Categories
Spiritual music Spirituality

आदि शंकराचार्य रचित निर्वाणषटकम्

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती |
तस्माधी काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितं ||

२००४ सालच्या एप्रिल अखेरीस आम्ही सहा जण केरळमध्ये सुटीस गेलो होतो. बाबा, आई, अरुणा, मुले आणि मी. माझ्या कोची स्थित हृदयरोगतज्ञ मित्राने माझ्या सांगण्यावरून “हिंदी बोलू शकणारा वाहनचालक आणि वाहन कोची विमानतळावर भेटेल आणि तिथून परत जाईपर्यंत तुमच्याबरोबर राहील” असे आश्वासन दिले होते. आम्ही विमानप्रवास करून पोचलो तेव्हा आगमनाच्या दरवाजाबाहेर माझ्या नावाचा फलक घेऊन एक दाढीवाला पण विभूती लावलेला माणूस उभा होता. मी “होय मीच डॉ चांदोरकर” असे सूचित केले आणि आम्ही सामानाची ट्रॉली त्याच्या गाडीपाशी गेलो. त्याने स्वतःचे नाव “सेबी” असे सांगितलं. आम्ही विमानतळावरून मुन्नारला गेलो, तेथून थेक्कडी, मग कुमारकोम, मग कोची असा प्रवास करत दहा-अकरा दिवसांनी परत आलो. प्रवासात हा गृहस्थ नेहमी येसुदास या गायकाच्या कॅसेट लावत होता. दुसऱ्या दिवशी न राहवून मी त्याला या विषयी बोलते केले. त्याने सांगितले की तो येसुदासचा खूप मोठा चाहता आहे. मुंबईत बरीच वर्षे नोकरी केल्यामुळे तो हिंदी चांगली बोलू शकत होताच, पण मराठी सुध्दा कळते पण आता सराव नसल्याने बोलता येत नाही. त्याच्याकडून कळले की येसुदास जन्माला आला तो ख्रिश्चन कुटुंबात, पण त्याची श्रीकृष्णावर खूप भक्ती! त्याने इतकी भजने आणि संस्कृत तसेच मल्याळम भाषेत स्तोत्रे गायली आहेत की तीच मंदिरात ऐकायला मिळतात. आमच्यासाठी तो रोज तीच गाणी ऐकवी. योगायोगाने परतीच्या प्रवासात दोन दिवस उरले असताना हॉटेल मध्ये दस्तुरखुद्द येसुदास साहेबांनी दर्शन दिले, काही वेळ सहवासाचा लाभ मिळाला हे आम्हां सर्वांचे महद्भाग्य! दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या कारणासाठी मी सर्वांना केरळात आणले होते, ते मी अंमलात आणले. कोची जवळच आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थान आहे. भारतात सनातन धर्म मरगळीस आलेला असताना त्याला पुनरुज्जीवन देणारा हा लोकोत्तर पुरुष, नव्हे दैवी अवतारच! त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका सोडून नुसते उपलब्ध पुराव्यानिशी जरी पाहिले तरी यांच्या महान कार्याचा आवाका पाहून स्तिमित व्हायला होते. इतक्या अल्पवयीन आयुष्यात भारतात सर्वदूर पायी प्रवास करून चार कोपऱ्यात आपले मठ स्थापन केले, त्याकाळी एवढा खंडप्राय देश पायी चालून जाणे खरेच अवघड होते, ते अशक्यप्राय वाटणारे काम शक्य करून दाखवले आचार्यांनी. त्यांचा शास्त्रार्थावर त्याकाळचे प्रख्यात पंडित मंडण मिश्रा यांशी ४२ दिवस वादविवाद झाला आणि त्यात ते विजयी झाले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे प्रसंग त्यांच्या जन्मस्थानी कालदी येथे बांधलेल्या १५० फूट उंच मनोऱ्यात चित्ररूपात दाखवले आहेत. थोडक्यात एका लोकोत्तर पुरुषाचा जीवनपटच मांडला आहे. ते पाहूनच नतमस्तक होतोच पण थोडीबहुत प्रेरणा ही मिळते. माझी आई तेव्हा आचार्यांच्या भज गोविंदम चे ओवीबद्ध रूपांतर मराठीत करत होती. ते पुस्तक पूर्ण होऊन प्रसिद्ध होईपर्यंत तिला नेहमी प्रोत्साहन देणारे माझे बाबा दुर्दैवाने देहरूपाने नव्हते. ते पुस्तक वाचून मी आचार्यांच्या काही रचना वाचल्या.

