काल दुपारी माझे एक स्नेही विवेकजी देशपांडे यांनी मला एक फोटो पाठवून आठवण करून दिली की काल माणिकराव सीताराम गोडघाटे म्हणजेच ग्रेस यांचा ८६ वा वाढदिवस आहे. ते ग्रेसचे चाहते आणि स्नेही सुद्धा आहेत. त्यांच्या घरी ग्रेस बऱ्याच वेळा येऊन गेले असे त्यांनी मला सांगितल्यावर मी मनोमन विवेकजींना नमस्कार केला. गेला आठवड्यात माझे सगळे वेळापत्रक कोलमडून पडलं. विचार करायला सुरुवात केली की काहीतरी विघ्न उत्पन्न व्हायचे आणि लिखाण आणखी दूर पडायचे. मग आज ठरवले की काहीही झाले तरी माझ्या सर्वात आवडत्या ग्रेस यांच्या कवितेवर लिहून हातावेगळे करायचेच.
ग्रेस आणि बाळासाहेब मंगेशकर यांची खास मैत्री. जनसामान्यांना ग्रेसची सुरेल ओळख बाळासाहेबांनीच खऱ्या अर्थाने करून दिली आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या दोन कवितांवर मी यापूर्वीच लिहिले आहे. पण माझी स्वतः ची आवडती कविता वेगळीच आहे. ग्रेस यांची कविता म्हणजे वरवर सोपी वाटत असली तरी त्यांच्या शब्दजालात गुरफटून जायला होते. प्रत्येक कविता म्हणजे त्यांनी विचारपूर्वक रचलेला एक चक्रव्यूहच आहे. ते स्वतः त्या प्रत्येक कवितेतील त्यांना स्वतः ला अभिप्रेत असलेला अर्थ उलगडा करून खुलासेवार सांगत नसत. यामुळे त्या रत्नजडित दागिन्यांच्या तेजस्वी झळाळणाऱ्या रूपाने दिपून गेले तरी प्रत्येक वेळी पाहताना प्रत्येक रत्नाचा वेगळा पैलू दिसून येतो. प्रत्येक वेळी प्रत्येक शब्द आणि ओळीतून वेगळाच अर्थ जाणवतो. दरवेळी वाचताना काही वेगळीच अनुभूती जाणवते.
तर प्रथम ही कविता पाहूया: ग्रेसच्या इतर कवितांप्रमाणेच ही अत्यंत छंदबद्ध अशी आहे, मुळातच गेय आहे. स्वरबद्ध केली आहे ती एका अत्यंत प्रसिद्ध स्वरयात्रींच्या चिरंजीवांनी: श्रीधर फडके यांनी. ही कविता दोन गायकांनी गायलेली प्रसिद्ध आहे : सुरेश वाडकर आणि स्वतः श्रीधर फडके यांनी! https://youtu.be/R_q2ozcwcsI
एका प्रेमी युगुलाची कहाणी वाटावी अशी ही कविता. पण खरेतर सरळ सोपे, कळण्यास त्रास न देणारी कविता ग्रेस यांनी केलीच नाही. त्यांची प्रत्येक कविता गूढ वाटावी, त्यात प्रथमतः न कळणारा अर्थ नक्की सापडावा आणि प्रत्येक वाचनात आणि नवा अर्थबोध व्हावा अशीच नेहमीची परिस्थिती!
