Categories
Introspective melodies Marathi Poetry Serenity Spirituality

अशाच एका दिवशी….

आज ४ सप्टेंबर! ही तारीख मी कधीच विसरू शकत नाही.

•आज एक शिवधनुष्य उचलण्याचे धाडस करतो आहे. एखाद्या दिवशी कविता किंवा गाणे कोणते आठवेल याचा काही नेम नाही, कित्येक वेळा मी पहाटे नेहमीच्या वेळी उठतानाच डोक्यात एखादे गाणे सतत फिरत असते, आदल्या रात्री ते ऐकले नसते,एव्हढेच नव्हे तर कित्येक वेळा त्या गायकाची गाणी सुद्धा ऐकलेली नसतात. पण असेच काहीतरी मनात घुमू लागते आणि अखंड चालू राहाते.

आज मला माझ्या आयुष्यातील समजायला सर्वात जास्त अवघड वाटलेले कवी ग्रेस यांची एक कविता आठवली. तसे बाबा वायुदळात असल्याने माझे लौकिक शिक्षण भारतभर एअर फोर्स स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांत झाले. शालेय शिक्षण सुरू होण्यापूर्वी (मी एकटा असताना, म्हणजे माझ्या बहिणीच्या जन्माआधी) आम्ही चिनी लोकांनी लादलेल्या युद्धाच्या आधी आणि नन्तर आसाम मध्ये तेजपूर येथे होतो. तेव्हा वेळ जाण्यासाठी म्हणून आईने पुण्यातील माझ्या मावशी/आत्याला सांगून मराठी गोष्टींची पुस्तके अप्पा बळवंत चौकातून मागवली, तेव्हा अस्मादिकांचे शिक्षण खऱ्या अर्थाने सुरू झाले. मी , आई आणि पुस्तके ही आमची शाळा. आमच्या शाळेत फळा नव्हता! एक शिक्षक, एक विद्यार्थी आणि वेळेचे बंधन नाही. एक पाटी (त्याकाळी दगडी पाटी असे, पत्र्याच्या पाट्या नन्तर आल्या) आणि पेन्सिल! त्यामुळे माझ्या आजच्या कविता समजण्यात त्रुटी राहिल्या असल्यास चू.भू.द्या.घ्या. !!

ग्रेस म्हणजे एक अवलिया कवी. प्रत्येक वेळी तीच ओळ वाचून वेगळा अर्थ लागतो. तेही म्हणत की मी माझी कविता कधीच समजावून देणार नाही- तुम्हांला वाचून जो लागेल तोच अर्थ!

सर्वप्रथम आज दिवसभर माझ्या डोक्यात चाललेल्या गाण्याबद्दल! ग्रेस, हृदयनाथ, लता हे त्रिकूट जमले की एक अविस्मरणीय अनुभव ठरलेलाच. त्या तिघांच्या ठायी ईश्वरी वरदानच आहे, प्रत्येक आपापल्या परीने दिग्गजच! पण त्यांना एकमेकांविषयी बोलताना ऐकावे: प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल वाटणारा अतीव, असीम, स्नेहादर आपल्याला कळून येतो.

आज तिघांपैकी फक्त बाळासाहेब उरले आहेत! कालाय तस्मै नमः! आधी मार्च १२ मध्ये ग्रेस आयुष्याच्या रंगमंचावरून विंगेत निघून गेले, मग ६ फेब्रुवारी २२ ला दीदी ही कालवश झाल्या. बाळासाहेब मंगेशकरांनी ही कविता स्वरबद्ध केली आणि त्यांची रचना म्हणजे दीदी किंवा आशाताई गाणारच! महाश्वेता नावाच्या दूरदर्शन मालिकेत हे गाणे आले आहे तरीही अत्यधिक लोकप्रिय झाले. महाराष्ट्रात कुठेही हे गाणे एकदा सुद्धा न ऐकलेले कोणी असेल असे मला खरेच वाटत नाही. https://youtu.be/x88r7JI4ljU

गाण्याची सुरुवात मला नेहमीच उंबरठा चित्रपटातील एका गीतासारखी वाटते. दोन्हीही शेवटी बाळासाहेबांच्याच रचना! आणि यमन हा खूप कर्णमधुर राग आहे, त्यावर आधारित खूपच रचना आहेत. सुमती क्षेत्रमाडे यांनी लिहिलेल्या मराठी कादंबरीशी एकदम जुळणाऱ्या कथानकावर सुधा मूर्ती (इन्फोसिस चे नारायण मूर्ती यांच्या सुविद्य पत्नी) यांनी कन्नड भाषेत ही कादंबरी लिहिली. त्यावर ही दूरदर्शन मालिका तयार झाली. त्यासाठी वापरले असूनही हे गाणे खूप गाजले आणि लोकप्रिय ही झाले.

