कालची संध्याकाळ वाईटच गेली. माझे आवडते गायक ज्यांनी आपल्या आवाजाचे वेगळेपण बदलायचा प्रयत्न कधीच केला नाही भुपिंदर सिंह वारल्याची बातमी कानावर पडली आणि मन विषण्ण झाले. गेले ६० वर्षे त्यांचा आवाज हिंदी चित्रपट गाण्यात आणि गझलातून ऐकतोय. त्याशिवाय ते गिटार अतिशय उत्तम वाजवायचे. दिल्लीत असताना AIR दिल्ली च्या स्टुडिओमधील मदनमोहन यांच्याशी भेट झाली आणि मदनमोहन यांनी संगीत दिलेल्या हकीकत मध्ये त्यांचे पदार्पण झाले, ते गाणारा नट म्हणून. राजेश खन्नाचा पदार्पणाचा चित्रपट म्हणजे आखरी खत: त्यातही एक गाणे भुपिंदर सिंह यांनी नाईटक्लब मध्ये गिटार वाजवत म्हटले आहे. पण त्यांचा चेहरा लोकांना आवडला नसावा, त्यामुळे नट म्हणून खूप कामे मिळेनात, तेव्हा स्वतःचे गिटार वादनाचे कसब त्यांच्या उपयोगी पडले- सर्व संगीतकरांबरोबर जवळपास काही हजार गाण्यात त्यांनी गिटार वाजवली आहे, जसे मनोहारी सिंहसाठी सॅक्सोफोन होते तसेच भुपिंदर सिंह यांचे गिटार! आज दवाखान्यात खूप गर्दी होती, त्यात आमची एक टेकनीशियन ची दांडी! मजा आली! घरी येऊन चहा पिऊन, व्यायाम करून आंघोळ करून जेवलो आणि मला हे गाणे आठवले. https://youtu.be/47W1fhqJa2U
सुमनताई कल्याणपूर यांचा गोड आवाज आणि वेळेला साजेसा असा अभोगी राग! तसे पहायला गेले तर अभोगी मूळ कर्नाटक संगीतातील राग. हा राग औडव-औडव म्हणजे आरोह-अवरोहात फक्त पाच स्वर.पंचम, निषाद दोन्ही दोन्हीवेळा वर्ज्यच! अवरोहात चलन ही थोडे वक्र. रात्रीच्या पहिल्या प्रहरात (९-१२ वाजता) हा राग गायला-वाजविला जातो. राग तसा शांत पण प्रसन्नता निर्माण करणारा, आशादायी आहे.
या अत्यंत सुश्राव्य गाण्याचे कवी आहेत रमेश अणावकर, आणि संगीतकार आहेत दशरथ पुजारी, स्वरसाज अर्थातच सुमनताई कल्याणपूर यांचा. आपण मराठी भाषिक किती नशीबवान आहोत की इतकी अप्रतिम चिरंतन संगीतनिर्मिती आपल्या भाषेत भावगीतांच्या रूपाने झाली. फार कमी भाषांत असे माध्यम आहे. चित्रपट गीते, नाट्यगीते आणि भावगीताचे तीन वेगवेगळे संगीतप्रकार आणि तीनही एकापेक्षा एक सरस असे फक्त मराठी भाषेत असावेत!
मृदुल करांनी छेडित तारा
स्मरते रूप हरीचे मीरा
कमलदलापरि मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरि
हर्षभराने तनुलतिकेवरि
पडती अमृतधारा
कालिंदीच्या नीलजलापरि
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तिरी
खुलवी प्रीत-फुलोरा
सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभुचरणाची
मिटल्या नयनी धुंद मनाची
रंगवि हसरी मथुरा
सुमनताईंचा मधाळ आवाज आणि अभोगी राग म्हणजे नक्की शांत झोप लागणार.
तेव्हढ्यात मला भारतरत्न स्वरभास्कर भीमसेन जोशी यांच्या आवाजातला अभोगी रागातलाच एक अभंग आठवला: https://youtu.be/Wz_dKNu09n0
संत नामदेव यांची रचना आणि श्रीनिवास खळे काका यांची संगीतरचना! गाताहेत साक्षात भीमसेनजी! अभंग गाताना ते इतके तल्लीन व्हायचे की श्रोतेही मंत्रमुग्ध झालेच पाहिजेत. सगळे वातावरण एकदम भक्तिभावाने भरून जायलाच हवे!
