Categories
Ga.Di.Madgulkar Marathi Film Songs Sudhir Phadke

पहाडी इतकी गोड कधीच वाटली नव्हती

काही दिवसांपूर्वी डॉ कौस्तुभ वैद्य -मुंबईतला एक प्रथितयश हृदयरोग तज्ज्ञ – यांनी एक लिंक मला पाठविली. महाराष्ट्रात जिने आपल्या गोड, अतुलनीय गळ्याने राज्य केले, त्या थोर गायिकेच्या मृत्यूनंतर झालेल्या जाहीर शोकसभेची चित्रफीत होती. माणिक वर्मा यांनी मराठी भावगीताच्या दुनियेत जो ठसा उमटवला आहे तो केवळ अतुलनीय आहे. मराठी सिने-नाट्य संगीताबरोबरच भावगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर सर्वच गायक- गायिकांनी राज्य केले.

हे गाणेच घ्या: खरेतर “उमज पडेल तर” या चित्रपटातले हे गाणे आहे. पण बाज एकदम भावगीताचाच आहे. ग.दि.माडगूळकर यांच्या सारख्या दिग्गज कवीच्या लेखणीतून कधी बाजारू, टाकाऊ कविता कागदावर उतरलीच नाही. त्यांची बरीचशी गीते बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केली. मला नेहमीच वाटते की त्या काळात इतकी सुंदर, अविस्मरणीय गीते कशी तयार झाली असतील? विचार केल्यावर लक्षात आले की एक अर्थपूर्ण कविता, त्यावर बांधलेली सुडौल व सुश्राव्य चाल आणि जोडीस सुरेख गायन असे मिश्रण जुळून आले की गाणे हमखास उत्तम होणारच. त्यामुळे त्या काळातली कित्येक गाणी ते चित्रपट (किंवा नाटकं) पाहिले नसले (पाहिली नसली) तरीही सहज सुरुवातीचे काही सूर कानावर पडले की लगेच आठवतात. https://youtu.be/LL1bZn7YOcw

हे एका चित्रपटातील गाणे वाटतच नाही, इतके सुंदर आणि शालीन पद्धतीने सादर केले आहे. पडद्यावर दिसतीये ती नटी म्हणजे हिंदी चित्रपटात मेहमूद या विनोदी नटाबरोबर प्रसिद्ध विनोदी जोडगोळीतली नटी शुभा खोटे! सीमा नावाच्या चित्रपटात बलराज साहनीनूतन यांच्याबरोबर चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलेली ही राष्ट्रीय सायकलिंग व जलतरण विजेती! हिंदी चित्रपटसृष्टीने तिच्यावर एकंदरीत अन्यायच केला म्हणायचे, कारण उत्तम अभिनेत्री असूनही एकाच साच्यातल्या भूमिका त्यांच्या वाटेला आल्या.

गम्मत म्हणजे उमज पडेल तर या चित्रपटात त्यांच्यावर चित्रीकरण केलेले हे प्रसिद्ध गीत असूनही त्या चित्रपटातल्या सुरुवातीला दाखवलेल्या नावांत त्यांचे नाव दाखवलेच नाही. दिनकर द पाटील यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट. ना. ह. आपटे यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित असा हा चित्रपट होता. त्यात रमेश देव, चित्रा, शरद तळवलकर, दुर्गा खोटे, आत्माराम भेंडे, साळवी वगैरे लोकांच्या भूमिका होत्या. चित्रा म्हणजे कुसुम सुखटणकर या मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चित्रा-रेखा या दोन बहिणींपैकी एक, त्यांच्या भगिनी कुमुद सुखटणकर (आपण त्यांना रेखा नावाने ओळखतो), या बहिणींचे चित्रा-रेखा असे नामकरण महाराष्ट्रवाल्मिकी म्हणजे ग दि माडगूळकर यांनी केले. त्या चित्रपटात एव्हढ्या गाजल्या की माझ्या वडिलांचे खास मित्र कर्वेकाकांना जुळ्या मुली झाल्यावर त्यांचीही नावे त्यांनी चित्रा-रेखा अशीच ठेवली. त्यांच्याबद्दल नन्तर कधी तरी.

