Categories
Lata Mangeshkar Marathi Poetry Sad Songs

कोंडमारा आणि कुचंबणा…

राजकवी भा रा तांबे यांनी लिहिलेल्या कविता वाचणे म्हणजे माझ्या बुध्दीला खाद्य मिळते!

इतक्या लयबद्ध आणि गेय कविता इतर कोणत्याही कवीची असेल असे मला वाटत नाही. मला त्यांची कविता वाचताना (म्हणजे खरे तर मी मनातल्या मनात गात असलेली कविता ऐकताना) जेव्हढा निखळ  आनंद मिळतो तसा इतर कवींच्या कवितेत सापडत नाही.

आता ही एक कविता घ्या: सर्व मराठी रसिकांच्या मनात गेली ५० वर्षे या कवितेने (आणि त्याच्या गायनाने) अक्षरशः अधिराज्य केले आहे. https://youtu.be/UC3zFtUtS00

ह्या कवितेचे दोन अवतार आहेत: जास्त ज्ञात असलेले लतादीदींनी गायलेले गाणे आणि विश्वनाथ बागूल यांनी गायलेले नाट्यगीत! देशकार या रागात वसंत प्रभू यांनी बांधलेली अप्रतिम चाल आणि त्या सुंदर चालीवर स्वरसाज चढवला आहे भारतरत्न लता मंगेशकर यांनी.

मराठी ही एकमेव भाषा आहे ज्यात चित्रपट संगीताशी बरोबरी किंबहुना त्यावर सरशी करणारे दोन प्रकार आहेत: नाट्यसंगीत आणि भावगीते! चोखंदळ रसिकांच्या मनात त्यामुळे कायम आनंदोत्सव अव्याहतपणे चालू आहे- सुरांचा जल्लोष! मधुर या शब्दाचे कोतेपण दाखवणाऱ्या त्या खळखळून वाहणाऱ्या स्वर्गीय सुरांच्या प्रपातात आपण नुसते नखशिखांत चिंब भिजून जायचे. १९५०-७० च्या काळात किती चिरंतन निर्मिती करून ठेवली आहे या निगर्वी कलाकारांनी- एकापेक्षा एक सरस वाटावी अशा अलौकिक रचना, अगदी खेळण्यांच्या किंवा मिठाईच्या दुकानात गेलेल्या लहान मुलाच्या मनांत होईल तसा संभ्रम निर्माण रसिकांच्या मनात व्हायलाच पाहिजे!!

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरी या हात ठेवोनी, उरींचा शूल का जाई ?
समुद्री चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा,
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी,
इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे

पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

१९२२ साली तांब्यांनी ह्या कवितेची निर्मिती अजमेर येथे केली होती. त्यानंतर सुमारे २५-२६ वर्षांनी आचार्य अत्रे यांनी पाणीग्रहण हे नाटक लिहिले आणि त्यात तांब्यांची ही कविता नाट्यगीत म्हणून वापरली. यानंतर आणखी दोन दशकांनंतर ह्या नाटकाला पुनरुज्जीवन मिळाले, विश्वनाथ बागूल आणि बकुळ पंडित यांनी या नाटकात प्रमुख भूमिका केल्या आहेत. नव्याने निर्मितीला नाटकाला संगीत दिले मराठी संगीतकरांच्या पंगतीत अतिशय वरच्या स्थानावर असलेल्या खळेकाका यांनी. श्रीनिवास खळे यांनी अक्षरशः संगीताची आयुष्यभर तपश्चर्या केली, आणि माझ्यासारख्या कानसेनांना कायमचे उपकृत करून ठेवले आहे की नाही? बागुलांच्या आवाजात ह्या गाण्याची एक वेगळीच झलक दिसून येते, ती पहा: https://youtu.be/owtiATYXDSQ

हे नाट्यगीत कितीही सुश्राव्य असले तरी मला लतादीदींनी त्यांच्या अद्वितीय आवाजात केलेली याची पेशकारी इतकी हृदयंगम आहे की त्यापुढे खरेच मला नाटकातील पद (माफ करा बागूल बुवा आणि खळेकाका मला) किंचित फिकेच वाटते.

काव्य किती अर्थपूर्ण असावे त्याचा उत्तम नमुना आहे. वेदना किती सहन कराव्या, माझ्या वेदनेची तीव्रता फक्त मी आणि ईश्वर जाणतो. मी ते स्पष्ट बोलूही शकत नाही आणि मला माहीत आहे की इतर कोणालाही त्याचे सोयरसुतक नाही. वरवरची मलमपट्टी आणि खोटी सहानुभूती देऊन माझ्या अंतरीचे दुःख दूर कसे होईल? पुढील ओळीत मला Rime of the Ancient Mariner मधील Water water everywhere and not a drop to drink चे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. राजकवी तांबे यांनी संपूर्ण कवितेत इतरांकडून न मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे निर्माण झालेल्या द्विधा मनस्थितीचेच वर्णन केले आहे. त्यामुळे निर्माण झालेले मनातले भावनांचे आणि विचारांचे काहूर स्पष्ट दिसते. दुःखात आणि वेदनेच्या एकाकी पडणे, कोणाकडून ही दिलासा न मिळणे, हे त्यांना जास्त क्लेशदायक होते आहे.

नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.

ह्या ओळी कवितेचा गाभाच आहेत. जे आपले सखेसोबती, नातेवाईक, आयुष्य संपवून पैलतीरावर पोचले आहेत, ते मला पलिकडे बोलावताहेत आणि सांसारिक पाश अजूनही ऐलतीरावर बांधून ठेवताहेत अशी एक विचित्र ओढाताण निर्माण झाली आहे.

लोकहो, मला खूप आवडलेली कविता आणि त्यावरची दोन अजरामर गीते… माझी पावसाळी सायंकाळ मस्त गेली! https://youtu.be/-SqNCHkj050

तुम्हांला आवडते का पहा…. काळजी घ्या आणि पावसाळ्याची मजा घ्या

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

20 replies on “कोंडमारा आणि कुचंबणा…”

भा रा तांबे … आणि त्यांच्या रचना गाणाऱ्या लतादीदी किंवा बकुळ पंडीत … त्यात त्याला संगीताचा साज बहाल करणारे श्रीनिवास खळे … हे सर्व मिश्रण म्हणजे अमृताहून कमी न लेखणे ! सगळंच कसं उत्तुंग आणि वर्णनातीत … त्याला भर पडली आहे अतिशय निवडक आणि पर्याप्त शब्द वापरून केलेल वर्णन ..
Rime of the ancient Mariner चं उदाहरण 👌🏼👌🏼👌🏼
मस्त वाटलं आणि भा रा तांब्यांच्या कविता शिकतानाचे शाळेतले दिवस पण आठवले ..

Many many thanks for this 👍🏻

Liked by 1 person

आवडले का? मन आनंदांने उचंबळुन आल👌👌👌👌
काय सुंदर लिहिलय सर भा रा तांबे मलाही अक्षरशः नतमस्तक करतात🙏🏾🙏🏾🙏🏾मरणोत्तर तरी त्यांना कुणीतरी भलमोठ ॲवार्ड अरेंज कराव अस वाटत🙏🏾🙏🏾
लताजी काय मन लावून गातात त्यांच काव्य.. खरतर इथेच सगळ बोलण संपत… सरस्वतीच त्यांना गाते अजुन काय पाहीजे !!
ह्या काव्यातील सगळ्या गोष्टी तुम्ही काय सुंदर अधोरेखीत केल्यात… व त्याच बरोबर हा अत्यानंद ही झाला की तुम्हाला ही ते माझ्या इतकेच आवडतात🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

Liked by 1 person

एक अविस्मरणीय आनंद दिलात..राजकवी भा.रा.तांबे मराठी कवितेतील मानदंड…गेयप्रधान आणि अत्यंत अर्थपूर्ण शब्दांनी नटलेली त्यांची कविता..पुढे अनेक कवींनी त्यांनी आखून दिलेल्या रस्त्यावर वाटचाल केली..ढळला रे ढळला दिन सखया.. संध्याछाया भिवविती ह्रदया..आता मधुचे नाव कासया?..लागले नेत्र रे पैलतीरी…असे सहज लिहीणारे कवीवर्य तांबे श्रेष्ठ?का त्यांच्या शब्दांना भावभोर करुन गळ्यातून साकार केलेल्या लताबाई श्रेष्ठ…या प्रश्नावर उत्तर न शोधता पुनः प्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल सरजी आपले मनापासून आभार…. हो आणि एकच काव्य दोन वेगळ्या स्तरावर किती वेगळा आनंद देते..याची प्रचिती दिल्याबद्दल धन्यवाद…शेवटी त्यांच्याच शब्दांत…मधु मागशी माझ्या सख्या, परी..मधुघटची रिकामे पडती घरी…..सर किती आभार व्यक्त करावे… शेवटी एकच हे ऋण न फेडायचे…या ऋणातच सदैव राहणे श्रैयस्कर…

Liked by 1 person

विवेकजी ऋण म्हणायचे तर या थोर लोकांचे आहे!

कवी, संगीतकार आणि गायक!

मला ज्याने आनंद मिळतो ते फक्त मी व्यक्त करतो. तुम्हांला आवडले आणि तुमच्या शब्दांत तुम्ही व्यक्त केलेत, तो तुमचा मोठेपणा. त्याबद्दल मीच तुमचा ऋणी राहीन. प्रेरणादायी ठरतील माझ्यासाठी.. मनापासून धन्यवाद

Liked by 1 person

कविवर्य भा.रा
.तांबे यांच्या या अजरामर कवितेचे रसग्रहण व ती गाणार्या दोन तितक्याच महान गायकांच्या, गानकोकिळा लता मंगेशकर व पं. विश्वनाथ बागुल, यांच्या वैशिष्ठ्वयांचे ुत्तम विश्लुशण.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s