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
तुला पाहिले
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे
तुला पाहिले
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन तुला सावली
तुला पाहिले
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे
तुला पाहिले
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
तुला पाहिले मी
प्रथमदर्शनी ही एका प्रेमिकेसाठी लिहिल्यासारखी वाटते. पण असे सरळ सरळ लिहितील तर ते ग्रेस कुठले! वाचकांना मोहून, विचार करायला लावून आपल्या शब्दांच्या चक्रव्यूहात कसे पकडायचे हा त्यांचा हातखंडा. ग्रेसच्या अनुभवांची शिदोरी या कवितेत प्रतिमा-प्रतीकांच्या रूपात दिसून येते. मला त्यांची कविता आरंभी न समजूनसुद्धा भावली. (खरे तर “ग्रेस मला पूर्णपणे समजला आहे” असे म्हणणारा महाभाग अजून जन्माला यायचा आहे असेच मला वाटते) . त्यांना नेमके काय अभिप्रेत आहे हे कळतच नाही. प्रत्येक वाचनात त्यांची कविता नवनवोन्मेष धारण करते, वेगवेगळ्या पण अतिशय लोभस रुपात आपल्या पुढे येते, कधी कवीच्या मनातली दुःखाची काळोखी खोलीही दाखवते. त्यांची कविता समजायची वाचकांची जेव्हढी कुवत असेल तेव्हढी आपणच समजून घ्यायची. मराठी शालेय पाठ्यपुस्तकात ग्रेस विरळाच दिसणार. शिकवताना मास्तरांची भंबेरी नाही का उडणार? या अप्रतिम काव्याच्या वारूला संगीतात बांधायचे शिवधनुष्य समर्थपणे पेललं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक संगीतप्रेमीच्या गळ्यातील ताईत, बाबूजी सुधीर फडके यांच्या सुपुत्राने- श्रीधर फडके यांनी! त्यांनी या गाण्याच्या निर्मितीच्या आठवणी कित्येक वेळा सांगितल्या आहेत- मुलाखतीत तसेच त्यांच्या गायनाच्या मैफलीत. सुमारे ३० वर्षांपूर्वी झालेली गोष्ट आहे: श्रीधर फडके यांनी या गीतनिर्मितीसंदर्भात असंख्य आठवणी सांगितल्या आहेत. श्रीधरजींनी त्यांच्या अजित सोमण या मित्राकडे काही नवीन कविता भावगीते बनविण्यासाठी मागितल्या. अजित सोमण उत्तम बासरीवादक. त्यांचा काव्याचा अभ्यास खूप मोठा. त्यांनी कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा काव्यसंग्रह श्रीधर फडक्यांना दिला. त्यात ‘तुला पाहिले मी..’ ही कविता आहे, ती त्यांनी वाचली. अर्थ पटकन् त्यांना ही नाही कळला, पण कविता मात्र भावली. श्रीधरजी कित्येकवेळा या संदर्भात सांगतात.. “ग्रेस यांच्या कवितेत वेगवेगळ्या छटा मिळतात. कविता छंदोबद्ध असते. तिचे अंतरे वाचताना वेगवेगळ्या भावना जाणवतात.” कवी ग्रेस यांना श्रीधरजींनी त्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “ही प्रेमकविता आहे हे लक्षात ठेवा.” या कवितेला आपल्याला चाल लावता आलीच पाहिजे हा श्रीधरजींचा विचार. त्यांच्या मते, हे गीत झपतालातसुद्धा करता येईल. पण त्यांनी ‘दीपचंदी’ तालात चाल बांधणे पसंत केले. एकदा प्रवासात परत मुंबईला येत असताना त्यांना चाल सुचली. बरोबर ध्वनिमुद्रण करण्याचे कोणतेच साधन नव्हते, म्हणून स्वतः च्या मनाशी घोटवून पाठ केली. (आजच्या मोबाईल च्या युगात हे प्राथमिक ध्वनिमुद्रण त्यांना मोबाईल वर लगेच करता आले असते). घरी पोचेपर्यंत मुखडा तयार झाला होता, तो त्यांनी घरच्या टेपरेकॉर्डर वर ध्वनिमुद्रित केला. विचार करत करत दहा-पंधरा मिनिटात सर्व अंतरे चालीत बांधले गेले. त्यांनी आपला पहिला प्रयत्न बाबूजींना ऐकवला, तो त्यांना खूप आवडला. फार कमी लोकांना माहीत आहे की हे गाणे पहिल्यांदा श्रीधर फडके यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित होऊन प्रसारित झाले. हे गाणे नन्तर सुरेश वाडकर यांनी ऐकले (आणि ते अपेक्षित असेच कविता आणि गाण्याच्या प्रेमातच पडले) त्यांनी श्रीधर फडक्यांना “हे गाणं मला द्याच!” असा प्रेमाग्रह करत त्यांनी हे आपल्या पदरी पाडून घेतले. त्यांचे गाणे जास्त लोकप्रिय झाले नसेलही, पण उत्तमच आहे. या गाण्यासाठी फडके/वाडकर यांच्यात तुलना करूच नये! फडक्यांचे गाणे किती हळुवार आहे पहा: https://youtu.be/02Bw5PKPOqs
मला कळलेला भावार्थ मी मुद्दामच आज उद्धृत करत नाही, तुम्हांला कविता वाचून-ऐकून काय वाटले ते लिहा, मी नन्तर माझ्या भावना व्यक्त करीन.