काही दिवसांपूर्वी नव्या पिढीतील एक लोकप्रिय गायक कैलास खेर याने आचार्यांच्या निर्वाणषटकम् याच्या हिंदी रूपांतरित गायलेली एक विडिओ फीत व्हाट्सएपच्या बऱ्याच ग्रुपमधून फिरत होती. तेव्हा परत एकदा आचार्यांच्या या उत्कृष्ट रचनेची आठवण आली.

निर्वाणषटकम् इतके ओजस्वी छोटेसे स्तोत्र आहे, आणि आचार्यांच्या सर्वच रचनांसारखी एक स्वाभाविक गेयता आहे. पंडित जसराजजी माझे माझ्या भूतलावरील वास्तव्यात पाहिलेल्या-ऐकलेल्या गायकांपैकी माझे (व बाबांचे) सर्वात आवडते गायक. त्यांच्या आवाजात काहीही ऐकणे म्हणजे एक पर्वणीच आहे. https://youtu.be/GJtOp1gS9fg

सर्वप्रथम संपूर्ण स्तोत्र पाहूयात:

मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः . चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।१ ॥

न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः
न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्म न चारथो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥

न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥

अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्॥६॥

इतक्या सुंदर शब्दात आचार्यांनी एका परमानंदाच्या मनोस्थितीचे वर्णन केले आहे, ते वाचताना माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहायला लागले.

दुर्दैवाने बऱ्याच लोकांना आपली गिर्वाण भारती हल्ली एव्हढी कळत नाही. हे सनातन धर्माचे आणि आपण सर्व भारतीयांचे दुर्दैवच म्हणायचे. मी या छोट्याश्या स्तोत्राचा जो अर्थबोध मला (माझ्या अगदी मर्यादित कुवतीनुसार) झाला तो मराठीत मांडतो. सर्वप्रथम आचार्यांना साष्टांग दंडवत! माझ्याकडून भाषांतर करताना काही चूक झाल्यास /उणीव राहिल्यास/ उपमर्द घडल्यास आचार्यांनी मला क्षमा करावी. आपण सर्व थोरामोठ्यांनी माझी चूक जरूर निदर्शनास आणून द्यावी, मला स्वतःला सुधारण्यासाठी संधी द्यावी, मला आनंदच होईल.

मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः . चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।१ ॥

१.१: मी मन नाही, बुद्धी नाही, अथवा अहंकार किंवा चित्त ही नाही,

१.२: नाही मी कान, न जीभ, न नाक, अथवा नाही मी डोळे,
१.३: नाही मी आकाश, न पृथ्वी, न अग्नि, आणि नाही मी वायू,
१.४: मी आहे सदानंद रुपी चेतना , मी शिव आहे, मी शिव आहे।

न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः
न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥

२.१: नाही मी प्राणाची संज्ञा, नाही मी पाच प्राणवायू,
२.२: नाही मी (शरीराचे) सात धातू, नाही मी (शरीराचे) पाच कोष,
२.३: नाही मी वाणीचे अंग, नाही अथवा मी हात, नाहीच मी मलोत्सर्जनाचे अंग,
२.४: मी आहे सदानंद रुपी चेतना , मी शिव आहे, मी शिव आहे।

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्म न चारथो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥

