Categories
Devotional melodies

एक आर्जवी विनवणी

आज दवाखान्यातून घरी आलो, तेव्हा ब्लू टूथ स्पीकर वर हे भजन लागले होते. बाबा आणि माझे सर्वात आवडते गायक. मी स्वरमार्तंड पंडित जसराजजींचे गायन सर्वप्रथम १९६७-६८ साली पुण्यात ऐकले. तेव्हापासून गुरुजींनी आमच्या घरातील सर्वांच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला आहे. कोविडच्या काळात गुरुजींनी त्यांचा ऐहिक अवतार आणि पृथ्वीतलावरचे वास्तव्य संपविले, तेही अमेरिकेत असताना. त्यांचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. आज ते गेले दोन वर्षे भीमसेनजी आणि आता शिवकुमार शर्माजी यांच्याबरोबर स्वर्गात मैफल सजवत असतील. देवेंद्राच्या दरबारात सगळ्यांचे कान नक्कीच तृप्त झाले असतील. बाबाही खुश असतील. मला आठवतात ते बाबा हॉल मध्ये दाराजवळ सोफ्यावर एक हात सोफ्याच्या पाठीवर टाकून दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन बसलेले बाबा- गच्ची आणि हॉल मधल्या खिडकीवरचा पडदा फक्त वाचायला पुरेल एवढा उजेड येण्यासाठी आणि तेवढाच उघडलेला- समोर बोस वर जसराजजींची एखादी सीडी लावलेली. लागली ब्रह्मानंदी टाळी! तहान भूक हरपलेल्या अवस्थेतले बाबा, त्यांना मध्येच जेवायला बोलावले तर आईवर चिडून म्हणायचे “कधी धड ऐकू देत नाही”. चार घास खाऊन लवकरात लवकर पॉज केलेली सीडी परत चालू करून मूळ पदावर स्वारी परत यायची. जसराजजी यांचा आवाज आणि गाणे इतके मोहक आणि मधाळ की आज आठवण आली तरी हमखास अश्रूपात सुरू होतो. त्यांची खासियत म्हणजे प्रत्येक रागाच्या सुरुवातीला ते नेहमी एक संस्कृत श्लोक म्हणायचे. सगळे वातावरण पवित्र होऊन जायचे. प्रत्येक श्रोत्याच्या कानात स्वरामृत पुरेपूर ओतूनच पंडितजी उठणार. त्यांचे गाणे म्हणजे आयुष्यभर त्यांनी केलेली ईश्वरी आराधनाच. एव्हढे पुण्य पदराला असताना मोक्ष निश्चितच मिळणार!

आजचे भजन म्हणजे थोर संतकवी सूरदास यांनी लिहिलेली कृष्णाची आळवणी आहे.

गुरुजींनी मियाँ की मल्हार मध्ये काय अप्रतिम म्हटले आहे पहा, भजनी ठेका अचूक घेतला आहे. अगदी कानांचे पारणे फिटले, त्यांच्या सुरात न्हायलेला माझा जीव दिवसाचा थकवा विसरून त्यांच्या गाण्यासमोर पुनश्च नतमस्तक झाला https://youtu.be/M5xmuW8077U

असे गाणे ऐकून भगवान श्रीकृष्ण सुद्धा राधा, गोपाळ, गाईगुरे, सर्व यादव सौंगडी सोडून जातीने हजर झाला असेल आणि भक्तीत रंगून गेला असेल, वेळप्रसंगी देवही भान हरपून भक्तांबरोबर या भक्तीसोहळ्यात नाचला असेल. तसाही कान्हा मूळचा जास्त हळवा, भक्तांना सहजच वश होणारा, प्रेमाचा भुकेला!

ऐकून पहा, तुमची ही तहान भूक हरपून जाईल. अगदी नास्तिक असलात तरी हात जोडले जातील!

श्याम बिना उनये ये बदरा

श्याम बिना उनये ये बदरा
आज श्याम सपने में देखे
भरी आई नैन धुरक गयो कजरा|
श्याम बिना…

चंचल चपल अतरी चितचोरे
निसि जागत मैं का भयो पगोरा,
सूरदास प्रभु कब ही मिलोगे
तज गए गोकुल मिट गयो झगड़ा |
श्याम बिना…

आता परत ऐका जसराजजी यांच्या स्वरात हेच भजन! दोनदा ऐकून पंडितजी आणखी एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवतात की नाही ? https://youtu.be/ILE4agPlfQM

अहाहा, गुरुजी, काय सोमवारी योग जुळून आलाय! काही वेळ तुमच्याबरोबर घालवला, आठवड्याची सुरुवात तर मस्त झाली…

मित्रहो ऐका, धुंद व्हा आणि मग परत परत ऐकत रहा… शुभरात्री

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

16 replies on “एक आर्जवी विनवणी”

🙏🏻आवाजाचे जादूगर…..आजही विसरु शकत नाही…कानडा रागाचे प्रकार नावाने सुरेल सभेचा कार्यक्रम केला होता… संगीत मार्तंडानी साडेतीन तास जी धमाल केली होती.. अर्थात गरवारे मधे …या थोर लोकांना जवळून ऐकता आलं..हेच परम भाग्य…मी जवळपास चाळीस वर्षांहून अधिक काळ सवाईला जातोय…हे ही ईश्वराचे देणे..सर किती विविध विषयांवर लिहून आम्हा सामान्यांच्या आयुष्यात अतीव आनंद निर्माण करत आहात…🙏🏻🙏🏻🙏🏻

Liked by 1 person

मला मिळालेल्या आनंदी अनुभवांचे शब्दांकन माझ्या लंगड्या लेखणीने करतो, तुम्हाला आवडले हा तुमचा मोठेपणा! अगदी मनापासून धन्यवाद विवेकजी!!

Like

सुंदर अप्रतिम संगीत तसेच अलौकिक आनंद अनुभव पंडितजींना शतशः नमस्कार

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s