Categories
Marathi Film Songs Ram Kadam Romantic songs

निरंतर प्रतीक्षा….

आज खूप दिवसांनी हे गाणे मी ऐकले. आज याचा कल्पकतेने वापर एका मॉडेलच्या साडी व अलंकारांच्या फोटो शूट साठी पार्श्वभूमीवर केलेला पाहिला. ही मुलगी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांची कन्या आहे, त्यांनी ती क्लिप मला पाठवली होती. त्यांना मी तिचे कौतुक करणारा संदेश पाठवल्यावर त्या खूष होणारच. माझे मन मात्र गाण्यात रेंगाळले. वऱ्हाडी आणि वाजंत्री या खूप गाजलेल्या चित्रपटातील हे गाणे आहे.

आधुनिक वाल्मिकी या आपल्या नामाभिधानाला सार्थ ठरवणारे असे गदिमा आपल्या सर्वांना त्यांच्या कविराज या रुपात माहीत आहेतच. पण या व्यतिरिक्त, ते एक उत्तम निसर्गचित्रकार, लेखक, पटकथा लेखक, गीतकार होते. खूप कमी लोकांना माहीत आहे की एव्हढा उत्तम कवी अत्यंत सामान्य परिस्थितीत, सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावात जन्मला. त्यांचे बालपण माडगुळे या गावी गेले. त्यांचे वडील पंत प्रतिनिधी यांचे राज्य असलेल्या औंध संस्थानात कारकून म्हणून काम करत होते. ग दि मांचे शिक्षण त्यामुळे आटपाडी, कुंडल व औंध येथे झाले. गणिताचा आणि त्यांचा ३६ चा आकडा, त्यामुळे ते शालांत परीक्षा (त्या काळी ती मॅट्रिक्यूलेशन बोर्डाची परीक्षा असे) म्हणजे मॅट्रिक उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. घरच्या यथातथाच असलेल्या परिस्थितीमुळे त्यांना चरितार्थासाठी व्यवसाय/नोकरी शोधणं भाग पडले. या वेळी त्यांना लहानपणापासून असलेली लिहिण्याची व नकला करण्याची आवड उपयोगी आली. कोल्हापूरला त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टी बहरू लागली होती. त्यांचा शिरकाव यात नट म्हणून झाला, हे मात्र खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे पहिले दोन्ही चित्रपट आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या कथा-पटकथांवर आधारित व मास्टर विनायक (अभिनेत्री नन्दाचे वडील) यांनी दिग्दर्शित केलेले आहेत: ब्रह्मचारी व ब्रॅंडीची बाटली. दोन्हीमध्ये मीनाक्षी शिरोडकर या नायिकेच्या भूमिकेत होत्या. ब्रह्मचारी प्रदर्शित झाला तेव्हा गदिमा फक्त १९ वर्षांचे होते. यातल्या यमूनाजळी खेळू खेळ या गाण्याच्या वेळी मीनाक्षी बाईंनी स्विमसूट घालून तत्कालीन महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली, लोकांनी आचार्य अत्रे आणि मास्टर विनायक यांचा निषेध वगैरे करण्यासाठी मोठ्या सभा घेतल्या. पण असल्या संस्कृती रक्षक लोकांमुळे चित्रपटाला फुकट प्रसिद्धी मिळाल्यामुळे लोकांची उत्सुकता वाढली व तो उलट जास्त चालला. ब्रॅंडीची बाटली मध्ये दामूअण्णा मालवणकर यांची मोठी महत्वाची भूमिका होती. या चंचुप्रवेशामुळेच त्यांना ४ वर्षांत छोट्या छोट्या भूमिका करता करता भक्त दामाजी आणि पहिला पाळणा या चित्रपटात गीतलेखन करण्याची संधी मिळाली. त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी मात्र राजकमल च्या रामजोशी मुळे मिळाली. यांत त्यांनी कथा, पटकथा आणि गीते लिहिली होती. माझ्या आईचे मामा वि स खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काम केले. नवयुग मध्ये के नारायण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यामुळे त्यांना चित्रपट निर्मिती मधील खूप बारकावे शिकायला मिळाले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. https://youtu.be/gZzcNsFwXNI

