Categories
Hridaynath Mangeshkar Inspiration

आठवण एका युगपुरुषाची:

आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी! आजच्याच तिथीला शालिवाहन शके १५९५ या वर्षी आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानाच्या सनातन धर्माचे रक्षण आणि पुनरुत्थान करण्यासाठी हिंदुपदपादशाही स्थापन केली! या पावन दिवशी महाराजांच्या त्या सोहोळ्याबद्दल थोडी माहिती घेऊ या! यवनांच्या क्रूर दमनाशी प्रभावी लढा देऊन महाराजांनी आज एका नव्या युगाचीच सुरुवात केली. पृथ्वीतलावर फक्त एका देशात आज हिंदू टिकून असतील तर त्याचे श्रेय प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला द्यायला हवेच.

🚩 शिवराज्याभिषेक दिन तिथी प्रमाणे आज घडलेल्या सोहोळ्याचे वर्णन🚩

| छत्रपती शिवाजी महाराज… |

आज शिवराज्याभिषेक दिवस. आजच्याच दिवशी शके १५९५, म्हणजे इंग्रजी सन १६७४ या वर्षी किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. हा सोहळा तब्बल ९ दिवस सुरू होता. शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पानच आहे. शिवरायांच्या या स्वराज्याला अनेक जण हिंदू पदपादशाही म्हणूनही संबोधतात. ज्या काळात आणि ज्या परिस्थितीत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं, त्या काळात आणि त्याच्या आधी निजामशाही, अदिल शाही, मोगल, फारुखी सल्तनत, बरिदशाही, तुघलक, खिलजी, बहामनी, इमादशाही, कुतुबशाही आणि या व्यतिरिक्त लोधी, सिद्दी, पोर्तुगिज आणि इंग्रज या एकापेक्षा एक क्रूर आणि लुटारू परकीय आक्रमकांनी देशाच्या स्वातंत्र्यसूर्याला ग्रासलं होतं. आणि अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं ही साधी गोष्ट नव्हती. म्हणून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. जाणून घेऊया नेमका कसा पार पडला शिवरायांचा राज्याभिषेक…

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक विधीसाठी गागाभट्टांनी स्वतः एक लहानसा ग्रंथच रायगडावर लिहून तयार केला होता. या ग्रंथाचं नाव होतं ‘राज्याभिषेकप्रयोग‘. राज्याभिषेक विधी कसा करायचा, कोणकोणते धार्मिक संस्कार आणि समारंभ करावयाचे, याची तपशीलवार माहिती गागाभट्टांनी अभ्यासली होती. त्यानुसारच आता धार्मिक विधीस प्रारंभ होणार होता.

पहिला विधी महाराजांचे मौंजी बंधन! महाराजांची मुंज व्हायचीच राहिली होती. मौंजीचे जसे ब्राह्मणांमध्ये महत्त्व तसेच आणि तेवढेच ते क्षत्रियांमध्येही होते. म्हणून राज्याभिषेकापूर्वी महाराजांची मुंज करण्यात आली. महाभारत आणि रामायणातही याचे दाखले सापडतात. मुंज करूनच मुले गुरुकुलात शिक्षणाची सुरुवात करत.

मौंजीच्या वेळी महाराजांचे वय ४४ वर्ष होते. तेव्हा छत्रपती शिवरायांना सहा मुली आणि दोन मुलं होती. गागाभट्ट आणि बाळंभट्ट यांनी सर्व पौरोहित्य केले. महाराजांची मुंज इसवी सनानुसार २९ मे १६७४ रोजी पार पडली.

मुंजीनंतरच विवाह करावयाचा असतो. त्यामुळे गागाभट्टांनी शास्त्राप्रमाणे शिवरायांना लग्न करण्याची आज्ञा केली. यानंतर मुंजीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० मे १६७४ रोजी सोयराबाई यांचा महाराजांशी पुन्हा समंत्रक विवाह पार पडला. यानंतर सकवारबाई आणि पुतळाबाई यांचीही महाराजांशी पुन्हा लग्ने लागली.

