काल संध्याकाळी फिरताना एक रानफुल दिसले आणि माझे चंचल मन पोचले गानसरस्वती विदुषी किशोरीताई आमोणकर यांच्या एका कालातीत गाण्यावर! शांताबाई शेळके, भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गानसरस्वती विदुषी किशोरीताई आमोणकर या तिघा महारथींच्या संयुक्त प्रयत्नांनी निर्माण झालेले एक अत्युत्तम भावशिल्प!!
त्याच सुमारास याच तिघांनी आणखी एक अशीच अप्रतिम कलाकृती येणाऱ्या पिढ्यांसाठीच नव्हे तर युगांसाठी निर्मून ठेवली आहे. ती काही अंशी जाईन विचारत रानफुला पेक्षा ही उजवी आहे. तिघेही आपापल्या परीने सर्वश्रेष्ठ आहेतच. त्यांच्या कलाकृतींचे मूल्यमापन करण्यास मी पूर्णपणे अपात्र आहे हे मी सुरुवातीलाच स्वतःच सांगून ठेवतो. माझ्या मर्यादित बुद्धिमत्तेला आकलन झाल्याप्रमाणे मला प्रामाणिकपणे जसे वाटते ते मी मांडले आहे. तुमचे मत वेगळे असल्यास जरूर व्यक्त करावे, मला शिकायला खूप आवडेल.
प्रथम गाणे: कवयित्री शांताबाई शेळके यांनी द्वयर्थी गाणे लिहिले आहे – वरवर ते प्रणयिनी राधा तिच्या नाथाला- श्रीकृष्णाला आर्जव करते आहे असे वाटते, पण मी जितके जास्त ऐकतो, वाचतो त्यात मला वेगळाच अनुभव येतोय. त्याची संगीतरचना मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील सर्वात अभ्यासू आणि कल्पक संगीतकार, भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केली आहे. ही चाल त्यांनी बांधलेल्या सर्वात क्लिष्ट चालींपैकी एक असावी. म्हणजे एकदम सीतास्वयंवरातील पण वाटावा (शिवधनुष्य उचलून प्रत्यंचा लावणे) असा प्रकार आहे- सगळे अहंमन्य गायक /गायिका (विशेषतः आजच्या कराओके मुळे गल्लोगल्ली बोकाळलेले हजारो गानवीर- बेसुरच नव्हे तर भेसूर गाणारे सगळे गर्दभराज ) कितीही नाही म्हटले तरी स्वतःविषयी फाजील आत्मविश्वास असणारे हे गाणे गाऊन पाहू वगैरे विचार करून घरी किंवा स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करतात, मग ते युट्युबवर त्या व्हिडिओचे प्रकाशन करून, व सोशल मीडियावर ते प्रसृत करून लोकांना उगाचच त्रास देतात. म्हणजे स्वतः प्रसिद्ध गाण्याचा विचका करून समाधान मानावे की नाही? पण नाही, हे अतृप्त आत्मे इतरांना छळूनच शांत होतात. परत त्या यूट्यूब व्हिडिओची लिंक पाठवून आपले मत वगैरेही मागतात. म्हणजे कितीही इच्छा नसली तरी ऐकावे लागतेच आणि वर कौतुक करणेही आलेच. ती तारेवरची कसरत करताना आपल्या जीवाला अनन्य यातना होतात- संभाजीमहाराजांना मोगलांच्या हाती जेव्हढ्या झाल्या होत्या वढूला , त्यापेक्षा अंमळ जास्तच त्रास सहन करून मग आपल्या अंगी नसलेल्या मुत्सद्दीपणा पणाला लावून प्रतिक्रिया द्यायची- त्या व्यक्तीला कळलेच नाही पाहिजे की आपण कौतुक केले आहे का टीका! हृदयनाथजींच्या रचना गाण्यासाठी एक पात्रता परीक्षा ठेवावी असे मला प्रामाणिकपणे वाटते.