असे हे थोर ग्रेस, त्यांच्या सहजसुंदर कवितेला चाल देऊन मखमली सुरांत बांधले आहे श्रीधर फडके यांनी आणि लाडिक हट्टाने एकदा परत गायले आहे सुरेश वाडकर यांनी……
तुमच्या भावना जरूर कळवा. लोकहो उन्हाळा चांगलाच तापू लागला आहे, काळजी घ्या , द्रव पदार्थ भरपूर घ्या म्हणजे त्रास कमी होईल. शुभरात्री!
14 replies on “असेच काहीसे उशिराच…”
Beautiful….
Very ग्रेसफुल…❤
LikeLiked by 1 person
अगदी खरे, त्यांची कविता मी चाचपडतो आहे
LikeLike
कमाल सरजी.. ग्रेसची कविता एक बेट आहे स्वतः ग्रेस स्वतःहून म्हणायचे.. मीही एक बेटच आहे. सहलीसाठी लोक येतात किंवा समुद्र जीवावर उठला तर आश्रयासाठी येतात ..
या बेटावरून परतीच्या कुठल्याही बोटीची हमी देऊ शकत नाही मी ..परतावेसे वाटले तर स्वतः होडी झाले पाहिजे.
हे दुःख कुण्या जन्माचे,
क्षितिजाला बिलगुन आले ..
स्वप्नात पुन्हा सापडले मेघांचे भगवे शेले.
शरीराच्या साजण वेळा आणि इंद्रियांचे निनादि प्रहर.. हे त्यांच्या शब्दसृष्टीचे मुलाधार आहेत. त्यांचे शब्द उत्कट पण शरीर स्पर्शाच्या कुळातले ,,ते म्हणतात.. पळवाट नकोच आहे मला ,दुःख टेकण्यापूर्ती थोडीशी संदीग्दधता.. ग्रेस हे एक क्रांतिकारी कवी ,बंडखोरी त्यांच्या कवितेतील शब्द शब्दातून व्यक्त होते ..त्यांनी एकदा म्हटलं होतं …एखाद्या कलावंताने आपली निर्माण क्षमता संपल्याच्या विदारक जाणिवेने स्वतःचा अंगठा कापून टाकावा हे मी समजू शकतो.. पण कलावंताचा अंगठा हा कोणाही सम्राटचा मालकी हक्क कसा होईल ??तरी हे होतेच ..एकलव्याचा अंगठा ही असा एका हिंस्त्र सत्तेचा बळी ,अशा लहान थोर सत्ता सतत आंधळी सत्ता गाजवत असतात, म्हणून कलावंताच्या बांधिलकीचा प्रश्न होऊन बसतो.. इथेच रसिकांच्या बांधिलकीचा ही प्रश्न यायला हवा ..आपल्या अभिरुचीला ही बांधिलकी हवी, विशिष्ट स्तर हवा ,दिशाही हवी.. दहा प्रकारच्या गोष्टी आवडणे शक्य आहे, पण त्यातही आत्म्याला खंजिरासारखे भेदून जाणारी एखादी असतेच ना …दिशाहीन विदग्धतेच्या अभ्यासाने आज सगळीकडे अभिरुचीचे अवमूल्यन होते आहे ..अंधारात फार संयमाने दिवा ठेवावा लागतो. ही ओळ काय मी केवळ एखाद्या लहरी थिल्लर तिडकीत लिहिली असेल?? दिव्याची जपणूक करताना अंधाराची बूज राखतो मी.. संवेदना रक्तबंबाळ झाल्या तरीही माझे इमान ढळत नाही ..माझ्यापुरते एक दिवा जपायचा झाला तर आयुष्य पुरत नाही .आणि इथे तर झुंबरेच्या झुंबरे शोभेला लावण्याची अहमहमिका सुरू आहे.. “तमसो मा ज्योतिर्गमय “‘हे सूत्र लिहिणाऱ्या कवीचे आंतरिक सुत्रच जर गवसणार नसेल ? आंधळेपणाने असे मंत्र उच्चारावे तरी कशाला ? हे तर अंगठा कापून घेण्यापेक्षा ही निर्घृण होईल. पुढे ते म्हणतात ,आयुष्यभर कुठल्याही प्रस्थापित मूल्यांचे दडपण मानले नाही पाहिजे, निर्माण क्षमअस्तित्वाची जडणघडण होत असताना त्या प्रक्रियेला कुठल्याही तडजोडीच्या वेठीस धरले नाही तो सिद्धार्थ..
त्याचे व्यासपीठ होऊ शकत नाही .करू नये ..व्यासपीठे म्हणजे अस्तित्व शोधाचे पंख कापून मुद्दाम दुबळ्या केलेल्या सामर्थयाची चेष्टा करणारे कत्तलखाने असतात.. व्यासपीठे अशीच बेमालुमपणे माणसांची विटंबना करीत राहतात .अनुभवांच्या तोडमोडीला घेऊन तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यासाठी पठडीचा आश्रय.. मग प्रेषितांच्या व्यथा सूत्रांचे काय ?शरणमंत्रांनी आणि मुल्ला मौलवींच्या पहाट गजरांनी आवाजांची दुनिया घटकावर स्तब्ध राहत असेल, पण ती हादरून जात नाही.. मंत्रांमध्ये प्रेषितांचे अनुभव हेच खरे मार्गदर्शक असतात. पठडीबाज गुरूंच्या आश्रयाने मार्ग तर सापडत नाहीच.तर उलट दिशाभूल होत राहते .अशी दिशाभूल नाकारणे व स्वीकारणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ! पण नाकारल्याशिवाय अस्तित्वाला हादरे बसत नाहीत आणि हादरे बसल्याशिवाय काही नवनिर्माण होऊ शकत नाही ..ही दुःख वैभवाची संपन्नता.. असे खडे बोल ऐकवणारे ,लिहिणारे ग्रेस आपल्याला भेटले .त्यांच्या कवितेचा
पाच दहा टक्के तरी अर्थ लावू शकलो ..हीच आपल्यासारख्या रसिकांची तपस्या नव्हे काय.? त्यांच्या आयुष्यातील पूर्वानुभव ते कधीही विसरू शकले नाहीत पण त्यांनी ते व्यक्त केले शब्दांमधून ज्या शब्दांमधील प्रखरता आपले डोळे दिपवून टाकते, बाळासाहेबांनी चाल दिलेल्या व गायलेल्या आई वरील सुंदर कवितेत ग्रेस सहज म्हणून जातात ….आडवाच झोपलो असतो तर मी ही
गर्भाशयात
तर येऊ दिले असते का तुझ्या वाट्याला माऊलीचे भाग्य ?
थांबलोच म्हणून सांगतो टाकून ठेवतो .
तोपर्यंत टाकून ठेव.
पठारी थडग्यावर ..माझ्या हक्काची जागा आहे ती .पाहूणाअसलो तरी स्वाभिमान आहे मला ! तेव्हाच शिवून दिली असतीस भगव्या क्षितिजाची झोळी.तर काय झाले असते ???
ते चंद्रगंध मिटले चोळी दुधात भिजली
पाठीत वाकताना आई गळ्यात हसली
आभाळ सावल्यांचे झाले नदीत गोळा
आई घरी मुलांना वाटू नये उन्हाळा
देशी कुण्या विदेशी भुलली कळेना सांग
आई नीजे दुपारी उलटी करून शेज
ती आई होती म्हणून मी घन व्याकुळ मी ही रडलो त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता
हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता ..
चोरून अमेच्या रात्री देवळात आई गेली .
बालपणावर माझ्या चंद्राची राख पसरली
गावात पोचलो जेव्हा मज उशीर झाला नव्हता झाडाच्या खाली एक संन्यासी निजला होता.
त्यांच्या मनातील संन्यासी सदैव व्यक्त होत राहिला ..कुठल्याही अनुभवाकडे तटस्थपणे बघणे आणि शहारणाऱ्या शब्दांनी ते कवितेत उतरवणे ही त्यांची खासियत होती.. सरजी आजची माझी सकाळ नितांत सुंदर केल्याबद्दल धन्यवाद ..माझे सगळे मित्र मी ग्रेस या विषयावर काही बोलू लागलो तर दुःखाची दंतकथा सुरू झाली असे म्हणतात ..पण शेवटी हेच अंतिम सत्य नव्हे का…….पुनः:एकवार उद्धृत करणे आवश्यक आहे.तुमच्या लेखांच्या वैविध्यपूर्णतेने स्तिमित होतो..त्रिवार वंदन.
तुला पाहिले मी नदीच्या किनारी या कवितेला संगीत देताना श्रीधरबाबूंनी या कवितेतील एक कडवे का गाण्यामध्ये घेतले नाही ? हे एक मला कोडे आहे.. ते कडवे असे आहे..
