित आयुष्य. तात्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्याही पैलूचा विचार केला तरी नतमस्तक व्हायला होते आणि स्वतः च्या क्षुद्रपणाची प्रकर्षाने जाणीव होते.

त्यांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात हे काव्य त्यांनी लिहिले. त्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे:

सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. सर्व क्रांतिकारी तरुण तिथे जमून इंग्रज सरकारच्या नाकावर टिच्चून स्वतः ची सर्व कार्ये करत. मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापटांनी बॉम्ब कसा बनवावा याची माहिती असलेले फ्रेंच भाषेतील पुस्तक एक फ्रेंच मैत्रिणीकडून भाषांतरित करून घेतले आणि त्याच्या प्रती सावरकरांनी काढल्या. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. कुटुंबाची वाताहत, हाती घेतलेले राष्ट्रकार्य उध्वस्त होऊन आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे त्यांना कळले.  यातून ते अक्षरशः लंडनहून पळून जाऊन ते ब्रायटनच्या किनाऱ्यावर जाऊन बसले. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ आणि उद्विग्न करणारा विचार आणि समोर पसरलेला सागर. तो मध्ये आहे म्हणून परत जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा राग आणि खिन्नपणा सागरावर काढत आहेत – त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस. मी तुला नेहमीच ते करताना पाहिले आहे.

भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता


त्यावेळेला मी तिथे , मायदेशी असताना तू मला प्रेमाने म्हणालास  की चल जरा फिरायला जाऊ
दुसऱ्या देशात आणि सृष्टीसौंदर्य पाहू.


मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू

त्याच वेळेला माझ्या आईच्या हृदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.


तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले

पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन, आणि लगेच परत घेऊन येईन. तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला.  तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे सर्व जगाचा तुला अनुभव असणार हा माझा विश्वास आणि मलाही हा अनुभव मिळावा ही माझी इच्छा या दोन्हीच्या योगे  मी ‘बनलो’ म्हणजे तयार झालो आणि त्या मोहात गुंतून फसलो.

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभवयोगे बनुनी । मी

तव अधिक शक्त उद्धरणी । मी

उद्धरणाचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद्धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद्धरण शक्तीवर जास्त विसंबून मी इथं चांगलाच अडकलो!

‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।

लवकर येईन असं सांगून मी मातृभूमीला सोडलं.  पण आता ते आता कधी जमेल हे माहीत नाही म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी,

पोपट पिंजऱ्यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात (जाळ्यात) सापडावा तसा अडकलो.

भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती

मातृभूमीचा विरह सतत कसा सहन करू यापुढे ते कळत नाही. सर्व दिशा तमोमय झाल्या म्हणजे अंधःकारमय झाल्या, त्यामुळे मार्ग दिसत नाही असं झालंय.

गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥

मला आठवतात ती माझ्या देशातील आंब्याच्या बागा आणि झाडे, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. त्या फुलबागेला ही मी दुरावलो. त्या आंब्याच्या झाडांच्या वत्सल प्रेमाला ही मी दुरावलो. ही उपमा इंग्लंड मधल्या मोठ्या फुलांना तितका मोहक सुगंध नाही आणि आंब्याचे झाड हे   कुटुंबाचे प्रतीक म्हणून वापरले आहे. त्यातले वात्सल्य इंग्लंडमध्ये नाही.

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी

आकाशात खूप नक्षत्रे आहेत, पण मला माझ्या मायदेशीचा ताराच जास्त आवडतो. इथे मोठा महाल जरी तुम्ही दिलात तरी घरची झोपडीच मला जास्त आवडते.

तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा

मला मातृभूमीशिवाय राज्य तर नकोच आहे, पण वनवास ही माझ्या नशिबी आला तर मायदेशीच्या वनातलाच मिळो.


भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥ सागराला सावरकर म्हणतात माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतमातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर मग भेट न घडल्याने प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते

फेसाळलेल्या लाटा सावरकरांना निर्दयपणे हसणाऱ्या वाटतात, त्यांना उद्देशून ते म्हणतात: “माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ?” गुलाम जगाकडे पाहून तुच्छतेने हसतात; आणि ते गुलामीवृत्तीचंच हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणाऱ्या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणाऱ्या सागरा, माझ्या आईला तू अबला समजून फसवतोस आणि मला विदेशवास किंवा विवास घडवतो आहेस.

मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी


तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥

तू इंग्लंडला स्वतः घाबरतोस, पण माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वी अगस्ति ऋषींनी एका आचमनात तुला क्षणार्धात पिऊन टाकले तो प्रसंग तू विसरला आहेस. सागरा, माझा देशाच्या विरहाने तू माझा प्राण तळमळवीत आहेस.

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूता मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ सृष्टिची विविधता पाहू
तैं जननीहृद् विरहशंकितहि झाले परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी येईन त्वरे कथुनि सोडिले तिजला ॥
सागरा प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥
सागरा प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य मज प्रिया साचा वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे त्वदविरहाची शपथ घालितो तुजला ॥
सागरा प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता रे अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥
सागरा प्राण तळमळला

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे अप्रतिम काव्य स्वतः ची विरही अवस्था दाखविण्यासाठी लिहिले. त्यावर बाळासाहेब मंगेशकर यांनी स्वरसाज चढविला आणि सर्व मंगेशकरांनी ते एकत्र गायले आणि मराठी भाषिकांना एक अप्रतिम भेट दिली. सर्व भावंडांनी एकत्र म्हटलेली अशी निवडकच गाणी आहेत, हे निर्विवाद पणे त्यातलं सर्वोच्च आहे.

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा १३९ वा वाढदिवस! त्यांच्या ओजस्वी पण संवेदनशील लेखणीतून उतरलेले एक हृदयस्पर्शी विरहगीत,मला जेव्हढे आवडते तेव्हढेच तुमच्या पसंतीस उतरेल अशी आशा करतो.

स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्याइतके देशावर निरलस आणि निर्मोही प्रेम कोणीही केले नसेल.

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

26 replies on “जाज्ज्वल्य देशभक्ताला कोटी कोटी नमन….”

हे समीक्षण मनाला खूप भावलं. बालपणी माझे बाबा तात्यारावांच्या गोष्टी अश्या सुंदर सांगत की अनेकवार ऐकूनही या खर्या हिरोचं गुणगान ऐकतच रहावसं वाटे. तुम्ही पुनःप्रत्ययाचा आनंद दिलात!

Liked by 1 person

फार सुंदर लेख. सावरकरांच्या त्या परिस्थितील मनाच्या संवेदना, एका सुंदर गीताद्वारे कशा प्रगट झाल्या हे आपण फार सुंदर रीतीने शब्दांकन केले आहे.

Liked by 1 person

Hya ganache shabd ,sangit rachana शब्दातीत आहे. aani savarkar hyanchya baddal kay bolnar? Himalaya evadhe कर्तुत्व tyanche. Tyanna 🙏🙏🙏🙏🙏

Liked by 1 person

माझही असच. सातवीत असतांना मोठ्या भावाने, माझी जन्मठेप, १८५७चे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने, काळे पाणी ही पुस्तकं आणून दिली. आयुष्यभर त्यांचा प्रभाव आहे.

Liked by 1 person

धन्यवाद डॉ कुलकर्णी, तात्याराव , त्यांचे जीवन, विचार आणि सर्व प्रकारचे साहित्य हे मला कायम प्रेरणादायी आहेत

Like

एका अप्रतिम गाण्याचं तितकच अप्रतिम रसग्रहण 🙏🙏

Liked by 1 person

अर्थपूर्ण कविता व त्याचे उत्कृष्ट विवेचन. विनायक दामोदर सावरकरांना शत शत प्रणाम 🙏🙏🙏

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s