Categories
Marathi Bhavgeet Shriniwas Khale

एका गोड गळ्याच्या सुंदर सुमनाची आठवण….

आज २८ जानेवारी २०२३. ढाक्यात जन्मलेल्या एका अप्रतिम गायिकेचा ८६ वा वाढदिवस! तिचे वडील सेन्ट्रल बँकेत उच्चपदस्थ अधिकारी होते व तिचा जन्म तिथे झाला. लहानपणापासूनच मी कानसेन असल्याने तिचा परिचय आम्ही भाग्यनगरच्या जवळ हकिमपेट (येथे माझे वडील हवाईदळात असताना) येथे राहात होतो, तेव्हां झाला. पण हेमाडी कल्याणपूर या नावातील मतितार्थ मी मुंबईतील पार्ले कॉलेजमध्ये FY Science व Inter Science मध्ये शिकत असताना मला भेटलेल्या शशिकांत हेरंजलशी मैत्री झाल्यावरच कळला. सुमनताई सर्व भावंडांत वयाने सर्वात मोठ्या. त्या ६ वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब ढाक्याहून मुंबईस स्थलांतरित झाले. त्यांचे शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच त्यांना कला व संगीताची खूप आवड होती. मुंबईत संगीताचे शिक्षण घेतलेल्या सुमनताईंनी पौगंडावस्थेत असतानाच पार्श्वगायिका म्हणून प्रवेश केला. हिंदी, मराठी व १० इतर भाषांत त्यांची चित्रपटगीते ऐकायला मिळतात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना दुर्दैवाने भलेबुरे खूप अनुभव आले. प्रस्थापित गायिकांनी सर्वप्रकारचे अडथळे निर्माण केले. रेकॉर्डिंग स्टुडिओ मिळू न देणे, संगीतकारांशी बोलून “त्यांना घेऊ नये” अशा (गर्भित धमकी) सूचना देणे, हवे ते वादक इतर ठिकाणी गुंतवून ठेवणे, वगैरे अशोभनीय गोष्टींना सुमनताईंना सामोरे जावे लागले. तरीही सुमनताईंनी कधीही स्वतःचा संयम ढळू दिला नाही, आपल्या शालीन वागण्याला कधीही न सोडता स्वतःची गानतपस्या न सोडता संधी मिळेल तेव्हा गाऊन आपला ठसा विरोधकांना न जुमानता उठवलाच. सुमनताईंना कमी संधी मिळाल्या हे खरे आहे, पण त्यांच्या सर्व गाण्यात बाजारू किंवा टाकाऊ गाण्यांची उणीव कोणालाही जाणवेल. त्यांच्या समकालीन प्रसिद्ध गायिकांपेक्षा संख्येने कमी गाणी त्यांच्या वाट्याला आली हे दुर्दैवी सत्य जरी आपण स्वीकारले तरी त्यांच्या गाण्यांचा दर्जा इतरांपेक्षा तसूभरही कमी वाटणार नाही, उलट काकणभर सरसच जाणवेल, हे मात्र खरे आहे. मराठी भावगीताच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य खूपच मोठे व खऱ्या अर्थाने अविस्मरणीय आहे.

हे गाणे पहा: मंगेश पाडगावकर यांचे काव्य, श्रीनिवास खळे यांनी चढवलेला अप्रतिम स्वरसाज आणि सुमनताईंचे मधाळ गाणे. त्यांनी गायलेली शेकडो गीते मला आवडतात, त्यातील हे जरा आणखी लाडके! https://youtu.be/WxKN-EBh_jg

किती लोभस काव्य आहे, किती सहज तरल, सुश्राव्य संगीतरचना आणि किती संतुलित मधुर आवाज लागला आहे. अहाहा!

विसरशील तु सारे


हे हात असे जुळलेले
हे नेत्र असे खिळलेले
विसरशील तु सारे
विसरशील तु सारे
विसरशील तु सारे
हे सांध्यरंग विरतील
तारका नभी झुरतील
हे उदास होतिल वारे
विसरशील तु सारे
विसरशील तु सारे
विसरशील तु सारे
मधुगंध धुंद उडताना
तिमिरात चंद्र बुडताना
मधुगंध धुंद उडताना
तिमिरात चंद्र बुडताना
मी स्मरेन सर्व इशारे
विसरशील तु सारे
विसरशील तु सारे
विसरशील तु सारे
तु जिथे कुठे असशील
स्वप्नांत मला दिसशील
तुज कळेल पण हे का रे
विसरशील तु सारे
विसरशील तु सारे
विसरशील तु सारे

…… मंगेश पाडगावकर

खरे खुरे अमूल्य स्वररत्न आहे हे! सुमनताई गातात तेव्हां त्यांच्या स्वरांबरोबर आपण वेगळ्याच दुनियेत धुंद होतो नाही का? एकदा ऐकून पोट भरत नाहीच कधीही! https://youtu.be/T8Fl3e_kt-U

सुमनताईंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करून पुढील काळात आरोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा देतो!

त्यांच्या गाण्यात आजची संध्याकाळ मस्त जाईल, हे नक्की!

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

18 replies on “एका गोड गळ्याच्या सुंदर सुमनाची आठवण….”

आम्ही मात्र सुमनताईंना व त्यांच्या गीतांना अजिबात विसरणार नाही. सर्वांगसुंदर लेख व गीत.

Liked by 1 person

खूप सुंदर काव्य आणि सुंदरश्या आठवणी. सुमनताईना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

Liked by 1 person

Wonderful tribute.
She is one singer whom I have mistaken many times for Lata didi and got a surprise to see that it was Suman Kalyanpur.
I have grown up listening to her Bengali songs more than her Hindi or Marathi ones.

Liked by 1 person

गाण्याची निवड फारंच छान. माझ्या दुर्दैवानं हे गाणे माझ्या आठवणीत नव्हतं. Thank you ABC
मधुगंध धुंद उडताना——- लाजबाब शब्द आणी त्याचं उच्चारण ही.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s