Categories
Marathi Bhavgeet Pure joy Sudhir Phadke

तोच चंद्र, तेच आकाश

१९७० च्या दशकात मी जी एस मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आमच्याकडे कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळ खूप कार्यक्षम होते. आम्ही कॉलेजमध्ये गेलो तेव्हा सुरुवातीला शिशिर मोडक (सध्या पुण्यातील एक प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ आहे) आणि अविनाश सुपे (जो पुढे आमच्याच कॉलेजमध्ये अधिव्याख्याता डीन झाला) हे चालवत. आमच्या वर्गातील आनंद नाडकर्णी याने ते पुढे आपल्याकडे घेतले. या सोनेरी काळात कॉलेजच्या अभ्यासाव्यतिरिक्त साहित्यिक/सांस्कृतिक क्षेत्रातल्या डोहात आम्ही खूप डुंबून घेतले. खूप लोक आमच्याकडे गप्पा मारायला येत. सी रामचंद्र, मास्टर भगवान, तसेच अगदी बाबूजी सुद्धा हजेरी लावून गेले आणि आम्हाला समृद्ध करून गेले.

अशाच एका शनिवारी दुपारी दस्तुरखुद्द सुधीर फडके आमच्या कॉलेजमध्ये एम एल टी मध्ये येऊन गप्पा मारून आणि गाऊन गेले, त्यांच्या त्या काही तासांच्या अल्पशा सहवासातले हे पहिले गाणे. कालच्या राखी पौर्णिमेला चंद्र ढगाआड लपला होता त्यामुळे दर्शन/छायाचित्रण होऊ शकले नाही.

मानवी मनाची एक विलक्षण ताकद आहे, खासीयतच म्हणायची: कोणत्या आठवणी कधी जाग्या होतील सांगवत नाही. कालच्या पौर्णिमेला नारळी भाताचा सुवास घरभर पसरला आणि मला हे गाणे आणि भूतकाळातली ती मंतरलेली दुपार आठवली: बाहेर पाऊस मी म्हणत होता, आत बाबूजींच्या सुरांची वृष्टी! बाबूजी वगळता मराठी भावगीताच्या दुनियेत श, ष व श् (विश्व मधील श) यांचा वेगवेगळा उच्चार करणारा एकही माणूस मला माहित नाही! त्यांचा ऐकताना जीभ टाळ्याला टेकून मुडपली जायची आणि मनातील फळ्यावर नेमके मुळाक्षर रेखाटले जायचे!https://youtu.be/G7eMJj9Cjns

तोच चंद्रमा नभात

तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी

सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी……..      ——— शांता शेळके

शांताबाई यांनी एका संस्कृत श्लोकावर आधारित हे गाणे लिहिले आहे हे सगळ्यांना माहीत नसेल; मूळ श्लोक शीला भट्टरिका यांचा आहे तो असा आहे.        

यः कौमारहरः स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपा-
स्ते चोन्मीलितमालतीसुरभयः प्रौढाः कदम्बानिलाः ।
सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ

रेवारोधसि वेतसीतरुतले चेतः समुत्कण्ठते ।। इति।।

अतिशय सुंदर अर्थपूर्ण श्लोक आहे, शीला भट्टरिका संस्कृत भाषेतील साधारण आठव्या-नवव्या शतकात होऊन गेलेल्या खूप मोठ्या कवयित्री आहेत. आजही त्यांच्या कविता आणि श्लोकांवर खूप मंथन होत असते. त्यांच्या एका कवितेत नर्मदा नदी ( या श्लोकात उल्लेख केलेली रेवा नदी) आणि विंध्य पर्वताचा उल्लेख आहे. त्यामुळे तरुणपणी ती बहुधा विंध्य पर्वत आणि नर्मदेच्या जवळ राहात असावी. काही अभ्यासक आणि तज्ज्ञांच्या मते ती राष्ट्रकूट सम्राट ध्रुव यांची महाराणी शीला महादेवी ही असावी. सम्राट ध्रुव हे इ.स. ८व्या शतकात राज्य करत होते. तज्ज्ञांच्या मते शीला भट्टरिका, या नावातील भट्टरिका ही उच्च सामाजिक स्थान दर्शविणारी उपाधी आहे. शीला महादेवी या महाराज्ञीला साहित्य आणि साहित्यिक यांच्याबद्दल खूप प्रेम होते आणि कित्येक विद्वानांना तिने उदार मनाने धनद्रव्य दिल्याचे उल्लेख आढळतात. राजशेखर हे १०व्या शतकातले मोठे कवी! त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे शीला भट्टरिका या पांचाली शैलीत साहित्यनिर्मिती करत असत. त्या काळात याव्यतिरिक्त तीन मुख्य साहित्यिक शैली होत्या: वैदर्भी, गौडी आणि लती (इथे लता हा उल्लेख एका प्रांताबद्दल आहे, आणि त्याचे स्थान आजच्या दक्षिण गुजरात इथे येते). पांचाली शैलीत “अर्थ आणि शब्द यामध्ये समतोल आणि समन्वय ठेवला जातो” असा उल्लेख १५ व्या शतकात वल्लभदेव यांनी संकलित केलेल्या सुभाषितावली मध्ये आहे. शीला भट्टरिका यांचा उल्लेख खूप संस्कृत टीकाकारांनी केला आहे, तसेच त्यांनी लिहिलेल्या कविता/श्लोकांचा उल्लेख ही इतरत्र आढळतो. त्यांच्या कवितांमधून बऱ्याच विषयांवर त्यांनी लिहिलेले कळते: प्रेम, नैतिकता, राजनीति, निसर्ग, सौंदर्य, ऋतु, कीड़े, क्रोध, आक्रोश, आचार संहिता, आणि विभिन्न प्रकारच्या नायिकांची स्वभाव वैशिष्ट्ये. त्यांच्या बऱ्याच रचना कालौघात लुप्त झाल्या आहेत, फक्त सहा छोट्या कविता पूर्णपणे उरल्या आहेत.