इतरांनी हे शिवधनुष्य लांबून पाहून मागच्यामागे काढता पाय घ्यावा हे उत्तम! त्यांच्या संगीतरचना फक्त अत्युच्च दर्जाच्या गायकांना पेलता येतील अशाच असतात. त्यात ही सर्वात क्लिष्ट अशीच आहे. आशाताई, लतादीदी, किंवा गानसरस्वती विदुषी किशोरीताई आमोणकर यांनीच गाव्या अशी ही अतिशय सुरेख पण अवघड अशी रचना आहे. https://youtu.be/uNmYofYzD7w
हे श्याम सुन्दर राजसा मनमोहना
विनवुनी सांगते तुज
जाऊ दे मला परतुनी || ध्रु ||
गाव गोकुळ दूर राहे
दूर यमुना नीर वाहे …
हरवले मी कसे मग
चालले कुठे घनवनी || १ ||
पावरीचा सूर भिडला
मजसी माझा विसर पडला…
नकळता पाऊले मम
राहिली इथे थबकुनी || २ ||
पान जळी सळसळे का ? भिवविती रे लाख शंका …
थरथरे, बावरे मन
संगती सखी नच कुणी || ३ ||
प्रथमदर्शनी राधा श्रीकृष्णाला विनवणी करते आहे असे वाटते. किशोरीताई यांनी सुरुवातीला फक्त दोन मराठी भावगीते म्हटली, त्यांतले हे एक. परज या पूर्वी (पुरबी) थाटाच्या रागावर आधारित असे हे गाणे. हृदयनाथजींना अभ्यासूपणासाठी आणि त्यांच्या संगीताच्या समजेबद्दल दोघीही ज्येष्ठ भगिनी उगाचच मान देत नाहीत. हा राग निवडला आहे तो या काव्यासाठी अचूक आहे, रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात गायला आणि वाजवला जाणारा हा राग आहे. कवितेचा आशय पाहता इतकी अचूक निवड! विस्मय वाटण्या सारखीच आहे.
मला ही कविता एका प्रणयिनीने तिच्या सख्याला घरी जाऊ दे म्हणून केलेली विनवणी वाटत नाही. एखाद्या मुमुक्षु साधकाला मोक्षमार्गावर ही भावना मनात उत्पन्न झाली असावी असे वाटते. या भावनेने हीच कविता वाचा, प्रत्येक ओळ त्याच संदर्भात लिहिली आहे असे वाटेल. कवितेचा आशय शेवटी वाचकाच्या मन:स्थिती आणि त्या क्षणी उत्पन्न होणारे मनातले भाव याच्यावर अवलंबून असतात. मोक्षमार्गावर खूप मार्गक्रमण केल्यावरची द्विधा मन:स्थिती झाली आहे असे वाटते. मोक्षप्राप्ती खूप दूर राहिली आहे आणि त्यासाठी सांसारिक गोष्टी- कर्तव्यांपासून आपण दूर झालो याचीही एक जाणीव झाली, त्याकडे परतू दे अशी विनवणी तो मुमुक्षु परमेश्वराकडे करतो आहे की काय?
गाव गोकुळ दूर राहे
दूर यमुना नीर वाहे …
हरवले मी कसे मग
चालले कुठे घनवनी मोक्षप्राप्ती अजून खूप दूर आहे आणि भवसागर पार करून जाण्याचा वाटेवर आपण कुठे दाट वनात हरवलो आहोत असा विचार मनात डोकावतो आहे. परतीची वाट पण दिसत नाही आणि पुढे जाणे दुष्कर वाटते आहे, अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.
पावरीचा सूर भिडला
मजसी माझा विसर पडला…
नकळता पाऊले मम
राहिली इथे थबकुनी ….. पावरीचा म्हणजे बांसरीचा सूर ऐकून (म्हणजे ईश्वराच्या भक्तीची वाट आवडून) मला माझाच (माझ्या “स्वत्वाची” भावना राहिली नाही) विसर पडला आणि मी ईश्वरभक्तीच्या, मोक्षमार्गावर आलो. आता निर्माण झालेल्या द्विधा मन:स्थितीत माझे पाऊल पुढे पण जात नाही आणि उलट परतत ही नाही असं झालं आहे.