गदिमांच्या अभिनयाची कित्येक उत्तम उदाहरणे त्याकाळच्या चित्रपटात बघायला मिळतात. वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटात त्याकाळचे सर्व प्रसिद्ध कलाकार दिसतात. विक्रम गोखले, इंदुमती पैंगणकर (हिंदी , गुजराती व भोजपुरी चित्रपट करताना यांनी कानन कौशल असे नाव धारण केले), सुलोचना, शांताबाई जोग,राजा परांजपे, राजशेखर, द.मा. मिरासदार, स्वतः गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, आणि शंकर पाटील हे सर्व अतिरथी- महारथी हजेरी लावून गेले. राजदत्त यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटाचे संगीत दिले आहे राम कदम यांनी. तमाशावरच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राम कदम यांनी हे गाणे रागदारीवर बसवले आहे. आशाताईंनी किती भाव खुलवले आहेत. पन्नास वर्षांनी सुद्धा या गाण्याची गोडी तशीच अवीट राहिली आहे. गदिमांच्या कवितांबद्दल मज पामराने काय बोलावे? त्यांची प्रतिभा खरोखरच अत्युच्च दर्जाची आहे (त्यांच्यासारख्या अमर पुरुषाचा उल्लेख भूतकाळात कसा करता येईल?). त्यांनी लिहिलेली चित्रपट गीते चैत्रबन या नावाच्या काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाली आहेत.

कधी तू दिसशील डोळ्यांपुढे
तुझ्यावाचून सुचे न काही वेड जीवाला जडे

स्वप्नी येसी जवळ बैसशी
स्पर्शभास तो तुझा तनुशी
एकांतीही मधूर स्वर तुझा अवचित कानी पडे

उपभोगाविण अवीट माधुरी
उठवी ओलसर रेखा अधरी
तव श्वासाच्या गंधास्तव पण श्वासच माझा अडे

आसुसली तनू आलिंगनासी
मधुमीलन हा ध्यास मनासी
चिरवांछीत हा योग सुमंगल का नच अजुनी घडे

शृंगारिक पण अतिशय संयमी भाषेतील ही अमर कविता. किती सुंदर, सोज्वळ भावनाविष्कार केला आहे. गणपतीतले पोपट-मैना तुलनेने शृंगारिक असण्यापेक्षा बीभत्स वाटतात मला. हेलन ने सुरुवातीला संपूर्ण रामायणात केलेले नृत्य आणि पद्मा खन्ना किंवा बिंदू यांनी केलेला नाच ( नाच कसला, नुसता बटबटीत धुडगूस!मला कधीकधी वाटते दिग्दर्शक चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी त्यांच्या तोकड्या कपड्यात तीन चार झुरळं सोडून देत असावेत, म्हणूनच या हिडिम्बा अशा थयथयाट करायच्या ) असो. बघवत नसे हे मात्र खरे.

योगायोगाने आज एका जाहिरातीमध्ये ऐकलेल्या गाण्याने खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

दिवाळी जवळ येऊन ठेपली असून सुद्धा वरुणराजा हात आखडता घेत नाहीये! बळीराजा त्यामुळे परत एकदा हवालदिल होतोय का, अशी भीती वाटतेय. शुभरात्री लोकहो, काळजी घ्या..

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

14 replies on “निरंतर प्रतीक्षा….”

गदिमां बाबत काय बोलायचे , नुसते ऐकत रहावे. अशाच आशयाचे गीत मुंबईचा जावई चित्रपटात आहे – का रे अबोला, का रे दुरावा अपराध माझा असा काय झाला.आपली खुलवून व समजावून सांगायची शैली अत्युत्तम आहे. धन्यवाद डाॅक्टर.

Liked by 1 person

गदिमांचे भावमधुर व अविट गोडीचे गीत, राम कदमांचे संगीत व आशाताईंचा आवाज असा त्रिवेणी संगम असलेले हे गीत निवडल्याबद्दल धन्यवाद!!

Liked by 1 person

छान गीत, छान लेख!
गदिमा 🙏🙏
आमच्या ज्ञानात खूप भर पडते आपले लेख वाचून 🙏

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s