Categories
Romantic Duets

एका सुरेल आठवणीत रंगलो मी….

माझ्या लहानपणी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला आम्ही हमखास येत असू. बाबा वायुदलात होते त्यामुळे देशाच्या चार कोपऱ्यात आम्ही राहिलो आहे: मी फक्त एक गावांची मालिका सांगतो जिथे आम्ही ओळीने राहिलो आहोत: तांबरम (चेन्नई), तेजपूर (आसाम), हकिमपेट (भाग्यनगर) , आदमपूर (पंजाब), अंबाला (तेव्हा पंजाब, आता हरियाणा). इतक्या लांब लांब राहून देशसेवा करताना आपल्या लोकांची आठवण न आल्यासच नवल. त्याकाळी सुट्टीला “मामाच्या गावाला जाऊ या…आत्या” म्हणजे आजोळी किंवा कोणा नातेवाईकांच्या घरी जाणे हाच नेम असे. सुट्टीत पुण्यात मावशीच्या वाड्यात आणि आत्याच्या घरी राहणे हा मुख्य कार्यक्रम असे. मग भेळ, रसपान, पर्वती वगैरे गोष्टी ठरलेल्या!

आम्ही जातो अमुच्या गावा हा अशाच एका सुट्टीत विजय टॉकीज (सुरुवातीला याचे नामकरण लिमये नाट्य चित्र मंदिर वगैरे झाले होते, त्यामुळे जुने पुणे ३० चे “मूलनिवासी” त्याला न चुकता लि. ना.चि. मं. म्हणतात) मध्ये पाहिलेला चित्रपट. श्रीकांत मोघे आणि उमा जरी चित्रपटात नायक-नायिका असले तरी प्रमुख भूमिका त्यातील तीन चोर (सूर्यकांत, धुमाळ आणि गणेश सोळंकी) नायिकेच्या घरी चोरीच्या उद्देशाने येतात पण तिच्या वडिलांना त्यांच्या विश्वासू भागीदाराने फसवले आहे हे कळल्यावर तिथे राहून त्यांना मदत करायचे ठरवतात. (धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटात काम केलेल्या सूर्यकांत यांचे या चित्रपटात सुद्धा नाव संताजी हेच आहे, त्यांच्या दोन चोर असलेल्या साथीदारांची नावे धनाजी आणि सयाजी आहेत). मधुसूदन कालेकर यांची पटकथा आणि कमलाकर तोरणे यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट मस्त. त्यातले हे गाणे बाबूजीआशाताईंनी गायलेले आणि बाबूजींनीच संगीतबद्ध केलेले आहे. ते मला खूप आवडते. https://youtu.be/KOFb8SS8Seg

स्वप्‍नांत रंगले मी

स्वप्‍नांत रंगले मी चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्‍नांत रंगले मी
हे वेड प्रेमिकांचे गीतात गायिले मी
हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी
स्वप्‍नांत रंगले मी

या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्‍नांत रंगले मी

एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा
या नील मंडपात जमला निसर्गमेळा
मिळवून शब्द सूर हे हार गुंफिले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्‍नांत रंगले मी

घेशील का सख्या तू हातात हात माझा
हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्‍नांत रंगले मी 

जगदीश खेबुडकर मूळचे शाळामास्तर. उत्तम कवी. त्यांचे हे काव्य एकदम गदिमांच्या पठडीतील वाटेल असे आहे. पुढे सोंगाड्या पासून त्यांची दादांबरोबर गट्टी जमली. त्यांच्या प्रतिभेचा खरा बाज अशा गाण्यातून दिसून येतो. गाणे खरेच सुंदर झाले आहे. https://youtu.be/kEnjL55bt0M

आज हे गाणे अचानक का आठवले याचे उत्तर मला देता येणार नाही. माझे खूप आवडते गाणे आहे. तुम्हांलाही निश्चितच आवडेल.

उन्हाळ्यात द्रव पदार्थ जास्त प्या, म्हणजे उष्माघात होणार नाही. गेले काही दिवस पारा वर चढतोय. काळजी घ्या. शुभरात्री

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

18 replies on “एका सुरेल आठवणीत रंगलो मी….”

बाबूजींची शब्दप्रधान गायकी. क्ष एका…हे माझे अत्यंत आवडते गीत..खेबुडकर यांची खूप गीते गदिमांच्या पठडीतील वाटतात..पण त्यांच्या शब्दसामर्थ्याची साक्ष अशा अनेक गीतातून व्यक्त झाली आहेच.. अत्यंत थोर पण निगर्वी व्यक्तिमत्त्व..सरजी धन्यवाद..
.

Liked by 1 person

सर्वांगसुंदर गीत,गायक/गायिका व आपली टिपणी. धन्यवाद डाॅक्टरसाहेब.

Liked by 1 person

माझ ही फार फार आवडत गाण👌👌👌👌👌
व का कोण जाणे मधेच मी ते गुणगुणतो👍
कधी कधी कोणी अतर्क्य गोष्टी बोलल( मोस्टली बायकोच😅)
तर मी पहीली ओळ म्हणतो सुद्धा नेहमी👍👍👍
हे खर आहे कुठल गाण कस मनात रूजेल बरेचदा सांगता येत नाही…🙏🏾बाबूजी व आशा जी फारच चांगल द्वंद्व गीत गात अस मला नेहमी वाटत✅🙏🏾

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s