पान जळी सळसळे का ? भिवविती रे लाख शंका …
थरथरे, बावरे मन
संगती सखी नच कुणी…….. ….. वाटेवरच्या जंगलात पानातून, पाण्यातून काहीतरी सळसळत येते आहे का? मृत्यूच एखाद्या प्राण्याच्या रूपाने येत नाहीये नं? (तसेही मनुष्यजातीला सर्पांची भीती वाटते ती बहुतांशी अनाठायीच आहे: मी लहान असताना आम्ही आसाम मध्ये तेजपूर जवळ एका खेड्यात राहत होतो, तेव्हा घरे बांबूची बनवलेली असत, पावसाळ्यात हमखास घराच्या आसपासच नव्हे कित्येकदा घरात सुद्धा साप आश्रयाला यायचे. ते भिंतीला लागून वेटोळी करून बसायचे, पाऊस कमी झाला की आले तसे निघून जायचे, मला आठवते आमचे घरमालक म्हणाले होते “ ही नागभूमी आहे, तुम्ही सापांच्या वाटेला गेला नाहीत तर ते चावत नाहीत”) . त्या सळसळीने मनात लाखो शंका निर्माण होतात. मोक्षमार्गावर पुढे काय होणार आहे याची भीती निर्माण होती आहे का? मोक्षप्राप्ती होण्यासाठी देहत्याग तर करावा लागेलच आणि कोणी आप्तेष्ट, सखे सोबती बरोबर ही येणार नाहीत…. शेवटी ती वाट एकट्यानेच चालायची आहे याची जाणीव, संसाराला, ऐहिक सुखांना, आप्तेष्टांना सोडून जावे लागणार ही घालमेल….
किशोरीताई यांचा आवाज इतका उत्कट लागला आहे की त्यांत अक्षरशः देहभान विसरून हरवायला होते मला प्रत्येक वेळी. हृदयनाथांचे मोठेपण इतके होते की त्यांच्या रेकॉर्डिंगला मोठे मोठे कलाकार आवर्जून यायचे: पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, रईस खान वगैरे दिग्गज मंडळी हजेरी लावून जात. एका मोठ्या संगीतकाराला त्याच्या क्रियाशील राहण्यात आणि अमर कलाकृती निर्माण करण्यात हातभार लावत. या गाण्यात येणारी बासरीवरची मोहक फुंकर द्विधा मनाला अगदी आश्वस्त करून जाते. किती सुंदर वापर केला आहे, मुखड्यानंतर पहिला अंतरा सुरू व्हायच्या आधी पहा. नन्तरही प्रत्येक अंतऱ्यानंतर बासरीचे सूर पंडित हृदयनाथांनी अतिशय कल्पकतेने आणि प्रभावीपणे वापरले आहेत. उगाच दस्तुरखुद्द शंकराचार्यांनी त्यांना “भावगंधर्व” ही उपाधी दिली नाही!
कालच्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना माझे मुंबईतील स्नेही श्री जयंत जोशी साहेबांनी या गाण्याचा उल्लेख केला आणि माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले. इतक्या वर्षात अव्यक्त राहिलेले विचार व्यक्त झाले, धन्यवाद जोशी साहेब. तुम्ही स्फुल्लिंग टाकला नसतात तर न जाणे आणखी किती दिवस हे असेच बासनात गुंडाळून राहिले असते. आशा आहे तुम्हाला माझे वेगळे विचार पटतील. https://youtu.be/ynUqu1UtL9U
अशी ही खऱ्या अर्थाने अमर कलाकृती: मराठी भावविश्वात उच्च स्थानी ध्रुवपदी विराजमान झालेली! धन्य त्या शांताबाई, धन्य ते हृदयनाथ आणि धन्य त्या किशोरीताई! आणि किती भाग्यशाली माझी पिढी की आम्ही हे सगळे पाहू, ऐकू, अनुभवू, आणि आस्वादू शकलो. आज सायंकाळी एव्हढेच. जोशींच्या प्रतिक्रियेमुळे मी या आनंदाच्या डोही आनंद तरंग अशा अवस्थेत पोचलोय.
