Categories
Uncategorized

संपूर्ण समर्पण

आज खूप दिवसांनी हे अमर गाणे मी ऐकले. अगदी लहान असताना कोल्हापूर येथील खासबागेत माझ्या आजोबांनी बांधलेल्या घरी, किंवा नंतर त्यांच्या भेटीत मी त्यांच्याकडून हे सर्वप्रथम ऐकले असावे. आजोबांनी त्यांच्या उमेदीच्या काळात कित्येक संगीत नाटकातील दिग्गज लोकांना कोल्हापुरातील थिएटरमध्ये प्रत्यक्ष ऐकलं होते. आई म्हणते की आजोबांना सुराचे ज्ञान खूपच होते. मी इंटर सायन्स च्या साठी तयारी करत होतो, तेव्हा आमच्या घरी अनुच्या लग्नाचे वऱ्हाड मुक्कामी येऊन पोहोचले. माझी उचलबांगडी आजोबांच्या घरी त्यांना सोबत मिळावी म्हणून झाली. तेव्हां आजोबा साधारण ७५ वर्षांचे असावेत. पहाटे मी कधी उठतो आहे हे पाहण्यासाठी त्यांचा येरझारा ४ पासून सुरू होई. रामप्रहरी ते जुनी संगीत नाटकांतील पदे गुणगुणत. त्यातील हे त्यांचे खूप आवडीचे पद. मी उठू लागलो अशी चाहूल लागली की आजोबा चहा करायला जायचे. तोंड धुवून दात घासून येईपर्यंत थरथरत्या हातांनी चहा हजर होई. आजोबांचे हात खूप थरथरायचे. अगदी बशीत कप हिवताप भरल्यासारखा कडकडत असे. प्रेमाने आजोबांनी केलेला चहा पिताना शरमून जायचो आणि बरेही वाटे. कप मी घेतला, की त्यांचे चालणे (आणि गाणे गुणगुणणे) परत चालू होई. त्यांच्या ओठांवर कायम एखादे गाणे असे.

मुंबईतील सर्व शिक्षण संपवून मी पुण्यात आलो आणि एकदा कमला नेहरू उद्यानाजवळ मला व अरुणाला काळा कोट घालून एक वृद्ध आमच्या बाजूने जाताना दिसले, डोक्यावर एक टोपी. मी काही क्षणांनी तिला म्हटले ” अगं हे बहुतेक छोटा गंधर्व!!” ते जवळून चालले होते, त्यांच्या काळ्या सावळ्या चेहऱ्यावर कळत नकळत एक स्मितरेषा उमटून गेली असावी बहुतेक. छोटा गंधर्वांनी नाट्यसंगीत व अशी पदे, अभंग खूप गायली आहेत, त्यांचे गाणे सर्व मराठी संगीतप्रेमी माणसांच्या हृदयात कायमचे कोरले गेले आहे. पूर्वी रेडिओवर अशी गाणी खूप ऐकायला मिळत, हल्ली च्या भाराभर TV चॅनेल्सवर चांगल्या गोष्टींची वानवाच असते. त्यामुळे ही फक्त यू ट्यूब वर ऐकायला मिळतात.

छोटा गंधर्व यांचा उल्लेख सौदागर नागनाथ गोरे असा कोणी केला असता तर बहुतेक त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक आणि काही मित्र सोडून कोणीच कोणाबद्दल बोलले जाते आहे ते ओळखले नसते. ग्वाल्हेर घराण्यात संगीत शिक्षण मिळालेला हा उत्तम गायक! ख्याल गायकी केली पण लोकप्रियता आणि प्रसिद्धी त्यांना नाट्यसंगीत आणि अभंग गायनामुळे मिळाली! तत्कालीन जनमानसात खूप प्रेम आणि प्रसिद्धीही मिळवली. TV व इंटरनेट च्या प्रसार , किंबहुना रेडिओ पण जेव्हा सगळीकडे पोहोचला नव्हता, तेव्हा मराठी भाषिक रसिकांना संगीत नाटक हे करमणुकीचे एक महत्वाचे माध्यम होते. माझ्या आजोबांच्या पिढीतील सर्वच लोक याचे खूप मोठे चाहते होते, तसेच नाट्यसंगीत हे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजलेले कला माध्यम. सौदागर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळ भाडळे या गावी झाला. औपचारिक शिक्षण म्हणावे तर काही झाले नाही. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालमोहन संगीत मंडळी या  नाट्यसंस्थेचे मालक दामूअण्णा जोशी गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली, त्यांनी त्यांच्या आईवडीलांची समजूत घातली व सौदागर व त्यांचा धाकटा भाऊ पीतांबर यांना मंडळीत सामील करून घेतले. बालमोहन संगीत मंडळीने रंगमंचावर आणलेल्या पहिल्या वहिल्या प्राणप्रतिष्ठा या नाटकात सौदागरांनी पदार्पण केले ते स्रीभूमिकेत. पुण्यातील विजयानंद नाट्यगृहात त्याचा पहिला प्रयोग १९२८ साली झाला. त्यांच्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यांच्या लहान वयातल्या गंधर्वतुल्य गाण्यामुळे दामूअण्णा यांनी त्यांचे नामकरण छोटा गंधर्व केले, व ती उपाधी त्यांना आयुष्यभर चिकटून राहिली. त्यांनी गायलेल्या पदांना रसिकांची दाद मिळत असे. दामूअण्णा यांनी त्यांच्या गायनात प्रगती व्हावी म्हणून बऱ्याच  मातब्बरांकडून त्यांना शिक्षण दिले (अगदी सवाई गंधर्व यांनी सुद्धा काही काळ हे काम केले) पुढे अब्दुल करीम खान, मा. दीनानाथ यांचा सहवास व मार्गदर्शन सुद्धा त्यांना मिळाले. कालांतराने त्यांनी ग्वाल्हेर घराण्यातील एका शिक्षकाकडे चक्क गंडा बांधून रीतसर शागिर्दी केली. आधी लाहोरचे सैंदे खाँ (ते तेव्हां मुंबईत होते) व नंतर कोल्हापूर चे भूर्जीखाँ यांच्याकडे शिकले. त्यामुळे छोटा गंधर्व यांच्या गायकीत विविध संस्कार व त्यांच्या छटा दिसून येत. अशा पद्धतीने त्यांची गायनकला वेगळीच विकसित झाली.पुढे आचार्य अत्रे यांनी ही संस्था चालवली व छोटा गंधर्व स्त्री भूमिकेतून पुरुषांच्या भूमिकेत आले. पुढे त्यांनी पदे लिहिली, संगीत ही दिले, सर्वात जास्त मानधन घेणारा नट असे स्थान ही मिळवले. १९७७-७८ पर्यंत ते रंगभूमीवर दिसत होते.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात त्यांनी चीजा लिहिल्या, गायल्या एवढेच नव्हे तर रागनिर्मिती ही केली! https://youtu.be/YKbgou_2rFM