ही मूळ कविता ग्रेस यांनी निष्पर्ण तरुंची राई या नावाने लिहिली आहे. चंद्रमाधवीचे प्रदेश या काव्यसंग्रहात ही प्रसिद्ध झाली होती.

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते।।धृ।।

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती

देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब

संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई

चंद्रमाधवीचे प्रदेशग्रेस

(मूळ कविता मोठी आहे, गाणे बनवताना कित्येक वेळा सबंध कविता वापरणे शक्य नसते, तसे केल्यास खूप लांब होईल आणि तेव्हढा वेळ उपलब्ध असतोच असे नाही, या कवितेतले धृपद धरून फक्त आठ ओळी गाण्यात आल्या आहेत, त्या वर वेगळ्या दर्शवल्या आहेत)

या कवितेची किमान १५-२० वेळा पारायणे केली असतील, पण दर वेळी वेगळी अनुभूती होते. आजच्या दिवशी (कदाचित आजच्या दिवसामुळेही असेल) सुचलेला अर्थ मी व्यक्त करतो आहे, ग्रेस यांच्या कवितेचा कधीही एक अर्थ लागणारच नाही. त्यामुळे हाच आशय त्यांनी मांडला आहे असली विधाने मी करणार नाही. मी जेव्हढे जास्त वाचतो तेव्हढ्या वेळा मला माझ्या अज्ञानाचीच जाणीव प्रकर्षाने होते. त्यामुळेच आटा लिटर मध्ये मी अजून मोजत नसेन.

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते एका जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच्या मनात उमटलेले भाव असावेत. या जगात जन्मलेल्या सर्व जीवांना मृत्यू निश्चित आहे हे माहीत असूनही त्याचे भय निरंतर वाटत राहावे हा मोठा दैवदुर्विलासच नाही का? माझ्या आयुष्याची संध्याकाळ सुरू झाल्यावर मला तू शिकवलेल्या सर्व गोष्टी (“गीते”) आठवतात. सर्वच उतार वयातील व्यक्ती जुन्या जुन्या आठवणी काढून त्यातच रममाण होतात. शिकवणारा अर्थातच माझ्यापेक्षा सर्वच बाबतीत मोठा असणे असणार. ही व्यक्ती आपली सर्वच बाबतीत शिक्षक असणारी कोणीतरी वडीलधारी व्यक्ती किंवा अगदी जगद्गुरू साक्षात ईश्वर ही असू शकेल. आयुष्याच्या शेवटी आपल्याला या शिक्षकाची आठवण न आल्यासच आश्चर्य वाटेल.

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया मला वाटते की लोकांच्या प्रेमाचे /स्नेहाचे/आपुलकीचे व्यक्त होण्यातला स्वाभाविक निर्माण होणारा कमीजास्तपणा यात दर्शवला आहे. चंद्राच्या महिन्याभरात बदलणाऱ्या कलाही तेच दर्शविते. भगवा रंग वैराग्य, अनास्था, स्थितप्रज्ञता दाखवणारा आहे. धरती हे जननीचे प्रतीक आहे जी सर्व जीवांना जन्म देते आणि सर्वांवरच एकसारखे प्रेम करते. झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया ही ओळ मला सरळसरळ जीवन-मरण-पुनर्जन्म ही अव्याहत चालणारी चक्राकार मालिकाच दाखवते आहे. आपण कोणाच्या तरी सावलीत बीजरूपात जन्माला येऊन वाढलो, आपण वृक्षासारखे मोठे झालो आणि दुसऱ्याला जन्म दिला, पोषण केले आणि त्याच वृक्षाच्या पायाशी कायमचे निजलो, हा निसर्गाचा नियमच दाखवून दिला आहे.

