Categories
Bhaktisangeet Spiritual music

देवशयनी एकादशी निमित्त….

आज देवशयनी एकादशी, महाराष्ट्रात सर्वात महत्वाचा दिवस. भक्तीचा सर्वात मोठा सोहळा गेले ८०० वर्षे अव्याहत (कोरोना ची दोन वर्षे सोडून) चालू आहे, राज्यातील सर्व भागातून लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, समाजाच्या सर्व स्तरातील स्त्री-पुरुष आपसातील सर्व भेद विसरून, फक्त विठोबाच्या भक्तीत लीन होऊन सर्व कामे बाजूला ठेवून पंढरीच्या वाटेवर विठूनामाचा गजर करत जात असतात. आजच्या दिवशी या आनंदसोहळ्याचा परमोच्च क्षण चंद्रभागेच्या तीरी विठोबाच्या दर्शनाने गाठला जातो. ह्या सोहळ्याला तोड नाही.

मला आठवते आहे तेव्हापासूनच आम्ही सर्वच आषाढी एकादशीला उपवास करतो. १९६८-६९ साली पुण्यात असताना त्यावेळी दोन तरुण असलेले गायक खूप लोकप्रिय झाले होते. त्यावेळी हिंदुस्तानी अभिजात संगीत ऐकणाऱ्या संगीतप्रेमी मंडळींना दोघेही समान वाटत. त्यातील एकाने हेतुपुरस्सर शास्त्रीय संगीताची कास सोडली व स्वतः चे आयुष्य मराठी संगीत नाटक (जे त्यावेळी बऱ्यापैकी डबघाईला आले होते) या संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दिले. शास्त्रीय संगीत पूर्णपणे सोडले नाही, पण इतर गायनप्रकारांना प्राधान्य देऊन त्यांत मराठी रसिकांच्या मनात स्वतः चे खूप मोठे स्थान निर्माण केले. हे सद्गृहस्थ म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी. अभिषेकी बुवा यांनी भगीरथ प्रयत्न करून मराठी संगीत नाटक जगवले. त्यांचा एक अभंग मला खूप आवडतो: संत चोखामेळा यांची रचना आहे, (वारकरी संप्रदाय किती जातिरहित होता ते सर्व संतांचे मूळ त्यांच्या थोरपणाच्या आड कधीच आले नाही यावरूनच कळते) किती सुंदर भाव व्यक्त केले आहेत ते पहा:

अबीर गुलाल उधळीत रंग, 

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ || 

उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन ,

रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, 

पायरीसी होवू दंग गावूनी अभंग  || १ || 

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, 

चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ,

विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग  || २ || 

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ,

पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती,

चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग

अबीर गुलाल उधळीत रंग, 

नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग।। https://youtu.be/eaI8zvNSYas

अभिषेकी बुवांनी जी वाट दाखवून दिली त्यावर खूप लोकांनी नंतर प्रवास केला. त्यांच्या प्रयत्नांनी इतरांना मार्गक्रमण करणे सोपे झाले हे निश्चितच! सध्याच्या पिढीच्या या प्रकारच्या गायक- गायिकांमधल्या मला सर्वात आवडणारी एक गायिका म्हणजे मंजुषा पाटील कुलकर्णी . या गायिकेचे गायनाची ताकदीची तिच्या शरीरयष्टीकडे पाहून कल्पनाच येत नाही. इतका जोश, आवाजाची भरारी थक्क करणारी आहे. https://youtu.be/BA2WHkSrpf0

आजच परत एकदा कानावर पडलेला हाच अभंग माझ्या आवडत्या तरुण गायिकांमधल्या एका मुलीने गायला आहे. अतिशय साधारण परिस्थितीत जन्मलेल्या या भावंडांनी कठोर परिश्रम घेऊन खूप नांव कमावले आहे. अमराठी असून मैथिली ठाकूर, अप्रतिम गाते आणि नवेनवे प्रकार गायची तिची तयारी कायम असते. तिचे दोन भाऊ – अयाची रिषव तिला साथ करतात. https://youtu.be/1Dc9LS4jGbI

लोकहो, या प्रेमाच्या आणि भक्तीच्या सोहोळयात आपण सर्वच न्हाऊन घेऊया! विठोबारायाची कृपा सर्वांवर असू दे!

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

22 replies on “देवशयनी एकादशी निमित्त….”

वारी आणि पालखी सोहळा म्हणजे खरोखर महाराष्ट्रचा अभिमान आहे. अभंग हा गायन प्रकार देखील आपल्या संतांची व संगीतकार यांची कमाल वाटेल असा आहे. रंगुन जावे त्यात.

Liked by 1 person

अभिजात गायकी ही बुवांची खासियत होती.मराठी संगीता मध्ये जेवढे प्रयोग बुवांनी केले तो एक चमत्कारच .. कट्यार मत्स्यगंधा असे अनेक प्रयोग बुवांनी केले.तेवढी कुणाची ताकद नव्हती .एक बाकीबाबांचे काव्य आठवते.. नाही पुण्याची मोजणी ,नाही पापाची टोचणी ,हे जे बुवांनी गायले त्याला तोड नाही ..हे अद्भुत होतं
तसेच इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. ही भैरवी बुवांनीच गावी. त्याचबरोबर चारुकेशीमधील हे सुरांनो चंद्र व्हा हे केवळ बुवाच गाऊ शकले.. हे येरागबाळ्बायाचे काम नोहे.बाकी सगळ्यांनी त्यांची कॉपी केली. अनवट राग गाणे ही बुवांची खासियत होती. त्यांची शिष्य परंपरा थोर आहे. मंजुषा पाटील आमच्या इचलकरंजीच्या . त्यामुळे त्यांच्याबद्दल विशेष प्रेम.. खडा आवाज स्वच्छ शब्दोचार आणि तेही सुरात.. सरजी निखळ प्रणिपात…या पुनः प्रत्ययाच्या आनंदाप्रित्यर्थ…

Liked by 1 person

मला मंजुषा कुलकर्णी खूप आवडतात, खडा आवाज, प्रचंड तयारी आणि दुर्दम्य आत्मविश्वास

Like

सर , आज बुवांना ऐकले…आणि नंतर मंजुषा पाटील कुलकर्णींना …..
अन् एकादशी पावली आपल्याला …. असे झालं !
मंजुषा चे गायन ….आलाप अन् त्याला जोड मधुर बासारीची… सुमधुर ! केवळ अप्रतिम !!

Liked by 1 person

छान ब्लॉग लिहिला आहे. महेश काळे यांनी काही वर्षांपूर्वी हाच अभंग गायला होता. अप्रतिम लय सूर ताल. पायरसी होऊ दंग गाउनी अभंग …!

Like

अप्रतिम आनंद …It is truly a bliss to listen..
beyond the words ..

Thank you so much for the insights of this song 🙏🏻

Liked by 1 person

अतिशय सुंदर अशी ही वारी नयनरम्य आणि शिस्तबद्ध. आणि या अभंगांशिवाय तर एकादशी अपूर्णच. आणि मैथिली ठाकूर तर अभंगच नाहीतर मधुबनी पेन्टिंग मध्ये पण नंबर वन.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s