या राज्याभिषेक सोहळ्यासाठी साधारणपणे रोज एक-एक विधी होत होते, असे वर्णन आहे.

पहिले दोन विधी झाल्यानंतर, शास्त्रात वर्णन केल्या प्रमाणे ऋत्विजवर्णन-पुण्याहवाचनपूर्वक यज्ञाला सुरुवात करून विनायकशांती करण्यात आली. तसेच नक्षत्रशांती, ग्रहशांती, इंद्रियशांती आणि पौरंदरीशांती, असे विधी पार पडले.

ज्येष्ठ शुद्ध एकादशीला महाराजांची सुवर्णतुळा आणि इतर अनेक प्रकारच्या तुळा करायचे ठरले होते. सोळा महादानांपैकी तुळादान किंवा तुलादान हे एक महत्वाचे दान मानले जाते.
याच दिवशी महाराजांची सुवर्ण तुळा करण्यात आली. यासाठी तराजूच्या एका पारड्यात महाराज बसले होते. तर दुसऱ्या पारड्यात सोन्याचे होन टाकण्यात येत होते. तुळा झाली. यासाठी एकूण १७ हजार होन लागले. म्हणजेच महाराजांचे वजनही पक्के दोन मण (१६० पौंड) एवढे होते

सोन्याशिवाय चांदी, तांबे, कापूर, साखर, लोणी, फळे आणि मसाले अशा अनेक पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यात आली आणि ते दान करण्यात आले.

शालिवाहन शके १५९५ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला (६ जून १६७४) (शनिवारी) पहाटे शिवरायांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त ठरला होता. बाळंभट्टांच्या पौरोहित्याखाली शिवरायांनी कुलदेवतांची पूजा केली. तसेच, कुलगुरू म्हणून बाळंभट्टांचीही पाद्यपूजा झाली. यानंतर शिवरायांनी वस्त्रभूषणे धारण केल्यानंतर आपल्या ढाल-तलवारींची आणि धनुष्यबाणांची पूजा केली आणि त्यांनतर ती सर्व शस्त्रे धारण केली.

सर्व शस्त्रे धारण केल्यानतंर महाराज, राणीसाहेब आणि राजपुत्र संभाजी राजे यांनी कुलदेवतांना, आईसाहेबांना, बाळंभट्टांना, गागाभट्टांना, ब्रह्मवृंदांना आणि वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार केला.

यानंतर कोदंडधारी महाराज राजसभेकडे निघाले. सुवर्णदंड घेतलेले प्रतिहारी, अष्टप्रधान आणि चिटणीस यांच्यासह महाराजांनी राजसभेत प्रवेश केला. गागाभट्ट आणि इतर पंडित मोठमोठ्या आवाजात वेदमंत्र म्हणत होते. त्या प्रचंड वेद घोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर स्थानापन्न झाले! आणि तोफा व बंदुकांनी दाही दिशा एकदम दणाणून सोडल्या. मोगलाई थरारली, औरंगजेबाला पोटशूळ उठला!

शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे रायगडावर त्या एका पावन दिवशी जणू दसरा आणि दिवाळी एकत्रच अवतरली होती. (संदर्भ – राजा शिवछत्रपति, लेखक – बाबासाहेब पुरंदरे)

आजच्या दिवशी महाराजांना स्मरण्यासाठी एक अजरामर गीत आठवले आहे, ते ऐका: https://youtu.be/9IXTvZ3yzRQ

शिवकल्याण राजा हा संच म्हणजे बाळासाहेब मंगेशकरांनी त्यांच्या दैदिप्यमान संगीतकाराच्या कारकिर्दीच्या मुकुटावर चढवलेला एक रत्नजडित शिरपेचच!

गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरी यांच्या रसाळ, सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला मराठी भाषेतील एक अप्रतिम पाळणा म्हणजे अंगाई गीत!