बाबूजी यांचा अत्यंत गोड, रसाळ आवाज, सुस्पष्ट उच्चार आणि इतके सुंदर काव्य तेही यमन या सर्वांगसुंदर रागात बांधलेले: https://youtu.be/iL2m9aKWwss

बाबूजींनी गीतरामायण गाताना म्हटलेच होते: “गंधर्वच ते तपोवनीचे” . या वाक्याची सर्वार्थाने प्रचिती बाबूजींचे अमर गाणे ऐकताना येते. माझ्या आईचे माहेर कोल्हापूरचे- बाबूजी तिच्या पिढीच्या लोकांना व्यक्ती म्हणून खूप चांगलेच माहीत होते. कोल्हापूरचे सर्व लोक त्यांचे निस्सीम चाहते: ते त्यांचा उल्लेख त्यांच्या मूळ नावानेच करत!

राम किंवा श्रीराम फडके असाच उल्लेख होई. आयुष्यभर संगीतासाठी अक्षरशः तपश्चर्या केलेला हा माणूस गंधर्वच!!

त्यातून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी/भक्त- म्हणजे आम्हां सर्वांचे आपोआपच लाडके होऊन अगदी गळ्यातील ताईत बनून गेले.

अशा या ध्येयवेड्या ऋषीचे हे अप्रतिम गाणे मला सुचले हे माझेच भाग्य नाही का?

असो, लोकहो ऐका माझे आणखी एक आवडते गाणे, शुभरात्री!

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

28 replies on “तोच चंद्र, तेच आकाश”

तोच चंद्रमा नभात तीच चैत्र… … त्या काळी सकाळ …दुपार… संध्याकाळ हेच गाणे ऐकू यायचे. जूने ते सोने.‌‌🌹🙏

Liked by 1 person

[12/08, 11:34 pm] Dr. Sangeeta K. Godbole: वा खूप सुरेख लेख. चंद्राच्या प्रतिपदेला अतिशय सुरेख दिसणारी आणि हुरहुर लावून जाणारी कोर ते पौर्णिमेचे पूर्णत्व … चन्द्र प्रत्येक रूपात भुरळ घालतो. हे केवळ अप्रतिम गाणे ऐकून रात्र स्वरमई केलीत.
तुम्हालाही स्वररात्री!
[12/08, 11:35 pm]
Dr. Sangeeta K. Godbole:

Liked by 1 person

अप्रतिम काव्य आणि त्याला सोबत बाबूजींच्या हळुवार आणि गोड आवाजाची….मनावर घातलेली शब्द आणि स्वर स्नेहाची हळूवार फुंकर…..आणि खूप सुंदर नवीन माहिती..👌👌

Liked by 1 person

डॉक्टरसाहेब आपले अत्यंत सुरेख व प्रत्यक्ष अनुभव संपन्न वर्णन मनास भावले.. आपले बहुआयामी व्यक्तीमत्व यातून प्रकट होते.आम्हांस बाबूजी ऐकण्याचे भाग्य लाभले नाही . मात्र हुबेहूब आवाज व लकब असणारे त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके मात्र आम्ही पुणे फेस्टिव्हल मध्ये ऐकले. (गीत रामायण) पुरातन अशा मराठी संगीतापासून ते हॉलिवुड संगीतापर्यंतची आपणास असलेली आपली कलासक्ती व त्याबद्दलची सखोल जाण खरोखर वाखाणण्याजोगी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आपणासारखे ‘हरहुन्नरी व्यक्तीमत्व’ शोधूनही सापडणार नाही. आपणांस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!

Liked by 1 person

I have met Sudhir Fadke ji in Mumbai when he was raising money for a picture on Sawarkar. I don’t remember if the movie is completed or not? The story of origin of the song is new to me. Thanks for that.

Liked by 1 person

सर तुमच्या GS मधील अविस्मरणीय आठवणी , शांताबाईंचे बाबुजीनी गायलेले गाणे व त्याची व्युत्पत्ती….सर्व च कमाल 👌🏻👌🏻

Liked by 1 person

खूप छान. संस्कृत श्लोक अत्यंत अस्खलित उद्धरण करणे केवळ तुम्हास शक्य आहे.
अभिनंदन.

Liked by 1 person

खरंच हे सगळे अप्रतिम तर आहेच पण हे तुम्ही जे काहीलिहून मांडतायना ते एका लेखकापेक्षा पण भारी आहे. खूप छान सुंदर सकाळ.

Liked by 1 person

गोड गाण्याला श्री. सुधीर फडक्यांनी लावलेल्या दोन्ही चाली आणी त्यांची गायकी अप्रतिम आहेच. त्याच बरोबर त्या कवितेचा संस्कृत सुभाषिताशी असलेला संबंध जाणून घेणे पण रोचक आहे.

Liked by 1 person

शांताबाईंच्या शब्दांनी आणि बाबूजींच्या आवाजाने अजरामर केलेलं हे गीत कोणालाही भुरळ पाडेल असंच आहे
तुमच्याकडून कोणत्याही गीता विषयी वाचताना इतर इतकी माहिती मिळते की त्याने आम्ही समृध्द होतो . मूळ संस्कृत कवितेबद्दल आणि कवयित्री बद्दल मला आज पहिल्यांदाच कळलं

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s