Categories
Ghazals Introspective melodies Marathi Poetry

मनातली सल

ठाकरे कुटुंब तसे कलाकारांनी भरले आहे. त्यांचे कार्यक्षेत्र जरी राजकारण असले, तरी त्यांचे कलागुण खरेच वाखाणण्याजोगे आहेत. स्वतः बाळासाहेब उत्तम व्यंगचित्रकार होते. डेविड लो नावाच्या न्यूझीलंड मध्ये जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये राहिलेल्या व्यंगचित्रकाराने त्यांना खूप प्रभावित केले असे खुद्द त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये आले असताना सांगितले होते. ते फ्री प्रेस जर्नलमध्ये नोकरी करत असताना त्याच वर्तमानपत्रात त्याच विभागात त्यांचे सहकारी होते रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजे भारतातले प्रसिध्द व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण!   लक्ष्मण यांची व्यंगचित्रे नर्म विनोदी असत, अंगावरून मोरपिसांनी गुदगुल्या केल्यासारखे हसू येई. बाळासाहेब तेव्हापासूनच रोखठोक! अस्वलाच्या गुदगुल्या होण्याऐवजी त्याच्या नखाने काय होईल याचा प्रत्यय बाळासाहेबांच्या व्यंगचित्रातून येई. लक्ष्मण पुढे टाइम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरीला लागले आणि उरलेले आयुष्य तेथेच राहिले. बाळासाहेब मार्मिक मध्ये खूप वर्षे व्यंगचित्रे काढत असत, कित्येक मार्मिक मी तेव्हढ्यासाठी जपून ठेवले होते. बाळासाहेब न विसरता बाळ ठाकरे अशी सही कोपऱ्यात स्पष्टपणे करत. मी ती सही झोपेतून उठल्या उठल्या सुद्धा ओळखीन. बाळासाहेब वेगळ्याच पद्धतीने काढताना मी पाहिले आहे, पेन्सिलने आकृती वगैरे ते काढत नसत, कुंचला काळ्या शाई मध्ये बुडवून सरळ कागदावर काढू लागत. त्यांचे काढणे स्पष्ट आणि रेषा ठळक असत, पुसणे वगैरे त्यांना लागतच नसे. त्यांचा व्यंगचित्रे काढण्याचा वारसा राज ठाकरे यांनी घेतला आहे. उद्धवराव ठाकरे उत्तम छायाचित्रे काढतात. मी त्यांच्या छायाचित्रांची दोन पुस्तके विकत घेऊन ठेवली आहेत. पहिल्या पुस्तकात त्यांनी वापरलेला एक कॅमेरा मी त्याकाळी वापरत असलेले नीकॉनचे मॉडेल होते हे पाहून मी खूप खूष झाल्याचे आठवते. राजकारणात जास्त महत्वाची भूमिका पार पाडल्यामुळे त्यांचे छायाचित्रणाकडे थोडे दुर्लक्ष झाले याचे मला खूप मोठे दुःख अजूनही सलते. फारच चांगला फोटोग्राफर आहे हा माणूस! ६०-७० च्या दशकात श्रीकांत ठाकरे मार्मिकमध्ये चित्रपट परीक्षण उत्तम करत. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या बद्दल त्यांची परखड आणि विनोदाची उत्तम झालर असलेली त्यांची परीक्षणे वाचणे म्हणजे एक पर्वणीच असे. श्रीकांत ठाकरे यांची संगीताची जाण सुद्धा उत्तम होती. त्यांनी रफीसाहेबांना मराठीत गायला लावले (हा छंद जीवाला लावी पिसे) आणि मला सर्वात जास्त आवडलेली त्यांची रचना म्हणजे माझ्या लाडक्या शोभाताई गुर्टू यांच्याकडून गाऊन घेतलेली ही मराठी गझल! https://youtu.be/-pD1OQXzEyc

शोभाताई सुद्धा आमच्या कॉलेज मध्ये येऊन गेल्या आहेत. फारच मधाळ , भारदस्त पण खऱ्या अर्थाने पहाडी आवाज, त्यांच्या खर्जात विनवणी होती आणि वरच्या पट्टीत गेल्या की काळजावर सुरीच चाले. आवाजातला दर्द वसंतराव देशपांडे आणि शोभाताई गुर्टू यांच्या इतका मला कोणाच्याही गाण्यात आढळला नाही!

ही गझल उमाकांत काणेकर यांची, किती सुंदर अंतरीचे दुःख मांडले आहे त्यांनी. ठाकऱ्यांनी सारंगीचा इतका सुरेख वापर केला आहे की जीवाला भेदून जातात सूर.

उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या 

फुलावी तुझ्या स्मृतीच्या कालिका मनातल्या 

येऊ कशी निघोनि पाऊल अडखळे 

विरहात वेचितांना घटना सुखातल्या 

उठता तरंग देही हळुवार भावनांचे 

स्मरतात त्या अजुनी भेटी वनातल्या 

हासोनिया खुणावी ती रात रंगलेली 

तू मोजिल्यास होत्या तारा नभातल्या 

भैरवी वर बेतलेली ही गझल, आज पहिल्यांदा ऐकून जवळजवळ पन्नास वर्षे लोटली. पण परिणाम आजही तेव्हढाच असरदार! शोभाताई तंबोरा घेऊन स्वतः समोर गाताहेत आणि मी त्यांच्या गाण्यात वाहून चाललोय असेच प्रत्येक वेळी वाटते.

उत्तम कालातीत गाणे म्हणजे उत्तम काव्य, सुंदर, सुश्राव्य, सुनियोजित संगीतरचना आणि अप्रतिम गायक /गायन यांचा त्रिवेणी संगम. तिन्ही अंगे नीट सांभाळली गेली की इतकी दैवी चिरंतन रचना आपल्या हाती पडते. धन्य ते उमाकांत काणेकर, धन्य त्या शोभाताई गुर्टू आणि धन्य ते श्रीकांतजी ठाकरे!! या तिघांनीही आज काय मैफिल सजवली असेल इंद्रलोकी!!

अशी गाणी एकदा ऐकून उगाचच मनी हुरहूर राहाते. मला कमीतकमी दोनदा ऐकायला आवडते. शोभाताई माझ्या वन्स मोर ला प्रतिसाद देतात असे वाटते.

ऐका आणि माझ्या मनातली हुरहूर तुमच्या मनात ही उतरू दे!

शुभरात्री

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

14 replies on “मनातली सल”

धन्यवाद सर , इतक्यांदा शोभा गुर्टूची ही गझल ऐकली होती पण आज नव्या आयामात ऐकताना भावविभोर झाले .
उठता तरंग देही हळुवार भावनाचे …..
यातील ” देही ” वेग वेगळ्या आलापात आळवलय की आहाहा ….. अप्रतिम .

Liked by 1 person

वाह…. काय दर्द आहे
आपले लिखाण खरंच कितीतरी माहिती देऊन जाते

Liked by 1 person

ठाकरे कुटुंबियांची कला क्षेत्रातील माहिती व शोभाताईची गझल. सुंदर लेख व गझल.

Liked by 1 person

ठाकरे कुटुंबियांबद्दल बरीच रोचक माहिती मिळाली. गाणे फारच सुंदर….. मनाला स्पर्शून जाणारे….अप्रतिम शब्द….
शोभाताई नी किती आर्त पणे आणि उत्तम गायले आहे….त्यांच्या आवाजाचा पोत किती वेगळा आहे.
खूप छान लेख….

Liked by 1 person

कलाकार कुटुंब राजकारणात उतरल्याने कलाक्षेत्राची न भरून येणारी हानी झालेली दिसते.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s