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला ह्या ओळी एकदम वेगळ्या वाटत नाहीत का? आयुष्याच्या अखेरीस द्विधा मनस्थितीत असताना कोणीतरी सत्याची प्रचिती करून देतो, एखाद्या मुमुक्षुला भवसागर पार करून जायचा मंत्राचाच साक्षात्कार करून देतो, तसा ‘तो बोल’ हळुवार स्पर्श करून दोलायमान झालेल्या मानवी मनाला शांत करून गेला, लंकेतल्या बंदिवासात श्रीरामाची निशाणी हनुमाना कडून मिळाल्यावर सीतामाई शांत झाली (कवीने आपले स्वातंत्र्य वापरून अंगठी ऐवजी श्रीरामाचा शेल्याचा उल्लेख केला आहे) असा काहीसा अर्थबोध मला झाला.

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे आयुष्यभर “स्व”केंद्रित राहून आपण आपल्याच दुःखाचे गाणे गात राहातो, ईश्वराच्या सान्निध्याची जाणीव मात्र चंद्राच्या शीतल प्रकाशासारखे सर्व सत्य स्पष्ट आणि आपल्या दृष्टीला त्रास न देता दाखवते, तशीच आयुष्यातील एकमेव चिरंतन सत्याची जाणीव झाल्यामुळे मनातील कोलाहल शमला, विचारांना स्थैर्य आले. https://youtu.be/BoYXtr0C_YE

आज गाण्यात घेतलेल्या ओळींचाच विचार मी केला, परत वेळ मिळेल तेंव्हा निश्चितच उरलेल्या कवितेवर विचार करीन, तेंव्हा काही दिवसांनी नक्की परत येऊन पहा- एक दोन दिवसांत नक्कीच पूर्ण करेन.

आता एवढेच पुरे. ग्रेस यांच्या कवितेचा थांगच लागत नाही हे खरे. मला तर अगदी खरे सांगायचे तर जडच जाते. मित्रहो तुम्हीही विचार करा, तुम्हाला काय जाणवले ते निश्चितच व्यक्त करा!

शुभरात्री

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

44 replies on “अशाच एका दिवशी….”

Farach sunder.. Tumach kavitech vishleshan wachal.. Kshanbhar as vatal ki, Marathi Professor kavita samjun sangat aahet.. Manapasun tumach abhinandan Sir . dhanyawad evdh chaan dynan tumhi deta.. 🙏🏻

Liked by 1 person

मी मराठीत प्रथम लिहायला आणि वाचायला शिकलो, माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे.

तत्कालीन परिस्थितीत इंग्रजी माध्यमातून शिकावे लागले पण माझे मराठी वाचन कित्येक मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा जास्त आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मी कायम एकेका लेखकाची सर्व पुस्तके वाचत असे.

Like

आई/ईश्वर यांच्या स्मरणाची ही कविता आहे असे बाळासाहेबांच्या कडून ऐकले आहे. ग्रेस समजायला अत्यंत कठीण! आपण खूप समर्पक विवेचन केलेत, धन्यवाद!
नकळत ग्रेसच्या दोन ओळी आठवल्या..

या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी अपुले हात उजळतो!

Liked by 1 person

नितांत सुंदर, गूढरम्य कविता आणि गाणंही …खोलवर रुतत जाणारं, अलगद डोळ्यात पाणी आणणार…..

तितकाच भावपूर्ण रसास्वाद,….
चंद्रसजणांचे झरे, भगवी माया…अशी धरती…राघवशेला असे सुंदर शब्द….किती सौंदर्यासक्त नजर असावी….
उत्कटतेची परिसीमा…..

कमाल कमाल आहे….