हे अप्रतिम गाणे गायले आहे माणिकताई वर्मा यांनी. पहाडी रागातील हे गाणे आहे. माणिकताई यांची शास्त्रीय संगीताची तयारी किती पक्की आहे ते दुसऱ्या अंतऱ्यात कळते- सांजवेळी या एका शब्दांवर त्यांनी काय जादू केली आहे ती पहा.

घननीळा, लडिवाळा
झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी होइल अर्थ निराळा !

सांजवेळ ही, आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा !

माझ्या सर्वात मोठ्या मावशीच्या आवडत्या गायिकेचे हे अतिशय आवडते गाणे- कौटुंबिक रगाड्यातून वेळ मिळाला की कधीतरी कळत नकळत ती स्वतःशीच हे गाणे गुणगुणायची.

आज सकाळी आईने तिची आठवण काढली आणि हे गाणे मला आठवले. माझ्या मनात खूप आठवणी ताज्या झाल्या- त्यातील काही इथे उतरल्या.

आज पावसाळी हवा आहे, या गाण्याला साजेसे असे मेघाच्छादित आकाश आहे , अशात वाफाळता चहा आणि हे गाणे! सुख म्हणजे आणखी काय हवे? शुभसंध्या …

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

20 replies on “पहाडी इतकी गोड कधीच वाटली नव्हती”

फारच सुंदर माहीती व तितकंच चांगल गाण, उमज पडेल तर हा चित्रपट ही आज मराठी माणूस विसरलाय हेच जणू सांगणार हे चित्रपटाच नांव तर नाही? अस वाटून गेल👌👌🙏🏾
माणिकताईंच अजरामर गाण👌👌खूप लाडक सगळ्यांचच
त्याला आपण आज जणू जिवंतच केलत🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

Liked by 1 person

माणिकताई म्हणजे नावाप्रमाणेच मराठी भावगीतातील माणिकच…अत्यंत भावपूर्ण आणि गोड आवाज..कितीतरी गाणी आठवतात.आमच बालपण तर अशा गाण्यांच्या सहवासात गेले..सुरेल सभेमुळेत त्यांचे दोन प्रोग्राम ऐकण्याचे सौभाग्य लाभले.एकदा सवाईत सुध्दा ऐकलंय..आज रात बन गयी…असं म्हणू नये ,पण त्यांचा काळ अक्षरक्ष:मंतरलेलाच होता..🙏🏻🙏🏻🙏🏻 माणिक त्यांच्यावरती पुलंंनी लिहिलं होतं हे तर शरदाचं चांदणं ….त्या काळच्या नुसत्या आठवणीने त्यांच्या सुरांनी भरलेल्या असंख्य गीतांच्या ओळी कानाशी घुमू लागतात..
.. माडगूळकर यांचेच एक गीत ..सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ,छोट्या छोट्या तानांच्या लडीने ते गाणं नटलेल आहे ..त्यांचे सूर निर्मळ होते….सरजी तुम्ही तर आमची ह्रदये तपासता तपासता, ह्रदयाला हातच घालता….🙏🏻🙏🏻

Liked by 1 person

ळ या कमी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा खूप सुंदर वापर काव्यात केला आहे. माणिक ताईंचा अप्रतिम मधाळ आवाज….त्यांची सगळीच गाणी खूप सुंदर….

Liked by 1 person

माणिक वर्मांचे हे सुश्राव्य गाणे सध्या विस्मृतीत गेल्यासारखे झाले होते. आपण त्या स्मृती जाग्या केल्यात. थन्यवाद!

Liked by 1 person

सुंदर गाणे. हे शुभा खोटे यांच्या वर चित्रीत झालेले आहे हे खरच लक्षात नव्हतं. नेहमी प्रमाणे लिखाण ही छान.👍🏻

Liked by 1 person

एक अत्यंत गोड गाणं, आवडतंही, खूप छान वाटले.ईतकं ऐकलेलं पण सिनेमातील आहे हेच माहीती नव्हते. मग शुभाताई खोटे यांच्या वर चित्रीत असे पहायला मिळणे हा फारच आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला. ओघवती भाषा आणि छान माहिती, आणि ऊत्तम गाणं. वा वा झक्कास.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s