गुणि बाळ असा, जागसि का रे वाया,
नीज रे नीज शिवराया

अपरात्रीचा प्रहर लोटला बाई
तरि डोळा लागत नाही
हा चालतसे, चाळा एकच असला
तिळ उसंत नाहि जिवाला
निजवायाचा हरला सर्व उपाय
जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविशी तुझी सावळी काया ?
नीज रे नीज शिवराया

हे शांत निजे बारा मावळ थेट
शिवनेरी जुन्नरपेठ
त्या निजल्या ना, तशाच घाटाखाली
कोकणच्या चवदा ताली
ये भिववाया, बागुल तो बघ बाळा
किति बाई काळा काळा
इकडे हे सिद्धि-जमान
तो तिकडे अफजुलखान
पलिकडे मुलुख मैदान
हे आले रे, तुजला बाळ, धराया
नीज रे नीज शिवराया

गोविंदाग्रज यांनी इतके सुंदर वर्णन केले आहे की जिजाऊंच्या मनातील दुःख, आर्त वाणी आणि त्यांना सतत असलेली आजुबाजूच्या धोक्याची जाणीव अचूक आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. जिजाऊंच्या माहेरी झालेली कत्तल आणि कायम होत असलेल्या यवनांच्या पाशवी अत्याचाराची जाणीव त्यांच्याकडून शिवबाला दिलेल्या बाळकडूत दिसते. त्यातूनच शिवबा घडले आणि राष्ट्र वाचले.

 स्वराज्याच्या सीमेतील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले दिसतात छत्रपती शिवाजीमहाराज नि नकळत ओठांवर समर्थांचे शब्द येतात-

निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू।

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितींचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागीं ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणें सुशील । सकळां ठायीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणें नृपवर । तुच्छ केले ॥

देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

या भूमंडळाचें ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं ।
महाराष्ट्रधर्म राहिला कांही । तुम्हां कारणे ॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांस धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥

संत रामदासांनी किती नेमक्या आणि अचूक शब्दांत शिवछत्रपतींचं, कर्तव्याला सदैव तत्पर असं आदरणीय, विलोभनीय व्यक्तिमत्त्व चितारलं आहे. रयतेचा राजा असावा तर असा, असंच हे शब्द वाचल्यावर मनात येतं!

अशा माझ्या, तुमच्या , सर्वांच्याच लाडक्या दैवताची आठवण आजच्या पुण्यपावन दिवशी काढूया आणि त्याला साष्टांग दंडवत घालूयात.

Advertisement

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

29 replies on “आठवण एका युगपुरुषाची:”

सुंदर वर्णन सोहळ्याचे, डोळ्यासमोर समग्र चित्र उभे राहिले.

Liked by 1 person

Very nice writeup sir. Born great leader. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना विनम्र अभिवादन.

Liked by 1 person

A very nice reminder of chatrapati Shivaji maharaj and his importance for the destiny of our country. The angai Geet was the hidden gem. Thanks for the excellent writeup

Liked by 1 person

श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं तेजस्वी, सुजाण, पुरुषोत्तम, लयीन व्यक्तिमत्त्व होतं की जे सर्वानाच अत्यंत आदरणीय आणि वंदनीय होते. नियतीने त्यांना जर थोडे अधिक आयुष्य बहाल केले असते तर संपूर्ण भारताचा इतिहास चांगल्या अर्थाने बदलला असता….
त्यांच्यावर आधारित आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला महान ग्रंथ राजा शिवछत्रपती तसेच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा शिवकल्याण राजा हे अप्रतिम ठेवे आहेत….त्यातील अंगाई आणि संत श्री. रामदासांनी लिहिलेली शिव स्तुती अप्रतिम…
दोन्हीं रचना माझ्या अत्यंत लाडक्या…..

खूप सुंदर लेखन अनिरुद्ध सर 🙏🏻🙏🏻👌👌💐💐

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s