25 replies on “प्रियकराची आर्त विनवणी का….”
भाव गीताचा खरा अर्थ अध्यात्मिक पातळीवरून स्पष्ट करण्याची आपली शैली वंदनीय आहे
त्रिवार वंदन
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ बडवे
LikeLike
Fantastic rendition, I have heard this first time in KA tais voice, what a performance.
LikeLike
खरे आहे, अमर रचना
LikeLike
अहाहा ! क्या बात… सर
Absolutely amazing, heartfelt ❤
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ साहेब
LikeLike
Wonderful Interpretation!
coherence, correspondence and completeness.
Thank you sir!
LikeLiked by 1 person
Welcome Sachin
LikeLike
अरे वाह ह्यात माझ्या बाबांचा उल्लेख आलेला पाहून अजूनच छान वाटले🙂
बाकी तुम्ही खूप छान लिहिताच
LikeLiked by 1 person
Thanks. He referred to this song yesterday.
LikeLike
Truly amazing composition!!! Sir khupach chhan lihilay.
LikeLiked by 1 person
Thanks Devaki
LikeLike
Dhanyawad Sir.. Mazya aawdatya ya geeta baddal je tumhi samarpak ase adhyatmik vishleshan kelet , tyala tod nahi 👌🏻👌🏻🙏🏻. Khar sangaych tar, weekly once , me muddam he gaan aikate, with closed eyes, I feel that, what u explained here.. Mainly in line “Pavricha sur bhidala, majasi maza visar padala..” , kishori tai ni ,jiv otalay gatana, ani mag tumhi, tya shabdamadhe ekroop houn jata.. Murali aiku yete, ani dole zarayala lagtat..🙏🏻🙏🏻🙏🏻
LikeLiked by 1 person
खरे आहे
LikeLike
अप्रतिम सुंदर गाणं….लेखन ही….मनाला भिडणारे स्वर आणि त्यातील शब्द ही…
LikeLiked by 1 person
Thanks Kshama
LikeLike
डॉ.साहेब , नमस्कार, मी काल सहजच वरील गाण्याचा उल्लेख केला व आपणाकडून त्या गाण्याचं अतिशय सुंदर असं रसग्रहण वाचायला मिळालं. आम्ही कानसेन वंशातले. आम्हाला सूर एकवेळ कळणार नाही पण कणसूर लगेच जाणवेल . आपणाकडून अशीच सुंदर सुंदर गाणी रसग्रहणासह ऐकायला मिळोत हीच इच्छा. किशोरीताईंच्या ‘अवघा रंग ‘ बद्दल सवडीने लिहा ही विनंती. धन्यवाद , जयंत जोशी.
LikeLiked by 1 person
Thanks Joshi saheb
LikeLike
जोशी साहेब, ही लिंक देतोय, ती पहा: <https://abchandorkar.wordpress.com/2021/07/21/%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%98%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be/
LikeLike
अप्रतिम भावगीत.
LikeLiked by 1 person
खरे आहे
LikeLike
अप्रतिम रचना, संगीत, गायकी व आपले रसग्रहण सर्वच सुंदर 👌 👌
LikeLiked by 1 person
Thanks Walimbe saheb
LikeLike
अप्रतिम दादा….
अध्यात्मिक दृष्टीने या कालातीत गाण्याकडे बघितले आणि अजूनच भावले….
🙏🙏
LikeLiked by 1 person
Thanks Jaya
LikeLike