Liked by 1 person

सर्व ग्रेसच्या शब्दांचे मायाजाल आहे, ज्याला , जेव्हा, जसे कळेल तसा अर्थ घ्यावा

Like

🙏 सर्वप्रथम अत्यंत आभारी आहे ग्रेस वरती काहीतरी सकस लिहिलं सरजी. ग्रेस ही दुःखाची दंतकथा ..भय इथले हे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं तेव्हा लताबाईंनी स्वतः पहाटे अडीच तीन च्या सुमारास फोन करून त्यांना ऐकवल होतं .ग्रेस त्यावेळी नागपुरात राहत होते त्यांचे बरोबर त्यांचा मुलगा राघव हा ही होता ..तथापि नशीबात नसल्यामुळे राघवला ग्रेसनी अनेक वेळा उठवायचा प्रयत्न करून देखील तो उठला नाही.. ते निराशेच्या गर्तेत असताना मला त्यांनी सकाळी साडेसातच्या दरम्यान फोन केला आणि ही चाल आणि हे गाणं ऐकवलं होतं.. त्यांना मंगेशकरांच्या बरोबर काम करायची अत्यंत अत्यंत इच्छा होती पण काहीसं उशिराच ते बाळासाहेबांच्या सहवासात आले .. आणि पुढे त्या दोघांनी शेवटपर्यंत एकत्र काम केले.. सारं आठवलं .कारण भय इथले संपत नाही यामुळेच..सरजी अनेक अनेक धन्यवाद. शेवटी ग्रेसचीच एक कविता उध्दृत करतो… पाठशिवणीचा खेळ पोट शिवणीच्यासाठी ..थोडे रडू येता मृत्यू हसू लागे ओठी.. आता तक्रारच नाही.. तुम्ही शांतपणे जगा ..पण देठ तोडताना ठेवा फुलांसाठी जागा… उठा दयाघना लावा निरांजन देहातले सोने काय झाले.. ….सरजी ग्रेस हे माझ्यापुरतं बोलायचं झालं तरी स्वप्नच होते. सुदैवाने मला त्यांचा सहवास खूप लाभला…पण आज तुम्ही असं काहीसं अप्रतिम लिहिलंय त्यामुळे असंख्य आठवणी मनात दाटून आल्या आणि थोडसं जास्तच लिहून गेलोय.. मनःपूर्वक धन्यवाद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या कवितेचे उत्कृष्ट रसग्रहण आपण केले आहे… शब्दप्रभू आहातच…म्या पामरे कृतज्ञता व्यक्त करावी हे बरे…

Liked by 1 person

धन्यवाद विवेकजी

मी आयुष्यभर विद्यार्थीच राहीन आणि मिळेल तिथे आणि मिळेल ते शिकत राहीन

Like

ग्रेसनी स्वतः आपल्या कवितेबद्दल बोलताना एकदा सांगितलं होतं, माझ्या कवितेच्या रसिकांचे काय होते याचा अंदाज मी करू शकत नाही .कारण माझ्या निर्मितीच्या विवाद्य व जटिल प्रक्रियेशी कदाचित तो भिवून उभा राहत असला पाहिजे.. गाईच्या दुधावर त्या दुधाला आच दिली की साय आलीच पाहिजे ..असे कार्य कारण भावाचे साधे कोष्ष्टक घेऊन तो उभा राहत असला पाहिजे ..पण माझी प्रश्नचिन्ह निर्मिती असल्या कार्यकारणभावांच्या गणितांची उत्तरे देतेच कुठे ?ती म्हणून टाकते …चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय ..वाघिणीच्या दुधावर आली कशी साय .??काळोख उजळण्यासाठी जीवाने स्वतःला जाळून घ्यावे लागते हे खरेच आहे.. म्हणजे उजळण्यासाठी जळणेआलेच .पण तेवढ्यावरून जळणारा प्रत्येक जण उजळून निघेलच याची हमी मात्र देता येत नाही.. काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे ..जो वीज खूपसतो पोटी तो एकच जलधर उसळे…. शरीराच्या साजणवेळा आणि इंद्रियांचे निनादि प्रहर हे माझ्या शब्दसृष्टीचे मुलाधार आहेत ..माझे शब्द उत्कट पण शरीर स्पर्शाच्या कुळातले… पळवाट नकोच आहे ..मला फक्त दुःख टेकण्यापूर्ती थोडीशी संधीग्धदता… माझी कविता मी हे एक बेटच आहे .बेटावर सहलीसाठी लोक येतात किंवा समुद्र जिवावर उठला तर आश्रयाला येतात. या बेटावरून परतीच्या कुठल्याही बोटीची हमी देऊ शकत नाही मी ..परतावेसे वाटले तर स्वतःच होडी झाले पाहिजे…….. ग्रेस हे एक अगम्य कोडे होते…बरंच काही लिहिता येईल……. पुनः काही लिहावयाच्या अनावर मोहासाठी माफी असावी…