तूं माझी माउली

तूं माझी माउली तूं माझी साउली ।
पाहतों वाटुली पांडुरंगे ॥१॥

तूं मज येकुला वडील धाकुला ।
तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥

तुका म्हणे जीव तुजपाशीं असे ।
तुजविण ओस सर्व दिशा ॥३॥

या छोट्याशा अभंगाचा भावार्थ असा काहीसा असावा:

तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात,”हे पांडुरंगा, तू माझी माऊली आहेस. आयुष्याच्या तापलेल्या उन्हात विसावा आणि शीतलता देणारी माझी विश्रांतीदायक सावली आहेस. मी तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. तू मला एकटाच धाकटा (आणि मोठा) भाऊ आहेस, माझा जिवलग आप्त असाही तू  एकटाच आहेस. माझा जीव तुझ्या चरणी अर्पण करतो, मला तिथेच कायमस्वरूपी स्थान दे. तुझ्या शिवाय मला सर्व दिशा अगदी ओस भासत आहेत, माझा जीव तुझ्याशिवाय कुठेही रमणारा नाही.”

असे हे छोटा गंधर्व! मराठी भावविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून सर्वांवर राज्य करणारे गायनसम्राट!

त्यांच्या गाण्यातली आर्तता आणि विनवणी पहा, साक्षात पंढरीनाथ सुद्धा विरघळून भक्तासाठी तो म्हणेल ते करायला तयार व्हायलाच पाहिजे. असा हा महर्षी एका साध्या निवृत्त आजोबांसारखा दिसावा हे आमचे सद्भाग्यच !

दिवसभर काम करून सायंकाळी हे सगळे आठवून टिपायला वेळ मिळाला. लोकहो काळजी घ्या. चिनी विषाणूचा धोका अजून पूर्णपणे टळला नाहीये. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आजच्यापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण देशात रोज दिसत होते, पण नंतर आपल्याच गलथान वागण्याचा परिणाम म्हणजे रोगाचा महाभयंकर प्रसार व दुसरी लाट. आजही सावध राहण्याची गरज आहे. ज्यांनी अजून लस घेतली नसेल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी.

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

6 replies on “संपूर्ण समर्पण”

वाह!! काय सुंदर गाणं….छोटा गंधर्व यांचं….. खरंच किती आर्तता आणि खरेपणा आहे त्यांच्या सुरात….साक्षात देव सुद्धा विरघळून जाईल त्यांच्या हाकेने आणि धावून येईल त्यांच्यासाठी…..अशी माणसं आता मिळणं विरळा…..

त्यांच्या बद्दलची खूप छान माहिती आणि आठवणी तुमच्या लेखणीतून वाचायला मिळाल्या….खूप छान वाटलं वाचून…..

माझ्या लहानपणी दिवाळीच्या दिवशी पहाटे थंडीत उठल्यावर रेडिओ वर घरी लागलेल्या गाण्यांची आणि त्या सुंदर दिवसांची आठवण झाली….
काही काही गाणी, नाद त्यांच्या बरोबर अनेक आठवणीं, गंध,स्पर्श, माहोल आणि माणसं घेऊन येतात हेच खरं…..
या लेखाबद्दल आणि गाण्याबद्दल तुमचे मनः पूर्वक आभार सर 🙏🙏🌹🌹

Liked by 1 person

मला लेख पाठवल्या बद्दल धन्यवाद. लेख आणि गीत दोन्ही सुंदर.

Liked by 1 person

Leave a reply to kshamaparanjapeganu Cancel reply