३.१: नाही मी द्वेष, नाही मी आसक्ती, नाही मी लोभ नाही अथवा मी मोह,
३.२: नाही मला अहंकार, अथवा नाही मला मात्सर्याची भावना,
३.३: नाही मी सीमित धर्म, अर्थ, काम अथवा मोक्षाने,
३.४: मी आहे सदानंद रुपी चेतना , मी शिव आहे, मी शिव आहे।

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥

४.१: नाही मी (आता बांधील) पुण्याने, नाही मी (आता बांधील) सुखाने , अथवा नाही मी (आता बांधील) दुःखांनी,
४.२: नाही मी (आता बांधील) मंत्रांनी,  नाही मी (आता बांधील) पवित्र तीर्थांनी, नाही मी  (आता बांधील) पवित्र वेदांनी,  नाहीच मी (आता बांधील) यज्ञांनी (त्यातील आहुतींनी),
४.३: नाही मी (आता बांधील) भोजनांनी, नाही मी  (आता बांधील) भोज्य पदार्थांनी, अथवा नाही मी (आता बांधील) भोक्ता,
४.४: मी आहे सदानंद रुपी चेतना , मी शिव आहे, मी शिव आहे।

न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥

५.१: नाही मी (आता बांधील) मृत्यूने, नाही मी (आता बांधील) मृत्यूच्या शंकेने/भीतीने , अथवा नाही मी (आता बांधील) जातिभेदाने,
५.२: नाही मला पिता, माता, नाही मला जन्म,
५.३: नाही मला कोणी भाऊ, न कोणी मित्र, न कोणी गुरू, न कोणी शिष्य,
५.४: मी आहे सदानंद रुपी चेतना , मी शिव आहे, मी शिव आहे।

अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्॥६॥

६.१: मी आहे कोणत्याही पर्याया शिवाय, निराकार , नाही मला रूप,
६.२: मी प्रत्येक गोष्टीत अंतर्भूत आहे, सर्व इंद्रियांच्या मागील सर्व भावनात अंतर्भूत आहे,
६.३: नाही मला कोणाची साथ-संगत, न मुक्ति, न मला मोजता येते,
६.४: मी आहे सदानंद रुपी चेतना , मी शिव आहे, मी शिव आहे।

किती परम आनंदाची, मुक्तीची, सुटकेची भावना आहे- ऐहिक बंधनातून कायमची सुटका झाल्यावर मिळणाऱ्या परमोच्च आनंदाची ही अनुभूती! देहाच्या, संसाराच्या, समाजाच्या, विश्वाच्याच सर्व बंधनातून मुक्ती मिळाल्यावर मिळणारा हा आनंद! ऐहिक अस्तित्वातूनच कायमची सुटका! मोक्षप्राप्तीची वाट पाहणाऱ्या सर्व मुमुक्षूंना असलेल्या जन्मजन्मांतरीची प्रतीक्षा संपण्याची ही वेळ! ज्याची आपण उत्कंठेने इतकी युगानुयुगे वाट पाहिली, ती प्राप्त झाल्यानंतर भावना आचार्यांनी किती अचूकपणे शब्दांत मांडली आहे पहा.

त्यांच्या दैवी विचारशक्ती व प्रतिभेसमोर फक्त नतमस्तक व्हायचे आणि त्यांच्या आनंदाची प्रचिती आपल्या सीमित कल्पनाशक्तीने घ्यायची!https://youtu.be/B55wh7Bvivk

नुसत्या कल्पनेनेच मी स्वतः आनंदवनभुवनी पोचलो! एक क्षणभर नुसत्या कल्पनेनेच रोमांच उभे राहिले.

असे खरेच झाले तर….

मित्रहो आज एवढेच पुरे, शुभरात्री!

