आज ४ फेब्रुवारी. आज माझेच नव्हे, तर भारतातील प्रत्येक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतप्रेमींचे लाडके असे गायक नव्हे तपस्वी म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांचा शतकोत्तर पहिलाच जन्मदिवस! माझे महद्भाग्य की त्यांच्या पायांना मी स्पर्श करू शकलो. दुर्दैवाने त्यांच्या आजारपणात माझा त्यांचा संबंध जास्त आला, त्यामुळे मला शरपंजरी पडलेले भीष्माचार्य कसे दिसत असतील याची जाणीव झाली.
माझे वडील वायुदलात होते. १९६१-६२ मध्ये आम्ही तेजपूरला होतो. तेव्हा सुरुवातीला बरेच दिवस आमचे एकच महाराष्ट्रीय कुटुंब तिथे होते. काही दिवसानंतर दिघेकाकांचे लग्न झाले. तिथे असलेले इतर मराठी भाषिक वायुदलातले तसेच सैन्यातले लोक आमच्याकडे नेहमी येत जात. त्यातील एक पुण्यातील दत्तात्रेय जोशी यांनी व केळकर काकांनी मला जी गाणी शिकवली, त्यातील हे एक.
गुळाचा गणपती म्हणजे सबकुछ पु लं! हे गाणे अमर आहे, गदिमांनी बोल लिहिले आहेत आणि संगीत दिले आहे दस्तुरखुद्द पु लं नी! चित्रपटात प्रमुख भूमिका ही त्यांचीच आहे. कथेचा गाभा थोड्या प्रमाणात १९४७ साली प्रदर्शित झालेल्या The Secret Life of Walter Mitty शी जुळणारा आहे, पण इतके फरक आहेत, की त्यावर बेतलेला किंवा त्याचीच रुपांतरीत आवृत्ती आहे असे वाटत नाही. हे गाणे ऐका: https://youtu.be/tbXsqtxsea4
गायले आहे भीमसेनजींनी. नावापुरते किराणा घराण्यातील पण इतरांसारखा पातळ आवाज बिलकुल नव्हता. माझी आतेबहीण विदुषी हिराबाई बडोदेकर यांची शिष्या होती, भीमसेनजी गायला लागले की डोंगरावरून कोसळणाऱ्या एखाद्या उन्मुक्त प्रपाताप्रमाणे वाटे. श्रोते त्यांच्या सुरांच्या प्रवाहात अगदी चिंब भिजून वाहत जात. त्यांच्या इतक्या ताकदीचा आवाज मी आयुष्यात ऐकला नाही. पु ल देशपांडे यांच्या अंतरीच्या नाना कला बहुश्रुत आहेतच. पण संगीतकार म्हणून ही ते खूप कल्पक होते. त्यांची संगीताची जाण आणि अभ्यास त्यांच्या निर्मितीत दिसून येतात. भीमपलास रागात बांधलेले हे गाणे आहे. पंडितजींनी किती रंगून गायले आहे, अगदी ६१ सालापासून मला मोहून टाकले आहे.
इंद्रायणी काठी
….. ग दि माडगूळकर
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची
ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे
उजेडी राहिले उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई
पडद्यावर पु ल आणि सर्व श्रोते गाण्यात डोलायला लावण्याची किमया भीमसेनजींची! अगदी तल्लीन, मंत्रमुग्ध व्हायला हवेच सर्वांनी!https://youtu.be/fB-phlSkJ4c
आज स्वरभास्करांच्या तपस्येची आठवण सर्व संगीतप्रेमींना नक्की येणारच. त्यांच्या एकमेवाद्वितीय कार्याच्या बाबतीत चपखल बसणारी उक्ती म्हणजे:
झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हाच!!
पंडितजींनी आयुष्यभर आपल्याकडच्या संगीताची मुक्तहस्ते सर्व श्रोतृवृंदात उधळण केली, आमच्या आयुष्याला खूप समृद्ध केले. त्यांच्या तपस्येला कोटी कोटी प्रणाम!
20 replies on “आठवण स्वरभास्कराची”
🙏🙏🙏 शतश: नमन !!!
LikeLiked by 1 person
भीमसेनजींनी इतके मोठे कार्य करून ठेवले आहे, की त्यांच्या जवळपास कोणी जाण्याचा विचार ही करू शकत नाही
LikeLike
आहा..
ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागली..!
खूप सुंदर
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ मुळे
LikeLike
आहा
ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागली .
समाधी अवस्था..!
खूप सुंदर!
LikeLiked by 1 person
अगदी खरे
LikeLike
अगदी खरे आहै कि ऐकणार्याला डोलायला लावणारच.
अप्रतिम गीत व लिखाण. धन्यवाद सर.
LikeLiked by 1 person
धन्यवाद वाळिंबे साहेब
LikeLike
अप्रतिम..
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना शतशः नमन💐💐🙏🙏
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
अप्रतिम!
किती वेळा ऐकले तरी समाधान होत नाही
LikeLiked by 1 person
खरे आहे
LikeLike
पंडित भीमसेन जोशी यांना शतशः नमन. खूपच अप्रतिम खरंच झाले बहू होतील बहू पण यांच्यासम कोणीच नाही.
LikeLiked by 1 person
अगदी खरे
LikeLike
पंडितजींना नमन.What a legacy we have!
LikeLiked by 1 person
Indeed Sir. Just fabulous, invaluable. The older generation’s voice couldn’t be preserved for posterity but these giants’ memory will always be alive. They’ve truly immortalized themselves through their oeuvre
LikeLike
भारतरत्न भीमसेन जोशी यांना विनम्र अभिवादन
LikeLiked by 1 person
धन्यवाद श्रीनिवास जी
LikeLike
स्वरभास्कर या बिरुदाला साजेसे लखलखीत गायन म्हणजेच पं. भीमसेन जोशी!
पंडितजींना विनम्र अभिवादन 🙏🙏
डाॅ. सर आपण आपल्या विविधांगी लेखनातून अनेक दिग्गज कलाकारांच्या आठवणींना उजाळा देता याबद्दल आपले आभार!
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike