Categories
Uncategorized

ज्ञानेश्वरी जयंती

आज भाद्रपद वद्य षष्ठी म्हणजे श्री ज्ञानेश्वरी जयंती
॥ ते हे माय ज्ञानेश्वरी ॥

श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा रोचक इतिहास

भाद्रपद वद्य षष्ठी ही तिथी श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरी करण्यात येते. अर्थात श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल परंतु ते काही अजिबात खरे नाही. पैठणनिवासी शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांनी इ.स.१५८४ साली याच तिथीस या ग्रंथाची शुद्धप्रत तयार करुन पूर्ण केली.

झाले असे कि,समाधीस्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजानवृक्षाची मूळी काढण्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरमहाराजांनी संत एकनाथमहाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आळंदीला बोलावून घेतले. नाथमहाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि, माऊलींची समाधी सापडत नाहिये. परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक कोणाला माहित नसल्याचे कळले. यदाकदाचित समाधी असली तरी ते स्थान नेमके कोणते हे सांगता येत नाही असे कळाले.

आपल्याबरोबर आलेल्या भक्तमंडळीना इंद्रायणी नदीच्या तीरावर थांबायला सांगून नाथमहाराज तेथिल जंगल सदृश्य परिसरात गेले. माऊलींच्या समाधीचा परिसर काट्याकुट्यांनी व्यापला होता. त्यातच परिसरात असलेल्या अनेकानेक समाध्या ! मग यातील नेमकी माऊलींची समाधी कोणती? हा मोठा प्रश्न पडला. मग एका स्थानावर बसून नाथ महाराजांनी माऊलींचे ध्यान लावले. (हे स्थान म्हणजे हल्ली माउलींच्या समाधी मंदिरात असलेला ‘शांतिब्रह्म श्री संत एकनाथमहाराज पार’ होय.) ज्ञानेश्वरमहाराजांनी समाधीच्या आत येण्याचा निर्देश केला त्याप्रमाणे नाथमहाराज आज असलेल्या नंदी खालील द्वारातून आत गेले. तेथे श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे ते दिव्य अलौकिक स्वरूप पाहून नाथमहाराज हरखून गेले.

श्रीज्ञानदेवे येऊनी स्वप्नात ! सांगितली मात मजलागी !! दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा ! परब्रह्म केवळ बोलतसे !!

अशी त्यांची भावना झाली. चर्चा सुरु असताना श्रीज्ञानेश्वरीमध्ये समाविष्ट झालेल्या, हेतुपुरस्सर टाकल्या गेलेल्या आगंतुक ओव्यांनी माऊली व्यथित झालेे असल्याचे नाथमहाराजांनी जाणले. त्यांना त्यात योग्य ती सुधारणा करण्यासाठी अधिकारसंपन्न व्यक्तीची आवश्यकता होती व ती नाथ महाराजांच्या रुपाने पूर्ण होणार होती. त्यामुळे अजानवृक्षाच्या मूळीचे निमित्त करुन माऊलींनी नाथमहाराजांना बोलावून घेतले होते. या दोन महात्म्यांचा श्रीज्ञानेश्वरी संदर्भाने समाधीत तब्बल तीन दिवस संवाद चालला.

तीन दिवस झाले तरी नाथ महाराज परत न आल्याने बरोबर आलेल्या भाविकांच्या मनात घालमेल होऊ लागली. भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी वाण्याचे रुप घेतले व नाथ महाराजांनी तुमची शिधापाण्याची व्यवस्था लावण्याचे काम सांगितले असल्याचे त्यांना सांगितले.

समाधीस्थानातून बाहेर आल्यावर सर्व भाविकांना माऊलींच्या समाधीचे दर्शन घडावे या हेतूने नाथमहाराज त्या थांबलेल्या सर्वांना त्या स्थानी घेऊन आले व सर्वांना माऊलींचे दर्शन घडविले. समाधीचा शोध लावल्यानंतर समाधीचा जीर्णोद्धार केला,मूळ गाभारा बांधला, मंदिर परिसर सुशोभित केला, नित्य पूजेची नीट व्यवस्था लावली व आळंदीची कार्तिकीयात्रा पुन्हा सुरु केली.

या नंतर वर्षभरातच श्रीसंत एकनाथमहाराजांनी श्रीक्षेत्र पैठण येथे श्रीज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याची पूर्णता ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्ठी ! आणि तोच दिवस श्रीज्ञानेश्वरी जयंती म्हणुन वारकरी संप्रदायात साजरा करण्यात येतो.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी इ स १२९० मध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली परंतु स्वतः कार्यसमाप्तीची तिथी न लिहिल्याने नेमका श्रीज्ञानेश्वरी जयंतीचा दिवस कोणता ? हे सांगता येत नाही.

पुढील काही काळात नाथमहाराजांनी महाराष्ट्र आणि बाहेरीलही श्रीज्ञानेश्वरीच्या शेकडो प्रति जमा करुन शुद्ध प्रति तयार केल्या व शुद्धप्रती परत पोचत्या केल्या.

आज ज्या श्रीज्ञानेश्वरीचे आपण पारायण करतो ती श्रीनाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे.म्हणूनच नाथ महाराज हे श्रीज्ञानेश्वरीचे आद्य संपादक आहेत. एवढेच काय तर ते मराठी वाङ्मयाचेही आद्य संपादक ठरतात. श्रीएकनाथमहाराजांनी ग्रंथाच्या शेवटी चार ओव्या लिहून ठेवल्या आहेत त्या अशा –

शके पंधराशे साहोत्तरी ! तारणनाम संवत्सरी ! एकाजनार्दने अत्यादरी ! गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली !!१!! ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध ! परि पाठांतरी शुद्ध अबद्ध ! तो शोधुनिया एवंविध ! प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी !!२!! नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका ! जयाची गीतेची वाचितां टीका ! ज्ञान होय लोकां ! अतिभाविकां ग्रंथार्थिया !!३!! बहुकाळ पर्वणी गोमटी ! भाद्रपद मास कपिलाषष्ठी ! प्रतिष्ठानी गोदातटी ! लेखन कामासाठी संपूर्ण जाहली !!४!!

हा आहे श्रीज्ञानेश्वरी ‘जयंती’चा इतिहास !

ही अनमोल व जुनीच परंतु तरीही बऱ्याच प्रमाणात माहीत नसलेली (म्हणून “नवीन”) इतरांपर्यंतही पोचवा.


जय ज्ञानेश्वर माऊली…. जय एकनाथ महाराज….

आपल्या सर्वांना हा मंगल दिवस लाभो. आपापल्या जीवन प्रवासात या आद्यग्रंथाचे मार्गदर्शन सर्वांना लाभो.

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

7 replies on “ज्ञानेश्वरी जयंती”

अतिशय सुंदर माहिती…..
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री ज्ञानेश्वरी, श्री संत एकनाथ महाराज की जय…..
या सगळ्यांना माझे नमन…..त्यांनी दिलेला ज्ञान भक्ती रुपी प्रकाश सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सौख्य आणि समाधान निर्माण करत राहो…..सतत….हीच ईश्वरचरणी प्रार्थना….🙏🙏🙏🙏
श्री राम कृष्ण हरी….🌺🌺

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s