श्री शंकराचार्यापणमस्तु।।

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

42 replies on “आदि शंकराचार्य रचित निर्वाणषटकम्”

वा , फार सुंदर . I am sending it to my older sister who is a Sanskrit teacher .( among other qualities ) I did study Sanskrit in school , the translation is perfect .
Sanskrit shlokas seems so impressive , 🙏

Like

केरळला आम्ही गेलो होतो तेव्हा आवर्जून कालदीला गेलो होतो. अदि शंकराचार्यांचे जन्मस्थानाचे दर्शन घेतले.पूर्णा नदीचे पात्र पाहिले व धन्य झालो.
आतापर्यंत पाठविलेल्या सर्व पोस्टच्या हा मेरूमणीच आहे. धन्यवाद डाॅक्टरसाहेब.

Liked by 1 person

खरंच बऱ्याच दिवसानंतर एवढं चांगलं वाचायला मिळालं. हे निर्वाणष्टक ऐकलेलं पण अर्थासकट आज समजले. मंत्रामुग्ध होण्याची अनुभूती झाली. खरंच खूप छान.

Liked by 1 person

Dhanyawad, ha shabd apura padava 🙏🏻🙏🏻🙏🏻… “Moksh” mhanje nakki kai, he jari aaj samjat nasel mala , pan aihik bandhanatun purn aliptata yeu shakel tar to nakki “Sonyacha din” asel, ani to mala anubhavata yava, hi param pityala Vinavani me karate..

Liked by 1 person

फारच सुंदर लेखन 👍🙏
मोक्षाची सर्वोच्च कल्पना वाचताना अंगावर रोमांच उभे राहत होते! खरंच असं घडलं तर!
आदि शंकराचार्य व पं. जसराज यांना विनम्र अभिवादन 🙏🙏 व हा लेख आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले आभार!🙏

Liked by 1 person

सुंदर ! निरामय अनुभव. मी लहानपणी हे रेडिओवर ऐकत असे कारण आई पहाटे रेडिओ लावत असे. पण जसराजांच्या आवाजात नव्हतं ते ! विश्लेषणही फार सुरेख ! 🙏

Liked by 1 person

खूप सुंदर अनुवाद! मला संस्कृत नव्हत, आज अर्थ व्यवस्थित कळला . धन्यवाद 🙏

Liked by 1 person

शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद सर 🙏🌹
पंडित जसराजजींच्या धीरगंभीर आवाजात स्तोत्र ऐकताना मन भारावून जातेच..आणि आता त्याचा अर्थ समजून ऐकताना अजूनच आनंद वाटतोय 👌👏🙏🌹

Liked by 1 person

सरजी कमाल..मी दोन दिवसांसाठी कोचीला गेलो होतो.एक संपूर्ण दिवस मी कालडी मधे व्यतित केला होता.रविंद्र पिंगेंचा लेख हे माझं स्फूर्तिदायक स्थान होते..पण आज आपण आवाजाच्या जादूगाराच्या साक्षात आवाजात ऐकवलत..श्रुती धन्य जाहल्या…कधीतरी मशआद्य गुरुंच्या अनेक स्रोतांवर तुमची लेखणी चालावी ही अपेक्षा बाळगतो..नर्मदाष्टक,मधुराष्टक इ.ऐकल्यावर भान हरपते.. जगद्गुरुंनी जगाचं कल्याण केलंय याचा
प्रत्यय येतोच…माझे शब्द तोकडे पडतात ..फक्त केवळ कृतज्ञता…

Liked by 1 person

सर्वांगसुंदर, खरेच हिंदू धर्मात जन्म मिळाल्याचे भाग्य आहे व या सर्वाचा आस्वाद घेता येतो.

Liked by 1 person

पंडित जसराज जी च्या धीरगंभीर आवाजात स्तोत्र प्रथमच ऐकले व भारावून गेलो. अप्रतिम विवेचन.

Liked by 1 person

Thank you,Dole band karun aaikat rahave ashi gayki👌👌👍🙏10 th SSC -2nd batch,sanscrut vishayach navhata, translation khup bhavle.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s