Liked by 1 person

छान रसग्रहण. तसं गंभीर/गुढ गोष्टी मला फार भावत नाहीत पण आपण जे विश्लेषण लिहीलय त्यामुळे यापुढे गंभीर गोष्टींच विश्लेषण वाचणार असं वाटतय. आपला सर्व क्षेत्रातला झपाटा अचंबित करतो.

Liked by 1 person

आटा लिटरमधे विकत घेणाऱ्याकडे तुमचं भारीच(आणि बारिक) लक्ष असतं.

Liked by 1 person

व्वा.. किती सुंदर ….
माझ्या अतिशय आवडत्या गाण्यांपैकी एक गाणे..
हे ऐकलं की आठवते..दूरदर्शन वरील महाश्वेता ही मालिका…त्यातील कलाकार….अभिनय….अतिशय धीरगंभीर आणि अत्यंत संवेदनशील विषय…
दुपारची वेळ….माझे शाळेतले सुंदर दिवस..
का कुणास ठाऊक पण जेंव्हा जेंव्हा मी हे गाणे एकते तेंव्हा दर वेळी एक अनामिक हुरहुर मनाला लागते…एक आर्तता वाटते आणि डोळे पाण्याने भरून येतात.. कवी ग्रेस यांचे शब्द, ह्रदयनाथ जींचें संगीत आणि लताजींच्या आवाजाची ही किमया असावी बहुतेक….
या काव्याविषयी काय बोलावे….
माझीया मनीचे त्याच्या मनाला जेंव्हा सारे कळले
बिन शब्दांच्या आर्त स्वरांनी फुल आकाशी फुलले

कवी ग्रेस यांच्या कविता समजायला खरेच खूप अवघड.. अनवट वाटेवरून चालताना अवचितपणे स्व तः पुरते असे काहीतरी गवसावे.
या कवितेतून तुंम्हाला गवसलेले असे काही खास तुंम्हीं खूप सुंदर रितीने व्यक्त केले आहे अनिरुद्ध सर……

Liked by 1 person

निव्वळ अ प्र ति म 👌🏼 . . .
वाचून झाल्यावर ह्यापेक्षा जास्त काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही … खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻

Liked by 1 person

अप्रतिम विवेचन एवढेच म्हणेन.
Very very much thankful to Shri Mohan Audhi sir for introducing me to Dr. Chandorkar who takes care of my heart & presents such beautiful pieces for my brains too. Thank you doctor.

Liked by 1 person

धन्यवाद सर 🙏🙏
अतिसुंदर कविता आणि तितकेच सुंदर विवेचन….

Liked by 1 person

कवी ग्रेस यांची ही कविता माझ्या लहान वयात दूरदर्शन वरच्या एका मालिकेच्या( श्र्वेतांबरा बहुतेक) शीर्षक गीताच्या रुपात प्रथम माझ्या कानावर पडली. तेव्हापासूनच या गाण्याबद्दल एक हवंहवंस वाटणारं गूढ कुतूहल मला वाटत आलं आहे. अर्थ कधीच नीट समजला नव्हता. आज तुमच्या लिखाणामुळे बराचसा कळला . त्यासाठी तुम्हाला🙏🙏🙏

Liked by 1 person

अप्रतिम रसग्रहण सर !!!
ग्रेस ह्यांच्या भय इथले मधले बरेच अर्थ हे रसग्रहण वाचल्यावर मनात उलगडत गेले आणि मनाला आनंद होत गेला..
खूप धन्यवाद अनिरुद्ध सर 🙏🌷

Liked by 1 person

धन्यवाद सर 🙏🙏
अतिसुंदर कविता आणि तितकेच सुंदर विवेचन….

Liked by 1 person

अनिरुद्ध
तुझ्या ह्या अप्रतिम रसाग्रहणाचं “रसग्रहण ” करण्यासाठी शब्द सुचत नाहीत

केवळ अवर्णनीय

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s