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥
हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
भीमसेनजींचं गाणं कसेही ऐकले, पाहिले तरी तितकेच उत्कट वाटते. अगदी संगीतद्वेष्टे सुद्धा डोलणार आणि त्याची जाणीव झाली की चपापून इकडे तिकडे बघणार!
अभोगी म्हटले आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची आठवण होणार नाही, हे शक्यच नाही! पन्नालाल घोष यांनी बासरीसाठी जेव्हढी अत्युच्च तपश्चर्या केली तेव्हढीच, किंबहुना दोन पायऱ्या वर चढून हरिप्रसाद चौरसिया यांच्या कामाचे महत्व आहे. त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये तीन वेळा येऊन कण तृप्त केले आहेत. त्यांच्या हाती वेणु घेतली की साक्षात श्रीहरी वाजवतो आहे असाच भास व्हावा.
ऐकाच https://youtu.be/4G_cmUgURZo
मी स्वतःला खरेच भाग्यवान समजतो की इतके थोर कलाकार असताना मला समज आली आणि यांच्या स्वरांच्या अमृतवर्षावात मला पुनः पुनः न्हाऊन घेता आले.
अभोगीचा भोग गेले सहा दशके घेतो आहे, पण कान आणि मन विटले नाही!
लोकहो भुपिंदर सिंह गेल्याची सल यापेक्षा कशी घालवावी? माझे मन हलके झाले, तसेच तुमचेही होईल अशी आशा करतो. मला नक्की गाढ झोप लागेल आज.
शुभरात्री.
12 replies on “अचानक शांत संध्याकाळी…”
वाह काय एका पेक्षा एक सरस गाण्यांचा उल्लेख केलाय तुम्ही
सुमन ताईंच्या सगळ्या गाण्याची पारायण करत असे मी
केतकीच्या बनी तिथे हे ….. हे माझं आणखी एक आवडतं गाणं
LikeLiked by 1 person
सुमनताई या खूप गुणी गायिका! त्यांच्यावर खूप अन्यायच झाला. पण ते हलाहल पिऊन पचवून ही साध्वी नेहमी आनंदात आणि समाधानी! मी त्यांच्याकडून हा गुण घेतला, अगदी एकलव्यासारखा
LikeLike
सर जी घेशील किती करांनी?अशी अवस्था झाली… झपूर्झा गडे झपूर्झा.,🙏🙏
LikeLiked by 1 person
धन्यवाद विवेकजी
LikeLike
Dhanyawad ha shabd kami padava aaj, Sir.. Manik varma, Suman tai yanchya ganyanche kharach “sanskar” aamchya pidhivar zale.. Tumhi tya aathvanina ujala deta.. Khoop khoop dhanyawad..
LikeLiked by 1 person
धन्यवाद तृप्तीजी
LikeLike
Stress releaver for me
हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
मागणे श्रीहरी नाही दुजे ॥
Tathastu
Thank you
Good night
LikeLiked by 1 person
Thanks Kunal
LikeLike
नितांत सुंदर, कान तृप्त झाले आणि मन शांतावल….🙏🏻
LikeLiked by 1 person
Great . Good night and sweet dreams
LikeLike
खूप सुंदर…. सुमन कल्याणपूर यांचा अप्रतिम गोड आवाज त्या अत्यंत भाव विभोर शब्दांना जिवंत करून गेला…
पंडित भीमसेन जींचा अभंग तर खूपच सुरेख….परमेश्वराशी एकरूप..
बासरी वरचा पंडित हरिप्रसादजींचा राग अभोगी जीवाचे भोग विसरायला लावणारा….
आज राग अभोगी रात्री ऐकायला न जमल्यामुळे सकाळी ऐकला…
मन शांत शांत झाले….आता दिवसही मनविश्रांत….
LikeLiked by 1 person
Thanks
LikeLike