धराया विनाशास संदर्भ माझे
जशा संगीताने दिशा पेटल्या
तुझ्या सांद्र ओढाळ देहात तुजला
नदीच्या कळा कोणत्या भेटल्या .
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
प्रतिक्रिया देताना जरा लांबलीच..जसा माईक हातात आल्यावर आणि पुढे श्रोते असल्यावर थांबणे कठीण होते,तसेच काहीसे झाले..
LikeLiked by 1 person
धन्यवाद विवेकजी, विस्ताराने लिहिल्याशिवाय अशा कवीच्या मनात डोकावताच येणार नाही.
कवितेचे गाणे करताना बरेच संगीतकार काही ओळी, कडवी गाळून टाकतात, त्यांचा क्रम वर खाली करतात . गझलांच्या बाबतीत तर खूप गायक असे करत राहतात, प्रसंगी दुसऱ्या कवीचे शेर ही मध्येच टाकतात.
त्यांचे स्वातंत्र्य पूर्णपणे दाखवतात. तुमचे म्हणणे खरे आहे, खूप अर्थपूर्ण कडवे आहे, कधी श्रीधर फडके भेटले तर नक्की विचारुयात.
LikeLiked by 1 person
Doc उत्तम रसग्रहण. हे गाणं माझे all time favourite. असो.
तुमचं लिखाण, विषयाची माहिती हे सर्व खूपच आनंददायी.
LikeLiked by 1 person
Thanks Prakash. Would welcome your interpretation of the poem
LikeLike
सहज आणि सुंदर कविता करणारे कवी. त्यांचे भय इथले संपत नाही. हे पण खूप सुंदर असे गीत आहे. खरंच ग्रेस is great.
LikeLiked by 1 person
धन्यवाद आशाजी
LikeLike
I stand educated by this post. Although I must say it will take time for me to fully understand/appreciate.
Thank you very much.
LikeLiked by 1 person
Thanks Sir
LikeLike
अतिशय आवडती कविता व गीत!
मला बाळासाहेबांकडून ग्रेस यांच्या काही कवितांचे विश्लेषण ऐकावयाचे भाग्य लाभलेले आहे. संन्यस्त वृत्ती, दुःख हा मूळ भाव प्रत्येक कवितेत व्यक्त होत राहतो!
आपल्या या लेखन प्रपंचामुळे या सुंदर आठवणी पुन्हा जागृत होतात व दिवस खूप छान जातो!
आपले धन्यवाद 🙏🙏
ग्रेस न आवडणारी मंडळीही परिचयाची आहेत!
LikeLiked by 1 person
न कळल्यामुळे किंवा समजून घ्यायचा प्रयत्न न केल्यामुळे म्हणत असतील बहुधा! दुर्बोध आणि गूढ नक्की आहेत
LikeLike
डाॕक्टर आपण खरोखर उत्तम टीकाकार आहात. मूळ कविता विषयाला ( गूढार्थाला ) बगल मारून इतर निरूपण करून शेवटी वाचकांच प्रश्न . यातील गूढार्थ काय ? लय भारी.
आता बी किंवा ग्रेस यांच्या कवितांचा विचार केला तर त्या surrealist या वर्गात मोडतात. त्यांचे विश्लेषण करणे हे जवळ जवळ अशक्य आहे. त्यातील imagery आणि त्यासाठी वापरलेले शब्द यांच्यात ताळमेळ बसत . प्रत्येक विश्लेषणकार हा स्वतःच्या अनुभूतीप्रमाणे प्रयत्न / प्रयोग करतो पण तो सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही.
अहो बाकीचे सर्व सोडा, आजपण केशवसुतांनी वापरलेल्या ” झुपूर्झा” या शब्दाचा अर्थ लावण्यात कित्येक स्वयंभू तज्ञ आजही गर्क आहेत. ( आम्हीपण १९५७ साली इंटरमध्ये असतांना होतो )
तात्पर्य . विश्लेषणकारांनी असल्या गूढ काव्यक्षेत्रात छातीठोकपणे निर्णयापर्यत पोहोचलो म्हणून लांब उडी मारू नये. कदाचित दिसते ते पाणी नसून मृगजळ असण्याची दाट शक्यता असू शकते .
LikeLiked by 1 person
अगदी खरे, ग्रेस च्या कवितेबद्दल पूर्णपणे लागू होते
LikeLike